श्वास अन् घास मायक्रोप्लास्टिकचा!

    21-Oct-2024   
Total Views |
 
Microplastics
 
अमेरिकेच्या आग्नेय दिशेला असलेल्या दक्षिण कॅरोलिनामध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनात, डॉल्फिनच्या श्वासामध्ये चक्क ‘मायक्रोप्लास्टिक्स’ सापडले आहेत. अमेरिकेतील संशोधकांच्या चमूने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, डॉल्फिन जेव्हा श्वास घेण्यासाठी वर येतात, तेव्हा ‘मायक्रोप्लास्टिक्स’ श्वासाद्वारे आत घेतात. शास्त्रज्ञांना डॉल्फिनच्या श्वासामध्ये ‘मायक्रोप्लास्टिक्स’ सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे डॉल्फिनच्या फुफ्फुसांना आणि एकूणच आरोग्याला होणार्‍या संभाव्य हानीबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
 
अमेरिकेच्या आग्नेय दिशेला असलेल्या दक्षिण कॅरोलिनामध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनात, डॉल्फिनच्या श्वासामध्ये चक्क ‘मायक्रोप्लास्टिक्स’ सापडले आहेत. अमेरिकेतील संशोधकांच्या चमूने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, डॉल्फिन जेव्हा श्वास घेण्यासाठी वर येतात, तेव्हा ‘मायक्रोप्लास्टिक्स’ श्वासाद्वारे आत घेतात. शास्त्रज्ञांना डॉल्फिनच्या श्वासामध्ये ‘मायक्रोप्लास्टिक्स’ सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे डॉल्फिनच्या फुफ्फुसांना आणि एकूणच आरोग्याला होणार्‍या संभाव्य हानीबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
 
’PLOS ONE’ या शास्त्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या प्राथमिक निष्कर्षांमध्ये शास्त्रज्ञांनी ‘बॉटलनोज डॉल्फिन’च्या श्वासातील हवेचे नमुने गोळा केले. यामधील धक्कादायक बाब म्हणजे, अभ्यास केलेल्या सर्व ११ डॉल्फिनच्या श्वासोच्छवासाच्या नमुन्यांमध्ये ‘मायक्रोप्लास्टिक्स’ आढळले. ‘मायक्रोप्लास्टिक्स’ हे प्लास्टिकचे लहान तुकडे असतात. जे पाच मिलीमीटरपेक्षा लहान असतात आणि प्लास्टिक कचरा, कृत्रिम कपड्यांमधून आणि औद्योगिक प्रक्रियांमधून निर्माण होतात. हे कण आता पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी, अगदी महासागराच्या खोलीपासून माऊंट एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत आढळतात.
 
वातावरणात या ‘मायक्रोप्लास्टिक्स’ची उपस्थिती दर्शवते की, हे कण हवेद्वारे वाहून नेले जाऊ शकतात आणि प्राण्यांपर्यंत किंवा परिसंस्थांपर्यंत पोहोचू शकतात. अभ्यासातून डॉल्फिनच्या बाबतीत असे दिसून आले आहे की, ते त्यांच्या अन्न आणि पाण्यातून ‘मायक्रोप्लास्टिक्स’चे सेवन करतात आणि जेव्हा ते श्वास घेण्यासाठी पृष्ठभागावर येतात, तेव्हा हे कण श्वासाद्वारे आत घेतात. डॉल्फिन, इतर सागरी प्राण्यांप्रमाणे, नियमितपणे हवेसाठी वर येण्यास भाग पाडले जातात. त्यांच्या मोठ्या फुफ्फुस क्षमतेमुळे, ते मानवांपेक्षा अधिक प्रमाणात हवा घेतात, ज्यामुळे ते अधिक प्रमाणात ‘मायक्रोप्लास्टिक्स’च्या संपर्कात येऊ शकतात. डॉल्फिनची फुफ्फुस क्षमता खूप मोठी आहे. त्यामुळे ते अधिक ‘मायक्रोप्लास्टिक्स’च्या संपर्कात असू शकतात. हा शोध विशेषतः चिंताजनक आहे. कारण, डॉल्फिन आधीच पर्यावरणीय धोक्यांना सामोरे जात आहेत. ‘मायक्रोप्लास्टिक्स’शरीरात गेल्यामुळे डॉल्फिन्सच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. जसे की फुफ्फुसांमध्ये जळजळ आणि इतर श्वसनाच्या समस्या. मानवांमध्ये, ‘मायक्रोप्लास्टिक्स’ श्वासोच्छवासाद्वारे शरीरात गेल्यास फुफ्फुसांमध्ये जळजळीची समस्या उद्भवते. तसेच, श्वसनाशी संबंधित आजार वाढवण्याचे पुरावेही मिळाले आहेत. संशोधकांना लुईझियानाच्या बारातरिया बे भागातील डॉल्फिनबद्दल विशेष चिंता आहे. २०१० साली झालेल्या ‘डीपवॉटर होरायझन’ तेलगळतीच्या आपत्तीनंतर या भागातील डॉल्फिनला फुफ्फुसांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या भेडसावत आहेत.
 
‘मायक्रोप्लास्टिक्स’मुळे त्यांची ही स्थिती आणखी बिघडू शकते. अभ्यासातील महत्त्वपूर्ण निष्कर्षांपैकी एक म्हणजे, शहरी आणि ग्रामीण परिसरातील डॉल्फिनदेखील ‘मायक्रोप्लास्टिक्स’ श्वासाद्वारे घेतात. संशोधकांना सारासोटा बे, फ्लोरिडातील डॉल्फिनमध्ये अधिक मायक्रोप्लास्टिक्स आढळण्याची अपेक्षा होती. कारण, तेथे प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. परंतु, बारातरिया बेमधील ग्रामीण डॉल्फिनच्या श्वासात देखील ‘मायक्रोप्लास्टिक्स’ आढळले, ज्याने हे सिद्ध केले की, हे प्रदूषक हवेद्वारे अगदी कमी विकसित भागांमध्येही पसरले जातात. डॉल्फिनच्या श्वासामध्ये सापडलेल्या अनेक ‘मायक्रोप्लास्टिक्स’मध्ये ‘पॉलिस्टर फायबर्स’ होते, जे आपले कपडे तयार करण्यासाठी वापरले जातात. गरम पाण्यात धुतल्यावर हे कृत्रिम कपडे ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण सोडतात, जे नंतर हवेत पसरतात. नवीन संशोधनात डॉल्फिन ‘मायक्रोप्लास्टिक्स’च्या संपर्कात कसे येतात आणि त्यांच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेण्यासाठी नवीन दृष्टिकोन दिला आहे.
 
जगभरातील सजीवांमध्ये हवा, पाणी आणि अन्नामधून ‘मायक्रोप्लास्टिक्स’चा परिणाम समजून घेण्यासाठी संशोधनाची नितांत गरज आहे. डॉल्फिनच्या श्वासामध्ये ‘मायक्रोप्लास्टिक्स’चा शोध लागणे, हा प्लास्टिक प्रदूषणाच्या दूरगामी परिणामांचा इशारा आहे. प्लास्टिकचा कचरा कमी करणे आणि त्याचे व्यवस्थापन सुधारणे, हे वन्यजीवांच्या आणि मानवी आरोग्याच्या रक्षणासाठी आवश्यक ठरणार आहे. सजीवांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा एक गंभीर इशारा असून, पुढील संशोधनाच्या आधारावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.
 

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.