आपच्या विषारी राजकारणामुळे दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात – भाजपचा आरोप

    19-Oct-2024
Total Views |

shehzad poonawalla
 
 ( Image Source : ANI News ) 
 
नवी दिल्ली : ( Shehzad Poonawalla ) देशाच्या राजधानीत दिल्लीच्या विविध भागांमध्ये धुरके पसरण्यास प्रारंभ झाला असून हवेची गुणवत्ता वेगाने खालावण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचप्रमाणे यमुना नदीतही प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) विषारी कारभारामुळे दिल्लीकरांना वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केला आहे.
 
शनिवारी सकाळी राष्ट्रीय राजधानीच्या अनेक भागांमध्ये धुक्याचा थर दिसून आला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसारइंडिया गेटजवळ २५१, नेहरू पार्कजवळ २०९, आयटीओजवळ २२६, भिकाजी कामा प्लेसजवळ २७३ आणि एम्सजवळ २५३ एक्यूआय नोंदवला गेला. हा एक्यूआय सर्वांत खराब श्रेणीत येतो.
 
ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (जीआरएपी) निर्बंधांचा पहिला टप्पा १५ ऑक्टोबर रोजी दिल्लीत खराब झालेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे लागू झाला आहे. धूळ कमी करण्यासाठी वारंवार पाण्याने रस्ते स्वच्छ करणे यासारख्या उपाययोजना आधीच सुरू आहेत.
 
दरम्यान, दिल्लीतील वायू प्रदूषणास सत्ताधारी आप जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणाले, यमुना नदीचे पाणी विषारी झाले आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २०२५ पर्यंत यमुना नदी स्वच्छ करणार असल्याचे सांगितले होते. छठपूजा साजरी करताना लोकांना त्यामुळे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आपच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी मिळालेला सर्व पैसा जाहिरातींवर खर्च केला. आता ते प्रदूषणासाठी उत्तरप्रदेश आणि हरियाणातील जनतेला दोष देत आहेत. दिल्लीतील विषारी हवा आणि यमुना नदीचे विषारी पाणी यास आपचे विषारी राजकारण कारणीभूत असल्याचाही टोला पुनावाला यांनी लगावला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121