भारताचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा किती पुरातन आहे, याची अभ्यासपूर्ण माहिती जगभर भ्रमंती करून उलगडून सांगणार्या सुनील शिवाजीराव भोसले यांच्याविषयी...
सुनील शिवाजीराव भोसले यांचा जन्म दि. २१ ऑगस्ट, १९६१ साली बेळगावमध्ये झाला. वडील एलआयसीमध्ये अभियांत्रिकी विभागात नोकरीला असल्याने त्यांची कायम बदली होत असे, तर त्यांची आई गृहिणी होती. सुनील यांचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण कानपूरमध्ये झाले. अभ्यासातील गती सामान्य असली तरी, सुनील यांना खेळांमध्ये विशेष आवड होती. टेबल टेनिसमध्ये त्यांनी अगदी राज्यपातळीवरही यश मिळवले होते.
इयत्ता दहावीनंतर वडिलांची बदली मुंबईला झाली. पुढचे इयत्ता बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण पाचगणी येथून घेतले. जंगल, वनांसाठी काम करायचे किंवा वडिलांसारखे अभियांत्रिकी शाखेत करिअर करायचे, असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. वडिलांबरोबर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सुनील अनेकदा जात असे, त्यामुळे त्यांना या क्षेत्राचीतशी आवड होतीच. वडिलांची जिथे जिथे बदली व्हायची, तेथील ऐतिहासिक वास्तूंना सुनील यांचे वडील, आवर्जून भेट देत असत. त्यामुळे तीच आवड सुनील यांनाही निर्माण झाली. सुनील यांनी अभियांत्रिकी शाखेत जाण्याचे निश्चित करत, बेळगाव येथून १९८४ साली सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. पुढे नोकरीच्या शोधात ते पुण्यात आले. एका बांधकाम व्यावसायिकाकडे त्यांनी पाच वर्ष नोकरी केली. त्यांचा पहिला पगार फक्त १ हजार, २०० रूपये इतका होता. पुढे विवाहानंतर त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. यातही मन न रमल्याने, १९९१ साली ते सौदी अरेबियाला नोकरीनिमित्त गेले. प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम केल्यानंतर सुनील, बहरीन आणि त्यानंतर दुबईत नोकरीला लागले. पत्नीदेखील शिक्षण क्षेत्रात दुबईत कार्यरत होती. सुनील आणि पत्नी अशा दोघांनाही, पुरातन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले अशा गोष्टींविषयी विशेष आकर्षण होते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याची त्यांची आवड होती. दोघांचे विचारही अगदी एकमेकाला पुरक असेच होते. २००० साली भोसले दाम्पत्य फ्रान्सची राजधानी पॅरिसला गेले.
ज्याठिकाणी इतिहास, संस्कृती आहे, अशा ठिकाणांना त्यांनी भेटीही दिल्या. फ्रान्सविषयी जे ऐकले होते, तसे काहीही नव्हते. जसे भारतात कुटुंब मिळून मिसळून राहतात, तसेच चित्र सुनील यांना फ्रान्समध्ये दिसले. स्वित्झर्लंड, केनिया, जॉर्डन, टर्की, रशिया, चीन, जर्मनी, इटली, ओमान, ग्रीस, कंबोडिया, थायलंड, भूतान, श्रीलंका, म्यानमार, उझबेकिस्तान, अझरबैजान, पेरू अशा अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. कारण एकच, या देशातील भारतीय संस्कृतीचा धांडोळा घेणे. २००७ साली ते भारतात परतले आणि पुण्यात त्यंनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. स्वतःचे घरही त्यांनी सजवले. विशेष म्हणजे, सुनील यांनी जगभर जी भ्रमंती केली, अशा विविध देशांतील संस्कृतीला त्यांनी एका ठिकाणी आणले. त्यांच्या बंगल्यात विविध देशांतील संस्कृतींची झलक पाहायला मिळते. भूमी आपली देवी आहे. प्रत्येक गोष्ट भूमीत मिसळते. म्हणून हा बंगला त्यांनी आधीच प्रामाणिकपणे देवीला अर्थात भूमीला सुपूर्द करत, बंगल्याला भूमी असे नाव दिले. सुनील यांनी युनेस्कोच्या जवळपास सर्व हेरिटेज स्थळांना भेटी दिल्या आहेत. आपली भारतीय संस्कृती फार मोठी आहे. इतकी चांगली मंदिरे आहेत, वैदिक ज्ञान आहे. मात्र, आपण कधीही इतर देशांसारखे आमच्याकडे हे आहे, ते आहे असे सांगत बसत नाही. याच अनुषंगाने मंदिराचा अभ्यास करून त्यांनी, आपल्या भारतीय संस्कृती, ऐतिहासिक वास्तू अशा गोष्टींची माहिती सामान्यांना मिळावी, यासाठी ‘सुपरवंडर्स भारतम्’ हे युट्यूब चॅनल सुरू केले. त्यांच्या या उपक्रमाला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद मिळाला. भारताचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा किती पुरातन आहे? आपली संस्कृती कुठपर्यंत पोहोचली आहे? हे जगाला कळावे, हाच चॅनल सुरू करण्यामागील सुनील यांचा हेतू होता. विशेष म्हणजे सुनील हे अगदी इंग्रजीमध्येही माहिती देतात.
बांधकाम कसे केले असणार, त्यासाठी कोणती पद्धत वापरली, मंदिर तथा स्थान कोणत्या देवासाठी वा कारणासाठी प्रसिद्ध आहे, हे मंदिर इतक्या जुन्या काळात कसे बांधले असणार, ही कला कुठून आली अशी विविध माहिती संकलित करून, ते आपल्या चॅनेलद्वारे सांगतात. सर्वप्रथम त्यांनी कैलास मंदिराला भेट देऊन, अभ्यास करून त्याविषयीचा व्हिडिओ बनवला. सुनील यांच्या पत्नी संयुक्ता यादेखील वेद अभ्यासक असून, त्यादेखील या कामी मदत करत असतात. भविष्यात अगदी मंदिरांवरील माहितीविषयक अगदी छोटी-छोटी पुस्तके प्रकाशित करण्याचा, सुनील यांचा मानस आहे. इराकमध्येही आपली संस्कृती पोहचली असून, तिथेही त्यांना जायचे आहे. मात्र, तेथील राजकीय अस्थिरतेमुळे ते शक्य होत नाही.
भारतीय मंदिरात अगदी सखोल आणि आकर्षक नक्षीकाम असते. तसेच मंदिरे वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवून, बांधलेली आढळतात. तसेच, ही मंदिरे बांधताना वास्तुशास्त्राचाही सखोल विचार केलेला असतो. आपली संस्कृती, इतिहास याबद्दल अनेकांनी चुकीची माहिती पसरवली आहे. मात्र, पुन्हा नव्याने अभ्यास करून खरे तथ्य भारतीय आणि जगासमोर आणणे, यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे सुनील भोसले सांगतात. जगभर भ्रमंती करत भारतीय संस्कृतीचा धांडोळा घेऊन, ती जगासमोर आणणार्या सुनील भोसले या हुरहुन्नरी व्यक्तिमत्वाला आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!