‘सायकल’ची फरफट

    21-Oct-2024   
Total Views |
 
Akhilesh Yadav
 
तिकडे उत्तर प्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक असताना, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव इकडे महाराष्ट्रात घिरट्या घालायला नुकतेच आले होते. सपाचे आकाश तसेही मोकळेच आणि फक्त विशिष्ट समाजासाठी तर ते पुरते खुले असते. त्यामुळे अशाच विशिष्ट आंजारण्यात-गोंजारण्यात अखिलेशबाबू कसलीही कसर सोडत नाही. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्र दौरा केला, परंतु या दौर्‍यातही त्यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मविआचाही विचका केला. इकडे उबाठा गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून ‘तू-तू मैं-मैं’ सुरू असताना इकडे अखिलेश यादव यांचा मात्र वेगळाच प्रकार सुरू आहे.
 
तिकडे उत्तर प्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक असताना, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव इकडे महाराष्ट्रात घिरट्या घालायला नुकतेच आले होते. सपाचे आकाश तसेही मोकळेच आणि फक्त विशिष्ट समाजासाठी तर ते पुरते खुले असते. त्यामुळे अशाच विशिष्ट आंजारण्यात-गोंजारण्यात अखिलेशबाबू कसलीही कसर सोडत नाही. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्र दौरा केला, परंतु या दौर्‍यातही त्यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मविआचाही विचका केला. इकडे उबाठा गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून ‘तू-तू मैं-मैं’ सुरू असताना इकडे अखिलेश यादव यांचा मात्र वेगळाच प्रकार सुरू आहे. राज्यात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये सभा घेतली. हे तेच मालेगाव आहे, जिथे लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुभाष भामरे अन्य सर्व विधानसभा मतदारसंघांतून आघाडीवर असताना फक्त मालेगाव मतदारसंघातून पिछाडीवर राहिले. याच ठिकाणी काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना एक लाख, ९० हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळाले. मालेगाव मध्य मतदारसंघात मुस्लीम मतदार मोठ्या संख्येने आहेत. एवढेच नव्हे तर विद्यमान आमदारही एमआयएमचे मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक हे आहेत. त्यामुळे अखिलेश यांचा कोणत्या मतदारसंघावर डोळा आहे आणि कोणत्या मतदारांवर डोळा आहे, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळेच अखिलेश यांनी मालेगावला सभा घेतली. तसेच, धुळे शहरासाठी उमेदवाराची घोषणाही केली. विशेष म्हणजे, अखिलेश बाबूंच्या सपाने महाविकास आघाडीकडे तब्बल १२ जागांची मागणी केली आहे. मविआत जागावाटपावरून शाब्दिक युद्ध सुरू असताना, या १२ जागांच्या मागणीची दखल घेतली जाईल, असे अखिलेश यांना वाटलेच कसे? यातून फक्त अखिलेशबाबूंचे हसे होईल, एवढे मात्र नक्की! अखिलेश यांनी मुस्लीमबहुल मतदारसंघामध्ये दौरा केला, त्यामुळे त्यांच्या डोक्यात नेमके काय आहे, हे सर्वांसमोर आहे. परंतु, महाराष्ट्रात येऊन सभा घेऊन आणि उमेदवारांच्या नावाची घोषणा करून अखिलेश यांनी एकप्रकारे मविआला चांगलाच दणका दिला आहे. मविआची एकी किती फोल आहे आणि फक्त आपले अस्तित्व टिकविण्यासाठीच हे सगळे एकत्र आले आहे, हेच अखिलेश यांचा महाराष्ट्र दौरा सांगून जातो.
जागवाटपातही ‘जंगलराज’
 
महाराष्ट्रासोबतच झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखादेखील जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असले, तरी झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचे निकाल १३ नोव्हेंबरला लागतील. पण, निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी महाराष्ट्रात मविआमध्ये आणि तिकडे झारखंडमधील ‘इंडी’ आघाडीत सगळे काही आलबेल नसल्याचे सध्या दिसून येते. इकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत फूट पडतेय की, काय अशी चर्चा सुरू असताना तिकडे झारखंडमध्येही सगळा सावळा गोंधळच! महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आघाडीत जागावाटपावर अद्याप एकमत झालेले नाही. इकडे उबाठा गटाने तर तिकडे झारखंडमध्ये राजदने काँग्रेसच्या अडचणी वाढवल्या आहेत. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा ४१ जागांवर, तर काँग्रेस २९ जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय जनता दलाला सात तर डाव्या पक्षांना चार जागा मिळाल्या आहेत. परंतु, या जागावाटपावर राजद मात्र चांगलाच नाराज झाला आहे. आरजेडीने बंडखोरीचा सूर आळवला असून, जागावाटपावर सहमत नसल्याचे म्हटले आहे. हेमंत सोरेन यांच्या घोषणेनंतर राजदचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनी, जेव्हा सर्व पक्षाचे नेते रांचीमध्ये उपस्थित असतात, तेव्हा आम्हाला युती स्थापनेच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले नाही याचे दुःख होत आहे. सर्व निर्णय ’मॅगी टू मिनिट नूडल्स’ नाहीत, असे म्हटले. तसेच, आमच्यासमोर अनेक पर्याय खुले असल्याचा इशाराच त्यांनी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाला दिला. तिकडे बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा भाजपकडे आल्याने तेजस्वी यादवांच्या सर्व आशा अपेक्षांवर पाणी फिरले. आपणही एक दिवस मुख्यमंत्री होऊ, या आशेवर असताना त्यांना ऐनवेळी विरोधी बाकावर बसावे लागले. ‘जंगलराज’चा मोठा वारसा असलेल्या लालू यादव आणि तेजस्वी यादव यांचा राजद आता झारखंडमधील जागावाटपातही ‘जंगलराज’ची परिस्थिती आणू पाहतो. त्यामुळेच थेट ‘इंडी’ आघाडीतून बाहेर पडण्याची धमकीच राजदने दिली आहे. जनतेचे भले करायचे नाही, फक्त आणि फक्त आपल्या अस्तित्वाची नौका सांभाळण्यासाठी सोबत राहण्याचे हे नाटक आहे.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.