बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर तेथील इस्लामिक कट्टरपंथीकडून, हिंदू अल्पसंख्याकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आजही होतोच आहे. हिंदूंचे सण आले की, यांचे फोफावते आणि हिंदू सणांना गालबोट लावण्याचा प्रयत्न होतो. बांगलादेशचे नवे सरकारही, हिंदूंना केवळ सुरक्षा देण्याच्या बाता मारतात.
परंतु, इस्लामिक कट्टरपंथींविरोधात कुठलीच कठोर भूमिका घेताना दिसले नाहीत. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवातही येथील मंडपांवर, मिरवणुकीवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेशात दुर्गापूजेदरम्यान बॉम्बस्फोट, मुर्तींभंग अशा एकूण 35 जातीय घटना घडल्याने, येथील हिंदू अल्पसंख्याक समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुर्गापूजेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न तर अगदी मुंबईतसुद्धा घडल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी धार्मिक असहिष्णुतेचा धोका वाढत चालला असून, त्याविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेच यातून दिसून येते.
बांगलादेशातील नवरात्रोत्सव यंदा हिंदूंकरीता अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत गेला. संपूर्ण बांगलादेशात एकूण 32 हजार मंडप उभारले होते. मात्र, नवरात्र सुरू होण्यापूर्वीच कट्टरपंथी इस्लामिक संघटनांनी दुर्गापूजेच्या कार्यक्रमांना धमक्या दिल्या होत्या. ’इन्साफ कीमकारी छात्र-जनता’ या इस्लामिक संघटनेने की, दुर्गापूजेच्या सुट्ट्या रद्द न केल्यास आणि मूर्ती विसर्जनासारखे उपक्रम थांबवले नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी सरकारला उघड धमकी दिली. या संघटनेची आणखी एक मागणी आहे की, भारत हा बांगलादेशचा राष्ट्रीय शत्रू असल्याने बांगलादेशातील हिंदू नागरिकांनी भारताचा विरोध करत, पंडाल आणि मंदिरांमध्ये भारतविरोधी बॅनरबाजी करत घोषणा द्याव्या..
उल्लेखनीय आहे की, बांगलादेशमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दुर्गापूजा आयोजित केली जाते. यामध्ये हिंदू समुदाय पूर्ण उत्साहाने सहभागीही होतो. दुर्गापूजा हा हिंदू धर्माचा प्रमुख सण असून, बांगलादेशातील आठ टक्के हिंदू लोकसंख्येद्वारे तो साजरा केला जातो. पण यंदा काही कट्टरतावादी गटांनी धमक्या देऊन, हिंदू समाजात भितीचे वातावरण निर्माण केले होते. बांगलादेशात दुर्गापूजेदरम्यान तणाव निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांत हिंदू समाजाला दुर्गापूजेच्या वेळी, अशा धमक्या आणि हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. 2021 साली दुर्गापूजेदरम्यान, कट्टरपंथीयांनी अनेक पूजा मंडपांवर आणि हिंदू मंदिरांवर हल्ले केले होते. या हल्ल्यानंतर बांगलादेशवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका झाली आणि हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनेचे आवाहन बांगलादेश सरकारला करण्यात आले.
दि. 9 ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील चितगाव येथील दुर्गापूजा मंडपात काही गैर हिंदू तरुणांनी देशभक्तीपर गाणी गाण्याच्या बहाण्याने आयोजकांकडून परवानगी घेत, इस्लामिक क्रांतीचा प्रचार सुरू केला. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दि. 11 ऑक्टोबर रोजी ढाकाच्या ताती बाजार परिसरात, दुर्गापूजा मंडपावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला होता. बांगलादेशातील केवळ हिंदूच नाही, तर बौद्ध समाजही इस्लामिक कट्टरवाद्यांचे लक्ष्य बनला. कट्टरतावाद्यांमुळे बौद्ध समाजाला आपला प्रमुख सण ’कथिन चिवर दान’ रद्द करावा लागला होता.
हे झाले बांगलादेशातले, मुंबईतसुद्धा नालासोपारा आणि मालाड मालवणी परिसरात, धर्मांधांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. नालासोपार्याच्या एका सोसायटीत गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान सोसायटीतील गैरहिंदूंनी बाधा आणत, हिंदूंना त्यांचे सण साजरे करण्यापासून रोखले होते. तर मालाड मालवणीत काही धर्मांधांनी दुर्गामातेच्या मंडपात घुसून, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप येथील हिंदू समाजाने केला होता. विशेष म्हणजे या घटनेनंतर मोठ्या धैर्याने प्रतिक्रिया देत एकजुटीने या घटनेचा सामना हिंदूंनी केला. त्यामुळे हिंदू पळून जाणार नाही, तर पराक्रम दाखवतील अशा प्रकारचा संदेश याठिकाणी आता जागृत झाला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सुद्धा, विजयादशमीच्या उद्बोधनात अशा हल्ल्यांचा उल्लेख करत, जगभरातील हिंदूंना संघटित होण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यानुसार आता हिंदू रस्त्यावर उतरून, इस्लामिक कट्टरपंथींच्या आव्हानांवर मात करताना दिसतो आहे. असे झाल्यास कट्टरपंथींचा जिहादीवृत्तीचा नायनाट होईल हे नक्की.