पश्चिम घाटामधून किंग कोब्राच्या नव्या प्रजातीचा शोध; महाराष्ट्रातील प्रजातीला दिले 'हे' नाव

मूळ प्रजातीचे चार प्रजातींमध्ये विभाजन; शंकराच्या गळ्यातील सापाच्या नावे नामकरण

    18-Oct-2024   
Total Views |
western ghat king cobra


मुंबई (अक्षय मांडवकर) -
भारतातील सरीसृप शास्त्रज्ञांनी किंग कोब्राच्या मूळ प्रजातीचे विभाजन करुन या सापाच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे (western ghat king cobra). 'टॅक्सोनाॅमी' म्हणजेच वर्गीकरणशास्त्राच्या अभ्यासानंतर पश्चिम घाटात आढळणाऱ्या किंग कोब्रा सापाचे नाविन्य ओळखून संशोधकांनी या प्रजातीचे नामकरण 'आॅफिओफॅगस कलिंगा' असे केले आहे (western ghat king cobra). शिवशंकराच्या गळ्यातील सापाला कानडी भाषेत 'कलिंगा' म्हणतात. त्यावरुन या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. (western ghat king cobra)


किंग कोब्राचा अधिवास हा प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळतो. यामध्ये नेपाळ, भारत (उत्तराखंड, दक्षिण भारत, पश्चिम व पूर्व घाट, दक्षिण महाराष्ट्र) दक्षिण चीन, फिलीपिन्स, इंडोनेशिया या देशांचा समावेश होतो. या संपूर्ण प्रदेशात आढळणाऱ्या किंग क्रोबा सापाला 'आॅफिओफॅगस हॅना' या शास्त्रीय नावाने ओळखले जात होते. मात्र, आता सरीसृप शास्त्रज्ञांनी गुणसूत्र चाचणी आणि आकारशास्त्राच्या आधारे या प्रजातीची फोड चार प्रजातींमध्ये केली आहे. या माध्यमातून त्यांनी भारतामधील पश्चिम घाट आणि उत्तर फिलीपिन्समधील लुझोन बेटावर आढळणाऱ्या प्रजातीला नवीन प्रजातीचा दर्जा दिला आहे. हे संशोधन इंद्रनील दास, पी.गौरी शंकर, प्रियांका स्वामी, रियानाॅन सी. विलियम्स, हमर त्लाॅमटे लालरेमसंग, पी.प्रशांत, गुणनिधी साहू, एस.पी.विजयकुमार, जेकब हाॅगलंड, कार्तिक शंकर, सुशील के. दत्ता, एस.आर.गणेश आणि वुल्फगॅंग वुस्टर यांनी केले असून यासंबंधीचे संशोधन वृत्त नुकतेच 'युरोपियन जर्नल आॅफ टॅक्सोनाॅमी'मध्ये प्रसिद्ध झाले आहे.


यापुढे पूर्व पाकिस्तान, उत्तर आणि पूर्व भारत, अंदमान बेट, इंडो-बर्मा आणि इंडो-चीन, दक्षिण ते मध्य थायलंड परिसरात आढळणारी किंग कोब्राची प्रजात ही 'आॅफिओफॅगस हॅना' या शास्त्रीय नावाने आणि 'उत्तरी किंग कोब्रा' या सामान्य नावाने ओळखली जाईल. सुंदा क्षेत्र, मलयन द्वीपकल्प, ग्रेटर सुंदा बेट आणि दक्षिण फिलीपिन्सच्या काही भागामध्ये आढळणारी प्रजात ही 'आॅफिओफॅगस बंगरस' या नावाने ओळखली जाईल. 'सुंदा किंग कोब्रा' या सामान्य नावाने या प्रजातीची ओळख असेल. फिलीपिन्समधील लुझोन बेटावरच आढळणाऱ्या किंग कोब्राची सामान्य नावाने ओळख 'लुझोन किंग कोब्रा' अशी असेल, तर शास्त्रीय नाव 'ओफिओफॅगस सालवताना', असे असणार आहे. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणाऱ्या सापाला 'वेस्टर्न घाट किंग कोब्रा' असे सामान्य नाव देण्यात आले आहे. या चारही प्रजातीचे वर्ण वेगवेगळे आहेत. शिवशकंराच्या गळ्यातील साप हा काळा असतो आणि त्याला कानडी भाषेत 'कलिंगा' म्हणतात. पश्चिम घाटात आढळणारा किंग कोब्रा हा काळसर रंगाचा असल्याने संशोधकांनी त्याचे नामकरण 'आॅफिओफॅगस कलिंगा', असे केले आहे.


महाराष्ट्रातही 'कलिंगा'च
पश्चिम घाटाचा विचार हा दक्षिणेकडून केल्यास या क्षेत्रात आढळणाऱ्या किंग कोब्राची सर्वात उत्तरेकडची नोंद दक्षिण महाराष्ट्रातील दोडामार्ग आणि चंदगड या दोन तालुक्यांपुरतीच मर्यादित आहे. म्हणजे महाराष्ट्रात या दोन तालुक्यामध्येच किंग कोब्रा आढळतो. महाराष्ट्रात या सापाला भुजंग, नागराज, डोम अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. आता पश्चिम घाटात आढळणाऱ्या किंग कोब्राचे विभाजन नव्या प्रजातीमध्ये केल्याने महाराष्ट्रामध्ये आढळणारा किंग कोब्रा देखील आता 'आॅफिओफॅगस कलिंगा' या नावानेच ओळखला जाईल.



'कलिंगा' का वेगळा ?
'वेस्टर्न घाट किंग कोब्रा'च्या खालच्या जबड्यावरील दातांची संख्या (१२) ही 'उत्तरी किंग कोब्रा'च्या दातांच्या (१८ ते २१) संख्येपेक्षा कमी आहे. किशोरवयीन 'वेस्टर्न घाट किंग कोब्रा'च्या शरारीरावरील पट्टे (२८ ते ४८) हे किशोरवयीन 'सुंदा किंग कोब्रा' (५७ ते ८७) आणि 'लुझोन किंग कोब्रा'च्या (८५ ते ८६) शरीरावरील पट्ट्यांपेक्षा कमी आहेत.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.