एका पिसाने कुणी मोर होऊ शकत नाही,’ असे म्हणतात. पण, लोकसभेत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीत असे मोर जागोजागी हिंडताना दिसतात. संजय राऊत हे त्यापैकीच एक. ‘विधानसभेला मविआची सत्ता येणार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार,’ अशी बतावणी करून झाल्यानंतर, त्यांनी ’उबाठा’ १०० जागा लढवणार असल्याच्या फुशारक्या मारण्यास सुरूवात केली. त्याला काँग्रेसने केराची टोपली दाखवली.
एका पिसाने कुणी मोर होऊ शकत नाही,’ असे म्हणतात. पण, लोकसभेत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीत असे मोर जागोजागी हिंडताना दिसतात. संजय राऊत हे त्यापैकीच एक. ‘विधानसभेला मविआची सत्ता येणार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार,’ अशी बतावणी करून झाल्यानंतर, त्यांनी ’उबाठा’ १०० जागा लढवणार असल्याच्या फुशारक्या मारण्यास सुरूवात केली. त्याला काँग्रेसने केराची टोपली दाखवली. त्यामुळे जागावाटपाचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात गेला. त्यांनी म्हणे ‘मध्यस्थी’ केली आणि मविआतील तिढ्यावर तोडगा काढला. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राऊतांनी फॉर्म्युला जाहीर केला. प्रत्येकी ८५-८५-८५ अशा २७० जागांवर आमचे एकमत झाले, उर्वरित १८ जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
मुळात संजय राऊतांनी मांडलेल्या फॉर्म्युल्याची बेरीज होते २५५. याचा अर्थ ३३ जागांवर तिढा अद्याप कायम आहे. मग फसवे आकडे सादर करून ते कोणाची दिशाभूल करू पाहताहेत? मविआतील चर्चेचे गुर्हाळ संपत नसताना, तिकडे महायुतीने याद्या जाहीर करून पक्षयंत्रणा कामालाही लावली. त्या धास्तीमुळेच आमचे सारे काही आलबेल सुरू असल्याचा दिखावाच मविआकडून होत असावा. कारण, जे जागावाटपाचा तिढाही सामोपचाराने सोडवू शकत नाहीत, ते राज्यकारभार कसा चालवतील, असा प्रश्न आता मतदारांनाही पडणे साहजिकच. त्यामुळेच ठोस आकडा जाहीर करून माध्यमांमधील नकारात्मक चर्चा थांबवाव्यात, या हेतूने राऊतांनी गणित मांडले आणि तेही चुकीचे! या कारनाम्यामुळे त्यांना गणितात पास करणार्या शिक्षकांवरही शंका घेण्यास वाव. दुसरे म्हणजे, ’मविआ’चा फॉर्म्युला जाहीर होण्याच्या काही मिनिटे आधी ’उबाठा’ गटाने ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तिढा न सुटलेल्या आठ ते दहा जागांचा त्यात समावेश असल्यामुळे बैठकीत तीव्र आक्षेपही नोंदवण्यात आला. त्यानंतर राऊतांनी यादीत तांत्रिक दोष असल्याची सारवासारव केली. बरे, ज्यांच्या सहीनिशी ’उबाठा’ने यादी जाहीर केली, ते अनिल देसाई राऊतांच्या शेजारीच बसलेले. याचा अर्थ बसल्या जागी अख्ख्या दुनियेला वेड्यात काढण्याचे यांदे धंदे सुरू आहेत. त्यामुळे असल्या भंपक लोकांना आता मतदारांनीच धडा शिकवावाच!
जागावाटपाचा तह
शरद पवार हे धुरंधर राजकारणी. कधी कोणाचे पाय खेचायचे, कधी कोणाशी जुळवून घ्यायचे, याचा त्यांना अचूक अंदाज. २०१४ साली सगळी सत्तापदे गेल्यानंतर त्यांनी न मागता भाजपला पाठिंबा दिला. पुढे २०१६-१७ सालामध्ये अजित पवार, तटकरेंना पुढे करून सत्तासहभागाची बोलणी केली. ती निष्फळ ठरली. २०१९ सालामध्ये एकीकडे ’मविआ’ आकाराला येत असताना, दुसरीकडे अजित पवारांना पुढे करून ‘पहाटेचा शपथविधी’ घडवून आणला. त्यानंतर अवघ्या काही तासांत ठाकरे आणि काँग्रेससोबत बोलणी करून सगळी महत्त्वाची खातीही पदरात पाडून घेतली आणि अजित पवारांना माघारी बोलावले. हा ‘फ्लॅशबॅक’ आठवायचे कारण म्हणजे, जागावाटपावरून महाविकास आघाडीत सुरू असलेली सुंदोपसुंदी.
१००च्या खाली जागा लढवायची ’उबाठा’ची तयारी नाही, तर काँग्रेस ११५वर अडून बसलेली; अशा स्थितीत १५ दिवस सरले, तरी जागावाटपाचे घोडे पुढे सरकेना. इच्छुक फार काळ ताटकळत राहणार नाहीत, हे हेरून उद्धव ठाकरेंनी पवारांच्या कोर्टात चेंडू टोलवला. पवारांनाही हेच हवे होते. ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’मध्ये शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली मविआची जागा वाटपाची बोलणी सुरू झाली. मुत्सद्दी पवारांनी मोठ्या शिताफीने प्रकरण हाताळले आणि आपल्याला हव्या त्या जागा पदरात पाडून घेतल्या. पवार तहात कधी हरत नाहीत, असे म्हणतात. काँग्रेस आणि उबाठाने यानिमित्ताने पुन्हा एकदा त्याचा अनुभव घेतला असेलच. महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी त्यांनी मुख्यमंत्रिपद ’उबाठा’ला सोडले असले, तरी सगळी निर्णायक आणि मलईदार खाती स्वतःकडे ठेवली होती. आताही त्याच नीतीचा अवलंब केला. ’माझ्या ८५ जागा ठरल्यात. तुम्ही सुद्धा प्रत्येकी ८५ वाटून घ्या, एकदाचा फॉर्म्युला जाहीर करा आणि उरलेल्या जागांसाठी उद्यापासून काय भांडायचे ते भांडा. पण, आम्हाला मुक्त करा,’ अशी तंबीच म्हणे पवारांनी उबाठा आणि काँग्रेसला दिली. आतली गोष्ट म्हणजे, पवारांनी या बैठकीला येण्याआधीच ८५ नावांची एक यादी तयार करून आणलेली. दोघांच्या भांडणात त्यांनी ती मंजूर करून घेतली आणि नामानिराळे झाले. पवारांचा रस्ता मोकळा झाला, गुंता राहिला तो उबाठा आणि काँग्रेसमध्ये. ते दोघेही शेवटपर्यंत भांडत राहतील आणि स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतील. शेवटी, कुत्र्याची शेपूट वाकडीच!