ब्रह्म वस्तूचे गुणविशेष

    02-Oct-2024   
Total Views |
brahma vastuche gunvishesh


मनाच्या श्लोकांतील श्लोक क्रमांक 146 ते 150 या पाच श्लोकांची शेवटची ओळ ‘मना संत आनंत शोधून पाहे’ अशी आहे, या श्लोकगटात निर्गुण बोधाचे दिग्दर्शन आहे, असे अभ्यासक सांगतात. या श्लोकांतून मुख्यतः हे सांगायचे आहे की, या जगातील अशाश्वत गोष्टींच्या नादी न लागता, आपण शाश्वत परब्रह्माचा अनंताचा शोध घ्यावा. त्यात खरे समाधान आहे. यासंबंधीचे विवेचन आपण मागील श्लोकात पाहिले. आता या अनंताचा शोध कसा घ्यायचा, हा आपल्यापुढील प्रश्न आहे. हे ईशतत्व, बह्मतत्व आहे तरी कसे? ते आपल्याला पाहाता येईल का अथवा त्याचा अनुभव कसा प्राप्त करुन घ्यावा? असे अनेक प्रश्न यासंबंधाने मनापुढे उभे राहतात. भारतीय तत्त्वज्ञान यावर विचार करते. पण, तरीही ब्रह्मतत्वाचे सर्वेक्षण त्यांना करता आले नाही.

ब्रह्मतत्वाला जाणण्याचा निश्चित उपाय त्यांनाही सांगता येत नाही. वेदांनाही या प्रश्नाचा निकाल देता आलेला नाही. ब्रह्मतत्वाचा शोध घेताना वेदही, ब्रह्म म्हणजे हे नाही, ब्रह्म म्हणजे ते नाही, असे सांगत असतात. तथापि, ब्रह्मतत्वाचा निश्चित उलगडा त्यांनाही करता आलेला नाही. ब्रह्मासंबधी माहिती देताना वेद ‘नेति नेति’ म्हणजे ‘न इति न इति’ एवढेच सांगतात. आता याबाबत स्वामी आपल्यासारख्या सामान्य माणसाला समजेल, अशा भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. सर्वप्रथम डोळ्यांनी दिसणार्‍या अनुभवास येणार्‍या नित्याच्या घटनांपासून सुरुवात करुन अनंताच्या ठिकाणी कोणते विशेष गुणधर्म आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच, ब्रह्माची अनुभती न येण्यामागचे कारणही सांगणार आहेत.

या जगातील प्रत्येक दृश्यवस्तू पंचमहाभूतांच्या साहाय्याने बनली आहे. त्यामुळे त्या विषयीचे भौतिकज्ञान हे पंचमहाभूतांच्या गुणाधिष्ठित म्हणजे अशाश्वताच्या ज्ञानाने सीमित असणार, हे उघड आहे. त्यातील सिद्धांत भौतिकशास्त्रज्ञानाला लावता येतात. तथापि, भौतिकशास्त्र सिद्धातांनी शाश्वत ब्रह्मवस्तूचा शोध घेता येणार नाही. सद्वस्तूचे ज्ञान हे अतींद्रिय ज्ञान असल्याने भौतिकवस्तूजाताचे सिद्धांत तेथे उपयोग पडत नाहीत. अतींद्रिय अनुभूती हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे. आता शाश्वत सद्वस्तूचे काही गुणधर्म स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.
 
फुटेना तुटेना चळेना ढळेना।
सदा संचले मीपणे तें कळेना।
तया येकरुपासि दूजें न साहे।
मना संत आनंत शोधूनि पाहे॥147॥
पंचमहाभूतांनी तयार झालेल्या दृश्यवस्तू आज ना उद्या नाश पावल्यावर आपापल्या भूतात समाविष्ट होणार आहेत. कोणतीही दृश्यवस्तू शाश्वत म्हणजे कायमस्वरुपी असू शकत नाही. स्वामी यापूर्वीच्या श्लोकात म्हणाले आहेत की, ‘पुढे सर्व जाईल कांही न राहे।’ आज डोळ्यांना दिसते ते सर्व नाश पावणार आहे. कायमस्वरुपी राहील म्हणून आपण जे उभारले, आकाराला आणले, तेही काळ क्षणार्धात मोडून काढू शकतो. त्याची शाश्वती देता येत नाही. फुटणे, तुटणे, विभक्त होणे, विघटित होणे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, ढासळणे स्थानभ्रष्ट होणे, या सर्व क्रिया आकाराला आलेल्या दृश्यवस्तूंच्या ठिकाणी आढळून येतात. तथापि परब्रह्म सदवस्तू ही काही पंचमहाभूतातून निर्माण झालेली नाही. त्यामुळे दृश्यवस्तूंच्या क्रिया, गुणधर्म सद्वस्तूच्या ठिकाणी संभवत नाहीत. परब्रह्म हे पंचमहाभूतातीत आहे. ही त्याला जाणण्याची पहिली पायरी होय. म्हणून स्वामी या श्लोकाच्या पहिल्या ओळीत सांगतात की, सद्वस्तू फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही किंवा ढळत नाही. ती आहे तशीच असते. भगवद्गीतेत सांख्यतत्वज्ञानातील आत्म्याचे वर्णन करताना भगवंतांनी अशाच स्वरुपाची भाषा वापरली आहे.

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥2.23॥
गीता सांगते, आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत. अग्नी त्याला जाळत नाही. पाणी त्याला भिजवत नाही किंवा वारा त्याला सुकवत नाही. असा हा आत्मा नित्य सर्वव्यापी, अचळ, सनातन आहे. ब्रह्मतत्व सर्वत्र संचारलेले आहे. सर्वत्र त्याचा संचार आहे. त्याच्याशिवाय रिकामी जागा नाही. इतके ते सूक्ष्म आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असे पंचमहाभूतांचे वर्णन केले जाते. या पंचमहाभूतांतील आकाशतत्व हे सूक्ष्म असून सर्व जागा व्यापते. त्याचाही संचार सर्वत्र असतो. आकाशतत्त्वाने पृथ्वीतलावरील सर्व जागा व्यापली आहे. एवढेच नव्हे, पृथ्वीभोवतालच्या वातावरणातही आकाशतत्व भरुन राहिले आहे. या आकाशतत्त्वाच्या माध्यमामुळे ध्वनी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत जाऊ शकतो.

तथापि ब्रह्मतत्व अथवा सद्वस्तू आकाशतत्वाहूनही सूक्ष्म आहे. ते सर्वत्र व्यापून उरले आहे. आकाशतत्वाची व्याप्ती मर्यादित आहे. ब्रह्म, सद्वस्तू अतिसूक्ष्म असल्याने त्याच्या व्याप्तीला मर्यादा नाही. पण, आपल्याला सहजगत्या सद्वस्तू अनुभवता येत नाही. सद्वस्तूचा सर्वत्र संचार असूनही आपल्या मीपणामुळे आपल्याला ते कळत नाही. आपला ‘मीपणा’ बाजूला सारुन आपण अतींद्रियज्ञानाच्या प्रांतात प्रवेश केल्याशिवाय अतिसूक्ष्म ब्रह्मानुभूती शक्य होत नाही. ‘सदा संचले मीपणे ते कळेना’ अशा सोप्या शब्दांत स्वामी त्याचा उलगडा करतात. थोडक्यात ब्रह्मानुभूतीसाठी जो अतींद्रिय अनुभव लागतो. त्याच्याआड मीपणा म्हणजे अहंकार देहबुद्धी येतात, सद्वस्तूसारखी दुसरी अन्य वस्तू नाही. सर्वसाधारणपणे भौतिक व्यवहारात एखादी माहीत नसलेली गोष्ट समजून सांगण्याकरिता आपण तत्सम गुणांची दुसरी गोष्ट स्पष्ट करुन त्यावरुन माहीत नसलेली गोष्ट जाणण्याचा प्रयत्न करतो.
 
परंतु, येथे सद्वस्तूसारखी अतिसूक्ष्म सर्वव्यापी दुसरी कोणतीही वस्तू नसल्याने त्या वस्तूवरुन सद्वस्तू जाणता यावी, ही शक्यता मावळते. म्हणून स्वामी म्हणतात की, ‘तया येकरुपासि दुजें न साहे’ ब्रह्मासारखी दुसरी गोष्ट असूच शकत नाही. वस्तुतः ज्या ज्या आहेपणाच्या गोष्टी आपण पाहातो. त्या सार्‍या ब्रह्मातून निर्माण होतात व त्यातच लय पावतात. ब्रह्म चैतन्याने ओतप्रोत भरलेले आहे. म्हणून त्यातून अचेतन वस्तू निर्माण होतात व त्याच चैतन्यात विराम पावतात. पंचमहाभूतात्म हे जग त्या चैतन्याचा आविष्कार आहे. अचेतन समजल्या जाणार्‍या प्रत्येक वस्तूच्या अंतरंगात चैतन्याचा वास असतो. हे ओळखण्यासाठी सूक्ष्म ज्ञानदृष्टी लागते. आधुनिक विज्ञानशास्त्रही अणूच्या अंतरंगातील प्रचंड ऊर्जाशक्तीचा शोध घेत आहे. त्या चैतन्यशक्तीला सद्वस्तूला संत जाणतात व अक्षय आनंदाची प्राप्ती करुन घेतात. आपणही चिरंतन समाधानासाठी भौतिक विनाशी सुखाच्या शोधात वेळ न घालवता शाश्वत परब्रह्माचा सद्वस्तूचा शोध घेतला पाहिजे. यासाठी ‘संत आनंत शोधूनि पाहे’ असे मनाला सांगावे, असे स्वामी म्हणतात.
7738778322

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..