मुंबई, दि.२५: विशेष प्रतिनिधी भारतातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. ही हायस्पीड ट्रेन मुंबई या देशाच्या आर्थिक केंद्राला गुजरात राज्यातील अहमदाबादशी जोडण्यात आली आहे. भविष्यात बुलेट ट्रेनचे जाळे अधिक विस्तारण्याची केंद्र सरकारची योजना आहे. याच पार्श्वभूमीवर आता या बुलेट ट्रेन स्थानकांच्या परिसरात उत्तम कनेक्टिव्हीटी आणि इतर सेवांशी जोडणी देत स्मार्ट करण्यात येतील. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 'स्मार्ट प्रकल्पां'तर्गत ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट उभारण्यासाठीची योजना जाहीर केली.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, गुजरात आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आणि जपानमधील यशस्वी प्रकल्पांचा दशकांचा अनुभव जाणून घेत जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जेआयसीए)च्या भागीदारीसह, मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पावर स्टेशन एरिया डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचे स्टेशन परिसर विकास प्रणाली सादर करणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे. यासाठी गुजरातमधील साबरमती, सुरत आणि महाराष्ट्रातील विरार आणि ठाणे या चार स्थानकांची निवड करण्यात आली आहे. स्थानकापासून ८०० मीटर परिसराचे तीन क्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. यामध्ये दोन क्षेत्रांचा विकास हा स्थानिक प्राधिकरणांनी करायचा आहे तर एक क्षेत्रात एनएचएसआरसीएल विकास करेल. महसूल निर्मितीमध्ये प्रकल्प महत्वही भूमिका बजावेल. प्रीमियम एफएसआय/एफएआर, विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) इत्यादी नागरी नियोजन साधनांद्वारे विकास उपक्रमांना मदत केली जाऊ शकते. या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या शहरांना राहण्यायोग्य, शाश्वत नागरी केंद्रे म्हणून प्रोत्साहन मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल आणि रहिवाशांचे जीवनमान सुधारेल. टीओडी उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. हा प्रकल्प स्थानक स्तरावरील तात्कालिक गरजा आणि भविष्यात व्यापक प्रादेशिक विकास या दोन्ही गरजा पूर्ण करेल.
८०० मी. क्षेत्राचे विभाजन
१. बुलेट ट्रेन स्थानक
(एनएचएसआरसीएलद्वारे)
बुलेट ट्रेन स्थानकाचा आणि या क्षेत्राच्या विकासाची जबाबदरी पूर्णतः नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडची असणार आहे. बुलेट ट्रेन स्टेशनच्या आसपासचा पिक आणि ड्रॉप ऑफ परिसर, पार्किंग, पॅसेंजर प्लाझा आणि एनएचएसआरसीएलद्वारे विकसित केल्या जाणाऱ्या विद्यमान पायाभूत सुविधांशी जोडणी याचा यामध्ये समावेश आहे.
२. एरिया २
(शहर प्राधिकरणांद्वारे)
बुलेट ट्रेन स्थानके सुरु होताच १० वर्षांच्या आत स्थानक परिसरात सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरसह बुलेट ट्रेन स्थानिकांशी रस्त्याची जोडणी सुधारण्याची जबाबदारी ही त्या शहरातील प्राधिकरणावर असेल.
३. एरिया ३
(शहर प्राधिकरणांद्वारे)
राज्य सरकार आणि नगरविकास, शहर नियोजन प्राधिकरणाद्वारे बुलेट ट्रेन स्थानक सुरू झाल्यानंतर पुढील १० ते २० वर्षांत हे क्षेत्र विकसित केले जाईल.
ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी)चे फायदे
सुलभता आणि कमी गर्दी
शहर विकासाला गती
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
लँड व्हॅल्यू कॅप्चरद्वारे महसूल निर्मिती
शाश्वत नागरी विकास