विदर्भासाठी आग्रही असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेची विदर्भात ताकद किती?

    27-Oct-2024   
Total Views |

UBT 
 
मुंबई : (UBT Seat Allocation in Vidarbh ) महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील जागांवरून वाद निर्माण झाला आहे. उबाठा गटाने विदर्भातील जास्तीत जास्त जागांवर दावा केला आहे. परंतु काँग्रेस या जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे जागावाटपावर मविआतील तिन्ही पक्षांची अंतिम बोलणी होण्याच्या आधीच उबाठा गटाने परस्पर उमेदवारांची नावे घोषित करण्यास सुरुवात केली आहे.
 
लोकसभा निवडणुकीवेळी रामटेक आणि अमरावती या दोन जागा उबाठा गटाने काँग्रेसला दिल्या होत्या. याचाच मोबदला म्हणून आता उबाठा गट विदर्भात जास्त जागांसाठी आग्रही आहे. मात्र, या जागा देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसचे अनेक मोठे नेते विदर्भातील असल्याने इथे त्यांची चांगली ताकद आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये विदर्भातील जागांवरून सध्या घमासान सुरु आहे.
 
विदर्भातील सावनेर, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, मलकापूर, रिसोड, अमरावती, तिवसा, देवळी, साकोली, आमगाव, राजूरा, ब्रम्हपूरी या जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत. तर काँग्रेसच्या तिकीटावर निवडून गेलेले उमरेड विधानसभेचे आमदार राजू पारवे हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. याशिवाय दर्यापूरचे बळवंत वानखेडे आणि वरोरा विधानसभेच्या प्रतिभा धानोरकर हे दोघे लोकसभेवर निवडून गेलेत. त्यामुळे सध्या विदर्भात काँग्रेसचे १२ आमदार आहेत. तर केवळ बाळापूर हा एकच विधानसभा मतदारसंघ उबाठा गटाकडे आहे. याठिकाणी नितीन देशमुख हे आमदार आहेत.
 
आतापर्यंत जाहीर झालेल्या याद्यांनुसार, उबाठा गटाने विदर्भातून ९ उमेदवार तर, शिवसेनेने ६ उमेदवार जाहीर केलेत. शिवसेनेतील फुटीनंतर उबाठा गटाकडे विदर्भातील केवळ एक जागा शिल्लक राहिली आहे. दुसरीकडे, शिंदेंकडे विदर्भातील ५ आमदार आहेत.
 
उबाठा गटाची जास्तीत जास्त ताकद केवळ मुंबईपुरती मर्यादित आहे. मात्र, आता त्यांना मुंबईतही त्यांच्या जागा कमी होण्याची भीती आहे. शिवाय लोकसभेत कोकणात उबाठा गटाचा सुपडासाफ झाला होता. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या नारायण राणेंनी दोन टर्म निवडून आलेल्या उबाठा गटाच्या विनायक राऊत यांचा दारुण पराभव केला होता.
 
मुंबई आणि कोकणात उबाठा गटाची पीछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भावर ठाकरेंचा डोळा आहे. त्यांना काँग्रेसच्या मतदारांच्या जीवावर विदर्भात जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. याच कारणामुळे विदर्भातील जास्तीत जास्त जागा मागण्यावर त्यांचा भर आहे.
 
विदर्भात केवळ एकच जागा असतानाही उबाठा गटाने विदर्भातील जास्तीत जास्त जागांवर दावा केला आहे. शिवाय यातील काही जागा काँग्रेसकडून खेचूनही आणल्या आहेत. त्यामुळे विदर्भात उबाठा गटाची ताकद नसतानाही जास्त जागांचा हा आग्रह कशासाठी? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
 
विदर्भात एकूण ६२ विधानसभा मतदारसंघ मोडतात.
 
विदर्भातील पक्षीय बलाबल  
 
भाजप - २९
 
शिवसेना - ५
 
राष्ट्रवादी काँग्रेस - ६
 
काँग्रेस - १४
 
शरद पवार गट - १
 
उबाठा - १
 
प्रहार जनशक्ती पक्ष - २
 
अपक्ष - ४
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....