'त्या'दिवशी मविआतील ३ पक्षांचे ६ पक्ष होतील! रावसाहेब दानवेंची टीका
12-Oct-2024
Total Views | 84
मुंबई : ज्यादिवशी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर होईल त्यादिवशी तीन पक्षांचे सहा पक्ष होतील, असा दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच मविआमध्ये दिवसातून तीन मुख्यमंत्री होत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले की, "ज्यादिवशी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर होईल त्यादिवशी तीन पक्षांचे सहा पक्ष होतील. आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करणं ही उद्धव ठाकरेंची चाल आहे आणि शरद पवार त्यांचे गुरु आहेत. गेली पाच वर्षे त्यांच्या सांगण्याप्रमाणेच सगळा खेळ सुरु आहे."
"सकाळी संजय राऊत म्हणतात आमचाच मुख्यमंत्री होणार, दुपारी जयंत पाटील आणि संध्याकाळी विजय वडेट्टीवार म्हणतात आमचा मुख्यमंत्री होणार. त्यामुळे महाविकास आघाडीचे एका दिवसात तीन मुख्यमंत्री होतात. महाराष्ट्रातील जनतेने यांना पूर्णपणे ओळखले आहे. त्यामुळे या राज्यात महायूती आणि एनडीएचा मुख्यमंत्री होणार आहे," असे ते म्हणाले.
ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची जनतेला गोडी नाही!
यावेळी रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरही टीका केली. ते म्हणाले की, "दसरा मेळावा आयोजित करण्याची परंपरा बाळासाहेबांच्या काळापासून सुरु आहे. त्यावेळी बाळासाहेब जे महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून बोलायाचे त्यातून वर्षभर जनतेच्या मनात उर्जा असायची. जनता त्यातून बोध घ्यायची. परंतू, आताच्या दसऱ्या मेळाव्याच्या टीझरमध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका होते. त्यामुळे या दसऱ्या मेळाव्याबद्दल जनतेच्या मनात कुठलीही गोडी नाही," असेही ते म्हणाले.