कलाविज्ञानप्रेमी ‘रितुपर्णा’

Total Views |
 
रितुपर्णा
 
विज्ञान शाखेतून संशोधन अभ्यास करत असतानाच आपल्यातील कलागुणांना योग्य न्याय देत यशाला गवसणी घालणार्‍या रितुपर्णा किर्तोनियाची यशोगाथा.
 
विज्ञान शाखेतील ’बायोटेक’ या विषयात मास्टर्स डिग्री, तर दुसरीकडे एका महाविद्यालयात कलासंचालक आणि नाटकांची उत्कृष्ट सेट डिझायनर, ग्राफिक डिझायर अशा सर्व गोष्टींचा एकाचवेची मेळ घालणारी, केवळ २७ वर्षीय रितुपर्णा किर्तोनिया ही तरुणी! कोलकाता हे मूळ असले, तरी रितुपर्णाची जडणघडण मात्र अस्सल महाराष्ट्रीय मुलीसारखीच.
 
रितुपर्णा हिचे संपूर्ण बालपण ते आज व्यावसायिक कारकीर्द ही रायगड जिल्ह्यातील, पनवेल येथेच घडली आहे. तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण पनवेलमधील चांगु काना ठाकूर महाविद्यालयातून पूर्ण झाले, तर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले. रितुपर्णाची शैक्षणिक पार्श्वभूमी विज्ञान शाखेतून ‘बायोटेक’ या विषयात आहे.
 
रितुपर्णाला पदवीचे शिक्षण घेत असतानाच, आपल्यातील कलागुणांची जाणीव होती. त्यामुळे त्या आपला दिनक्रमात काहीवेळ आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी राखून ठेवत असे. मात्र आपल्या कलेला व्यासपीठ कसे मिळणार याबाबत पुरेशी माहिती रितुपर्णाला नव्हती. सीकेटी महाविद्यालयाने रितुपर्णा यांच्यातील कलागुण हेरून, तिला मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिव्हलच्या माध्यमातून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कला सादर करण्याची संधी दिली. याचवेळी तिला अंदाज आला की आपण अभ्यास सांभाळून, कोलाज, रांगोळी, डिझायनिंग या क्षेत्रांत विशेष काहीतरी करू शकतो.
 
सलग दोन वर्षे रितुपर्णा यांनी विद्यापीठाचेही प्रतिनिधित्व केले. या दोन्हीवेळा रितुपर्णाने कोलाजमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. कोलाजमध्येही ‘पेपर कटिंग’ या विषयात रितुपर्णा काम करते. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर यशाला गवसणी घालणार्‍या रितुपर्णाची, यानिमित्ताने विविध मान्यवरांशी ओळख झाली. या काळात एकाचवेळी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळवत रितुपर्णाने, मुंबई विद्यापीठात ‘बोक फाईन आर्ट्स चॅम्पियनशिप’ जिंकली. तिचे कलाक्षेत्रातील यश पाहून सीकेटी महाविद्यालयाने रितुपर्णाला आपल्याच महाविद्यालयातील तरुणांना प्रशिक्षित करण्याची संधी दिली. आजही रितुपर्णा ते काम आवडीने करत आहे.
 
पदव्युत्तर शिक्षण घेताना, शिक्षणावर लक्ष देऊन, पदव्युत्तर पदवी पूर्ण होताच, नव्या संधीच्या शोधात होती. मात्र. त्यावेळी रितुपर्णा यांच्यासमोर कोविड या साथरोगाचे आव्हान उभे राहिले. मात्र, य काळात रितुपर्णाने नवी संधी शोधत, ‘ग्राफिक डिझायनिंग’ या विषयात ऑनलाईन डिप्लोमा केला.त्यामुळे पुढे ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरु केला. कोरोना काळ असल्याने सर्वच व्यवहार ऑनलाईन होते. त्यामुळे रितुपर्णा यांनी लोगो, ब्रोशर आणि काही टेम्प्लेट तयार करण्याचा छोटासा ऑनलाईन व्यवसाय थाटला. विविध कंपन्यांसाठी संकल्पनात्मक आणि विकसित ग्राफिक्स उत्पादने तिची कंपनी पुरविते. आज भारतातील महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, कोलकाता, तामिळनाडू, बंगळुरु यांसह, यूकेमधील ग्राहकांसाठी डिजिटल आमंत्रणे आणि व्हिडिओ तयार करण्याचे काम, रितुपर्णा हिची कंपनी करते. आज रितुपर्णाच्या व्यवसायाशी ‘ग्राफिक डिझायनिंग’ आणि कमिशन आर्टवर्क या क्षेत्रात, भारतासह परदेशातील ग्राहकही जोडले गेले आहेत.
 
यासोबतच, रितुपर्णा सीकेटी महाविद्यालयात प्रशिक्षण देत असतानाच, नाटकांचे नैपथ्यउभारणीचे कौशल्यही आत्मसात केले. ’काक्षी’ या नाटकाचे नैपथ्य विद्यार्थी रोहित याच्या मदतीने रितुपर्णा यांनी केले आहे. मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक अभिजित झुंझारराव आणि सीकेटी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सेलचे प्रमुख गणेश जगताप यांच्या मार्गदर्शनात, अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या हे रितुपर्णा आवर्जून सांगते. या सर्व छोट्या-मोठ्या संधी येत असतानाच, सीकेटी महाविद्यालयाच्या एका नाटकाला झी नाट्यगौरव प्रायोगिक विभागात नामांकन मिळाले. ‘झी’चे नामांकन तेही एका महाविद्यालयीन संघाला मिळणे, हे आमच्यासाठी खूप मोठे यश होते. रंगभूषा आणि वेशभूषा या विभागात मला ’झी’चा पुरस्कार मिळाला अत्यंत आनंदाचा असा तो क्षण होता, असे रितुपर्णा सांगते. मराठी अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी रितुपर्णाला शुभेच्छासंदेश देताना एक गोष्ट सांगितली की, “छान काम करत आहेस. यापुढेही असेच चांगले काम करत राहा.” हे एकच वाक्य खूप प्रोत्साहन देणार आहे. याच दिशेने पुढील मार्गक्रमण सुरु असल्याचे रितुपर्णा सांगते.
 
हे सांभाळून रितुपर्णा नेट परीक्षेचाही अभ्यास करत आहे. मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असतानाच तिने विद्यापीठात जैवतंत्रज्ञान उद्योजकता ट्रेंडवरील ‘राष्ट्रीय परिसंवाद परिषदे’चे आयोजन आणि व्यवस्थापन केले. २०१९ मध्ये रितुपर्णा यांनी नवजात बालकांमध्ये संगीत प्रक्रियेचा परस्पर संवादावर आधारित मनोवैज्ञानिक न्यूरोलॉजिकल विषय घेत संशोधन प्रकल्प सादर केला. याचबरोबर स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांसंबंधित संशोधन प्रकल्प प्रबंध सादर केला आहे. ‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’ अंतर्गत (जून २०२० मध्ये ऑनलाईन शिक्षणाद्वारे) कोरोना व्हायरससाठी लस विकसित करण्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आता रितुपर्णा यांना पूर्णवेळ महाविद्यालयीन शिक्षक म्हणून कार्य करण्याची इच्छा आहे. विज्ञानप्रेमी असणार्‍या रितुपर्णा यांनी शैक्षणिक ध्येय आणि आपली आवड या दोन्हीचा मेळ साधत यश मिळविले. त्यांचे हे यश तरुणांना नक्कीच प्रोत्साहन देणारे आहे. रितुपर्णा यांना भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.