दिव्यांग अन्नदाता

    13-Oct-2024   
Total Views |
 
Handicaped Vikya Parhade
 
पोलिओ रोगामुळे बालपणी आलेल्या अपंगत्वावर मात करुन आदिवासी भागात अन्नदानाचा पवित्र यज्ञ चालवणार्‍या विलास पर्‍हाड यांची संघर्षमय जीवनाची कहाणी...
 
विलास विक्या पर्‍हाड यांचा जन्म १९ मे १९८४ मध्ये, डहाणू तालुक्यातील धानीवरी, कडूपाडा या अतिशय मागासलेल्या आदिवासी पाड्यावर झाला. ज्या वयात मूलं चालायला शिकते, त्याच वयात विलास यांना पोलिओे या रोगाचे निदान झाले आणि तेव्हापासून त्यांना कायमचे अधूपण आले. त्यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण धुंदलवाडी येथे, तर इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण तलासरीमधल्या ठक्कर बाप्पा विद्यालयात झाले. घरात अतिशय गरीब परिस्थिती, त्यात भरीला असलेले अपंगत्व. शालेय शिक्षण सुरू असताना विलास हे दिवाळी अणि उन्हाळी सुट्टीत, ’हॉटेल रूपा’मध्ये रात्री ८ते सकाळी ८ या वेळेत भांडी घासायचे काम करत. त्यावेळी त्यांना दिवसाला दहा रुपये रोजंदारी मिळत असे. इयत्ता आठवी ते दहावी या कालावधीत विलास हे वनवासी कल्याण आश्रमात वास्तव्यास होते. हे ठिकाण त्यांच्या प्रशालेपासून खूप अंतरावर होते. बालपणापासून पोलिओ झाल्याने त्यांना, काठीचा आधार घेऊन चालावे लागत असे. अशावेळी वसतिगृह ते शाळा हे अंतर पार करताना, दप्तर नसल्याने त्यांना शाळेची वह्या, पुस्तके घेऊन चालणे अवघड होत असे. त्यांचा वसतिगृहातील मित्र नरेश तांबडा हे त्यांना मदत करायचे.
ज्या रूपा हॉटेलचे मालक खिमला भाई पटेल हे विलास यांना शैक्षणिक साहित्य, कपडे आणि आर्थिक मदत करत. तीन वर्ष वनवासी कल्याण आश्रमात असताना, तेथील अधीक्षक अप्पा जोशी यांच्या कार्याचा अणि विचारांचा विलास यांच्यावर मोठा प्रभाव होता.
 
आर्थिक अडचणींमुळे विलास यांना दहावी नंतर शाळा सोडली. त्यानंतर डहाणूमधल्या एका फुलाच्या दुकानात मदतनीस म्हणून विलास काम करू लागले. २००१ साली या फुलांच्या दुकानात ‘लायन्स क्लब ऑफ डहाणू’चे सदस्य रमेश कर्नावट अणि सुरेश जोशी खरेदी करण्यास येत असत. दोघांशी विलास यांची चांगली ओळख झाली. त्यांनीच विलास यांना ‘लायन्स क्लब ऑफ डहाणू’च्या कार्यालयात शिपाई पदावर रुजू करून घेतले. सुरूवातीचे सहा महिने प्रशिक्षण घेतल्यावर, महिना १५००/- मानधन त्यांना मिळू लागले. २००५ साली विलास यांना ‘लायन्स क्लब’ने कार्यालय परिसरात राहायला जागा दिली. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह झाला. त्यांच्या कामात पत्नी देखील मदत करू लागली. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मुलीचा जन्म ‘लायन्स क्लब’ येथेच झाला. ‘लायन्स क्लब’ने कामात सहजता यावी म्हणून त्यांना, तीनचाकी सायकल देखील दिली. २०१९ सालापर्यंत त्यांनी ‘लायन्स क्लब’ची नोकरी केली.
 
‘इंडियन डेव्हलपर्स फाऊंडेशन मुंबई’ या संस्थेकडून धानीवरी आणि आजूबाजूच्या चारोटी, अंबोली या आदिवासी गावांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवले जायचे. या कामात विलास यांनी स्वतःला गुंतवून घेतले. मुंबईतील शशांक शेट्टी अणि रूपा शेट्टी डहाणूमध्ये आले. कडूपाडा येथील जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेतील सुमारे ४६ विद्यार्थ्यांना त्यांनी, वर्षभर पुरेल एवढे शैक्षणिक साहित्य भेट दिले. विलास यांनी नंतर त्यांना आजूबाजूच्या गाव पाड्यातील आठ शाळा दाखवल्या.
 
लॉकडाऊनमध्ये शशांक शेट्टी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त, विलास यांना एक हजार रुपये देणगी पाठवली. या एक हजार रुपयात त्यांनी कडूपाडा प्राथमिक शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना अन्नदान केले. या अन्नदानाचे फोटो विलास यांनी शेट्टी यांना पाठवले. शशांक यांनी ते व्हॉट्स अ‍ॅपवरुन शेअर केले असता, त्यातून देणगीदारांचा ओघच सुरू झाला. आज ३८ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेले हे अन्नदानाचे काम, दररोज सुमारे २५० ते ३०० या संख्येवर ‘इंडियन डेव्हपर्स फाऊंडेशन’ आणि ‘सोवो फाऊंडेशन’ या संस्थांच्या पाठबळावर पोहोचले आहे. दररोज पहाटे साडे चार वाजता विलास यांच्या दिवसाची सुरूवात होते. दररोज स्वयंपाक बनवायची मुख्य जबाबदारी विलास यांच्या पत्नी सांभाळतात. गावातील दोन मुलींनाही त्यांनी रोजगार दिला आहे. सुमारे २२ आदिवासी पाड्यांवर विलास स्वतः अन्नाचे वाटप करतात.
 
‘अन्नदान योजने’त दुपारचे एक वेळचे जेवण मोफत दिले जाते. यामध्ये भात, आमटी एक भाजी अणि एक केळं याचा समावेश असतो. कधीतरी सणासुदीला देणगीदारांच्या इच्छेनुसार फराळ मिठाई, याचेही वाटप होते. गेली पाच वर्षे विलास आणि त्यांचे कुटुंबीय हे सेवाभावी काम करत आहेत. परंतु, शासकीय किंवा राजकीय पातळीवर अद्याप त्यांच्या कामाची कोणीही दखल घेतलेली नाही, याची त्यांना फार खंत आहे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना पदवीपर्यंतचे शिक्षण दिले आहे. त्यांचा मुलगा आपल्या वडिलांच्या कामातच मदत करत आहे. वाणिज्य शाखेची पदवीधर असलेल्या त्यांच्या मुलीला बँकिंग क्षेत्रात करिअर करायची इच्छा आहे, पण, अद्याप तशी संधी तिला मिळाली नाही. आपण आज पर्यंत जे साध्य करू शकलो, त्याचे श्रेय ते आपल्या पत्नीस देतात. वर्षभर विलास हे कार्य अविरत करत आहेत हे विशेष.
 
विलास यांना स्वतःची एक संस्था स्थापन करायची असून, या माध्यमातून त्यांना आदिवासी पाड्यातील नागरिकांसाठी ‘मोफत आरोग्य सेवा’पुरवायची आहे. आपले अन्नदानाचे कार्य आपल्या पश्चातही अमर राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी त्यांना शेकडो मदतीच्या हातांची गरज आहे.
 
आलेल्या अपंगत्वामुळे खचून न जाता, समाजसेवेचे व्रत अंगिकारलेल्या विलास पर्‍हाड यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून खूप खूप शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क-9307185662)