बीजिंगच्या पाणीदार भविष्यासाठी

    12-Oct-2024
Total Views | 53

china
 
चीनमधील दक्षिण-उत्तर जल हस्तांतरण प्रकल्पाच्या मध्य मार्गाने कार्य सुरू केल्यापासून, बीजिंगला एकूण दहा अब्ज घनमीटर पाणी हस्तांतरित केले गेले आहे. यापैकी सात अब्ज घनमीटर थेट शहरी घरगुती पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात आल्याने, हा प्रकल्प आता बीजिंगसाठी मुख्य जलस्रोत बनला आहे. बीजिंग जल प्राधिकरणानुसार, शहरातील १६ दशलक्षाहून अधिक लोकांना या प्रकल्पाचा थेट फायदा होत आहे.
 
चीनमधील दक्षिण-उत्तर जल हस्तांतरण प्रकल्प वर्ष २००२ वर्षाच्या शेवटी सुरू झाला. हा प्रकल्प “चायना साउथ-टू-नॉर्थ वॉटर डायव्हर्शन कॉर्पोरेशन लिमिटेड”च्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. या प्रकल्पात देशाच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये, दक्षिणेकडील यांग्त्झे नदीचे पाणी वळवून पाणी टंचाई दूर करण्यासाठी, हा प्रकल्प आखण्यात आला. हा संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास केला असता, जागतिक स्तरावर अशा प्रकारचा सर्वात मोठा जल हस्तांतर प्रकल्प आहे. यामध्ये हजारो मैलांचे बोगदे आणि कालवे मोठ्या अंतरावर पाणी वाहून नेण्यासाठी बांधण्यात आले आहे. हा प्रकल्प वर्ष २०५० साली पूर्ण होणार आहे. चीनच्या पूर्व, मध्य आणि पश्चिम अशा तीन मुख्य मार्गांचा समावेश असलेला, हा प्रकल्प चीनच्या विविध भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीवर आधारित आहे. या प्रकल्पाच्या बांधकामामध्ये अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रे आणि महत्त्वपूर्ण पायाभूत विकासाचा समावेश आहे. जे या प्रकल्पाची आव्हाने आणि प्रमाण दर्शवते. अब्जावधी डॉलर्सच्या खर्चासह, दक्षिण-उत्तर जल हस्तांतरण प्रकल्पातील आर्थिक गुंतवणूक भरीव आहे, ज्याचे उद्दिष्ट १०० दशलक्ष लोकांसाठी पाणी राखणे आहे. हा पाणीपुरवठा शेतीसाठी आणि चीनच्या उत्तरेकडील शुष्क प्रदेशांमध्ये आर्थिक विकासाला चालना देणारा असेल. या प्रकल्पाचे अनेक फायदे असूनही, या प्रकल्पाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. ज्यात पर्यावरणविषयक चिंता आणि बांधकामामुळे मोठ्या समुदायांचे विस्थापन यांचा समावेश आहे. यासोबतच प्रकल्पाची अभियांत्रिकी आणि लॉजिस्टिक संबंधीत आव्हानेही आहेत. चीनच्या जलसमृद्ध अशा दक्षिणेकडून, त्याच्या शुष्क उत्तरेकडे पाण्याचा यशस्वी प्रवाह वळविणे सुनिश्चित करण्यासाठी, प्रगत जल व्यवस्थापन तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे.
 
बीजिंग जल प्राधिकरणाने म्हटले आहे की, “मध्य मार्गातून येणार्‍या पाणीपुरवठ्यासह बीजिंगने जलस्रोत हमी प्रणाली प्रभावीपणे स्थापित आणि कार्यान्वित केली आहे. ज्यामध्ये वळवलेले पाणी, पृष्ठभागावरील पाणी, भूजल, पुर्नसंचयित पाणी आणि पावसाचे पाणी, वैज्ञानिक आणि अचूक जलस्रोत व्यवस्थापन आणि अनेक जलस्रोतांचे समन्वित नियंत्रण आता सुनिश्चित केले आहे.” १२ डिसेंबर २०१४ रोजी दक्षिण-ते-उत्तर ‘जल वळण प्रकल्पा’च्या मध्यम मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झाला, आणि मध्य चीनच्या हेनान प्रांतातील नानयांग शहरातील ताओचा कालव्याचे मुख्य गेट उघडले. तेव्हा हे पाणी प्रवाही झाले. हान नदीच्या पाण्याने उत्तरेकडे प्रवास सुरू केला, आणि २७ डिसेंबर २०१४ रोजी हे पाणी बीजिंगला पोहोचले. बीजिंगने शहरातील दैनंदिन पाणीपुरवठा आणि उत्पादनासाठी पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढवले आहे. याचबरोबर अतिरिक्त पाण्याची बचत करण्यासाठी आपल्या साठवण क्षमतेचा वापर करून, मियुन जलाशयातून पुरवठा कमी केला आहे.
 
बीजिंग जल प्राधिकरणाच्या मते, “प्रकल्पाचा पाणीपुरवठा शहरात येण्यास सुरुवात झाल्यापासून, बीजिंगमधील भूजल पातळी दरवर्षी वाढत आहे. यामुळे भूजल संसाधनांचे प्रभावीपणे संरक्षण होत आहे. २०१५ सालापासून, बीजिंगमधील भूजल पातळी सलग आठ वर्षे वाढली आहे. मैदानी भागातील भूजलाची सरासरी खोली २०१५ सालामध्ये २५.७५मीटरवरून २०२३ साली १४.७४ मीटरपर्यंत वाढली आहे. म्हणजेच, ११.०१ मीटरने वाढ झाली आहे. भूजल साठ्यात झालेली ही वाढ ४ अब्ज, ५६ कोटी क्यूबिक मीटर इतकी आहे. भविष्यात चीनमधील या प्रकल्पाच्या अनुषंगाने, जागतिक पातळीवर देखील इतर देश असे प्रकल्प राबवत तुलनेने दुष्काळी आणि शुष्क प्रदेशांची तहान भागविण्यात, प्रदेशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये महत्वाची भूमिका बजावतील यात शंका नाही.
 
गायत्री श्रीगोंदेकर
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121