गरिबीतून, समोर आलेल्या अडचणींमधून वाट काढत, यशाचे शिखर बघून देखील पाय जमीनीवर घट्ट रोवत उत्तुंग भरारी घेणार्या खेमचंद पाटील यांच्याविषयी...
'सिक्रेट’ या सिनेमात आणि पुस्तकातदेखील एका वाक्याचा उल्लेख आहे की, जेव्हा वाट अंधारमय आहे आणि त्या अंधार्या वाटेतून पुढे जाण्यासाठी फक्त तुमच्याकडे एक विजेरी आहे. तर खूप लांबवर लक्ष न देता जिथवर प्रकाश जातोय, त्या वाटेवर लक्ष देऊन चला. एकेदिवशी तुमची ऐच्छिक वाट नक्कीच मिळेल. नेमका असाच काहीसा संदर्भ खेमचंद यांच्या आयुष्यात सापडतो. विपरित आणि हालाखीची परिस्थिती, फारसे कुणाचे पाठबळ नसताना खेमचंद यांनी, आपला पत्रकारिता क्षेत्रातील प्रवास सुरु केला आणि आज साहित्यिक क्षेत्रात ते आपली एक जागा निर्माण केली आहे.
सतत हसतमुख आणि सदैव धडपड्या स्वभावाचे खेमचंद यांनी, पत्रकारितेलाच आपल्या जीवनाचे तत्वज्ञान बनवून, खेमचंद पाटील उपाख्य,बापू हंबर्डीकर हे नाव हंबर्डीसह पंचक्रोशीत व लेवा समाजात अल्पावधीतच लोकप्रिय केले आहे. कर्तृत्ववान पुरुष स्वतःच्या उत्कर्षाबरोबर समाजाच्या उत्कर्षासाठीही अहोरात्र झटतो, आणि आपल्या कर्तृत्वाचा असा काही ठसा उमटवितो की, त्याला समाज सहजपणे स्वीकारतो. खेमचंद त्यांपैकीच एक व्यक्तिमत्त्व आहेत. खेमचंद यांनी प्रामाणिकपणाच्या व कठोर परिश्रमाच्या साहाय्याने पत्रकारिता, लेखन, संपादन आणि साहित्य क्षेत्रात कार्य करून, नोकरी या विविधांगी क्षेत्रात अल्पवयातच आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
यावल तालुक्यातील हंबर्डी या छोट्याशा गावातील रहिवासी, गणेश आणि निर्मला पाटील या शेतकरी दाम्पत्याच्या घरी दि. 27 डिसेंबर 1992 रोजी, खेमचंद पाटील यांचा जन्म झाला. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे झाले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना, बालपणापासूनच व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून, वयाच्या 14व्या वर्षी घरोघरी जाऊन वृत्तपत्र टाकण्यास सुरुवात केली. नंतर कुल्फी-आईस्क्रीमची गावात विक्री केली. तसेच वडिलांच्या पानटपरी चालविण्याच्या व्यवसायात हातभारही लावला. या सर्व व्यवसायातून दिवसेंदिवस वाढत जाणार्या जनसंपर्कातून, त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
2011 मध्ये ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुकचे 67 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित होते. खेमचंद यांनी त्यांच्या शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी समाज कल्याण विभागात निरंतर प्रयत्न करावे लागले. यातूनच अचानकपणे त्यांच्या समाजकार्याचा श्रीगणेशा झाला. त्यांच्या या कामामुळे एका वृत्तपत्राचे संपादक प्रभावित झाले आणि त्यांच्या आग्रहामुळे तसेच मार्गदर्शनामुळे, पत्रकार म्हणून पत्रकारितेतील त्यांचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर त्यांनी धारदार लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडून, जनसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे.
खरं म्हणजे, 2016 साली भुसावळमध्ये आल्यापासून, खेमचंद यांच्या आयुष्याला नव्या उभारणीचा हातभार लागला.त्यांनी कधीच वैयक्तिक हितासाठी कामासोबत तडजोड केलेली नाही. काम कोणतेही असो वा कोणाचेही असो, ते गुणवत्तापूर्ण व उत्तमरित्याच पूर्ण व्हायला हवे, अशीच त्यांची कायम तळमळ असते. खेमचंद यांच्या परिवारात कोणीही साहित्यिक अथवा राजकारणी तसेच समाजसेवेचा वारसा अथवा पाठबळ नसतानासुद्धा त्यांनी घेतलेली गरुडझेप खूपच कौतुकास्पद आहे.
भुसावळमध्ये अल्पावधीतच नानाविध धर्म, पंथ, जातींच्या लोकांशी मैत्रीची नाती जपत ,समाजसेवा करत पत्रकारिता करत आदर्श घडविला. आजही ते जीवनात कुठल्याही संकटाला न घाबरता कठीण परिस्थितीवर मात करून सत्याचा मार्ग अनुसरून,कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करीत असतात.
खेमचंद यांचे स्वहस्तलिखित पहिले पुस्तक जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या, हंबर्डी गावाचा इतिहास गावस्थापनेपासून पुस्तकाच्या रूपाने ग्रामस्थांच्या समोर आणला. माजी महसुल व अर्थमंत्री एकनाथ खडसे व माजी आ. हरिभाऊ जावळे, रक्षा खडसे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले होते. ’आपले हंबर्डी गाव’ पुस्तकासाठी खेमचंद यांना नाशिक येथे महाराष्ट्र दीपस्तंभ सेवा पुरस्कार 2020 देऊन गौरवण्यात आले.
आज लेखन आणि सामाजिक सेवेत रस घेऊन त्यांनी लेखन व सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. सन 2014 ते 2018 पर्यंत त्यांनी जळगाव जिल्हा पत्रकारसंघाच्या सदस्यपदाची धुरा यशस्वी समर्थपणे सांभाळली. गावातील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी स्वखर्चाने खरेदी करून पुस्तके भेट देण्याचा उपक्रम राबवला.
लिखाण करण्यासाठी ते आजही रात्रंदिवस त्यांची धडपड चालू असते. त्यांनी लेवा सहित्यक रत्न, पाटील परिवार कुलवृत्तांत या पुस्तकाचे लेखन केले आहे.
साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात वाहून घेतलेल्या खेमचंद यांचा त्यांच्या मित्रपरिवारास अभिमान असणे साहजिकच आहे. आईवडिलांचे संस्कार हाच त्यांच्या जीवनातील दीपस्तंभआहे. त्यांना विविध पुस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. खेमचंद हे ‘अक्षरआनंद’ मासिकाचे सहसंपादक म्हणून कार्यरत आहेत. लेवा साहित्यरत्न पुरस्कार एकनाथ खडसे यांच्या हस्ते त्यांना , प्रदान करण्यात आला. उभारीतून भरारी घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे खेमचंद यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.