ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक नीला उपाध्ये यांचे दि. ७ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. अफाट उत्साह, दुर्दम्य आशावाद, प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि तितक्याच संवेदनशील मनाच्या नीला मॅडम... “पत्रकारितेच्या क्षेत्रात मानवी मूल्ये जपणे जितके महत्त्वाचे तितकेच आपले संस्कार शाबूत राखणेही महत्त्वाचे” अशी शिकवण देणार्या नीला मॅडम. त्यांच्या निधनानेे अक्षरश: जिवाला चटका लागला. या श्रद्धांजलीपर लेखात सारांश रूपाने त्यांच्या आणि माझ्या स्नेहबंधाचे शब्दचित्रण...
दहा-११ वर्षांपूर्वी गोष्ट. त्यावेळी मी दै. ‘मुंबई तरुण भारत’ मध्ये ‘वस्त्यांचे वास्तव’ नामक साप्ताहिक सदर लिहायचे. पत्रकारितेच्या दुनियेत नवखी असल्याने माझ्या लिखाणाला तशी वर्तमानपत्रातल्या लिखाणाची ती टिपीकल शिस्त नव्हतीच. त्यावेळी पहिल्यांदा मला नीला मॅडमचा फोन आला. ‘मी नीला उपाध्ये बोलतेय,’ असे म्हणून त्या माझ्या लिखाणाबद्दल अगदी भरभरुन बोलू लागल्या. भरभर त्या बराचवेळ बोलत होत्या. त्यात कौतुक, आनंद, अभिमान वगैरे वगैरे सारे काही होते. कोण नीला उपाध्ये? आणि मी सदर लिहले, तर त्याबद्दल त्यांना इतका आनंद, अभिमान वगैरे का वाटावा? सुरूवातीला पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर मला मिळत गेले. तो त्यांचा स्वभावच होता. कुणाचेही कौतुक करणे, कुणालाही चार युक्तीच्या गोष्टी सांगणे, कुणालाही वाईटापासून वाचवणे हा त्यांचा स्वाभावधर्मच! आईची आपल्या लेकराबाबत जी भूमिका असावी, तीच भूमिका त्यांची नवख्या साहित्याकांबाबत, पत्रकारांबाबत होती. प्रस्थापित साहित्यिक आणि पत्रकारांच्या जगतामध्ये स्वत:चे अवकाश शोधणार्या नवशिक्या पत्रकारांसाठी आणि साहित्यिकांसाठी नीला मॅडम म्हणजे दीपस्तंभ होत्या. नवखा पत्रकार, लेखक, कवी हे काही सगळेच सुरूवातीला उत्तम लिहितीलच असे नाही. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीची दखलही घेतलीच जाते असेही नाही. पण, नीला मॅडम जणू व्रत स्वीकारले असावे, अशा पद्धतीने नवख्या पत्रकारांची, साहित्यिकांची आवर्जून दखल घ्यायच्या. बहुतेक सर्वच वर्तमानपत्रांत नव्याने रूजू होणारी तरूणाई त्यांच्या संपर्कात होती. नीला मॅडम आवर्जून त्या सगळ्यांच्या लिखाणाची दखल घ्यायच्या, लेखनाचे कौतुक करायच्या. काय चांगले लिहिले, हे तर सांगायच्याच, पण, कुठे चुकले हे देखील आवर्जून अधोरेखित करायच्या. लेखांमध्ये, बातमीमध्ये आणखीन काय, कसे लिहिले असते, तर ती बातमी, लेख अधिक खुलला असता, याबाबत त्यांनी केलेला खोलवर विचार दखलपात्रच असायचा. त्यांच्या कौतुकोद्गारांमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात पहिल्यांदाच पाऊल टाकणार्यांना किती हुरूप यायचा, हे मी एकटी नाही तर माझे समकक्ष पत्रकारही तितक्याच हक्काने सांगतात.
“आजचा पेपर उद्याची रद्दी आहे, तू पुस्तक लिही बरं!” हे त्यांचं वाक्य आता मला पुन्हा कधीच ऐकायला येणार नाही. ‘राम-कृष्णही आले गेले, त्यावीण जग का ओसही पडले’ हे जरी खरे असले, तरीसुद्धा नीला मॅडम म्हणजे त्यांच्यासम त्याच! नीला मॅडम म्हणजे उत्साहाचा ओसंडून वाहणारा झरा. माणूस किती उत्साही असू शकतो, किती ध्येयशील असू शकतो, याची कमाल मर्यादा म्हणजे नीला मॅडम. पत्रकारिता ही त्यांच्या रक्तातच होती. त्यामुळे शहरात कोणताही महत्त्वाचा कार्यक्रम असला की, तिथे नीला मॅडम वयाच्या ७८व्या वर्षीही उपस्थित असायच्या. त्या कार्यक्रमाची बातमी त्या तिथल्या तिथे लिहायच्या. लिहायला साधन नसेल, तर अगदी बसच्या तिकीटावरही मोजक्या शब्दांत बातमी लिहिण्याचा त्यांचा हातखंडा होता. त्यांची ही निष्ठा शब्दातीत.
नीला मॅडमच्या अशा कित्येक आठवणी चहुबाजूंनी दाटून आल्या आहेत. त्यादिवशी ऊन मी म्हणत होते. त्या असह्य उन्हामध्ये दै ‘मुंबई तरूण भारत’च्या कार्यालयात प्रवेश करतानाच मला घाई गडबडीत असलेल्या आणि घामाघूम झालेल्या नीला मॅडम दिसल्या. इतक्या रणरणत्या उन्हात बसमधून प्रवास करत या का बरं आल्या असतील? त्यांना गाठत मी विचारले, तर त्यांनी माझ्या हातात बसचे तिकीट दिले. म्हणाल्या “अगं, मी तुला त्या कंगवा विकणार्या माणसाबद्दल मागे बोलले होते बघ. त्याला अनेक दिवस मी शोधत होते. आज तो दिसला. मग मी त्याचा फोन नंबर घेतला, तोच तुला द्यायला आले.” मी म्हटले मॅडम या उन्हात कुणीही घराबाहेर पडायचे टाळते, तुम्ही फोन करायचा ना? तर मॅडम म्हणाल्या, तुझा फोन लागत नव्हता. मी पाहिले तर चुकून माझा फोन ‘एरोप्लेन मोड’वर गेला होता. खरे तर त्यांनी ज्याचा फोन नंबर दिला होता, तो ना त्यांच्या ओळखीचा ना माझ्या ओळखीचा.
तर अशा या नीला मॅडम सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य असतानाही ‘बेस्ट’ बसने प्रवास करायच्या. तेव्हा त्यांना तो कंगवा विकणारा अंध माणूस नेहमी दिसायचा. तो अंध असला, तरी ते कंगवे तो स्वत: बनवायचे, त्याचा छोटासा उद्योगच होता. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या त्या व्यक्तीचा संघर्ष आणि जिद्द पाहून नीला मॅडमही भारावल्या. त्यावेळी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या ‘माणसं’ सदरामध्ये त्या व्यक्तीवर लिहायला हवे, असे त्यांना वाटले. त्याबाबत त्यांनी माझ्याशी चर्चाही केली. पण, त्याचा फोन नंबर त्यांच्याकडे नव्हता. त्यानंतर नीला मॅडमनी त्याला शोधून काढून त्याचा नंबर मिळवला होता. त्याच्यावर लिहिले, तर त्याला आनंद होईल. त्याच्यासारखेच अनेक संघर्ष करणारे लोक आहेत, त्यांनाही प्रेरणा मिळेल. “पत्रकारिता आणि आपली लेखणी मानवाच्या प्रश्नासाठी आहे. पण, मानवाच्या प्रेरणेसाठीही आहे ना?” असे नीला मॅडमचे मत. ही घटना आजही आठवते. खरंच अनोळखी आणि अर्थोअर्थी काहीही संबंध नसणार्या कष्टकरी जिवाच्या संघर्षावर लिहिले गेले पाहिजे आणि तेही मी लिहायलाच हवे, असे वाटणे ही भावना नीला मॅडममध्ये होती.
त्यांचे पती, ज्येष्ठ पत्रकार वसंत उपाध्ये वारले तेव्हा मी मुंबईत नव्हते. काही दिवसांनी मुंबईत आल्यावर मी मॅडमच्या घरी गेले. वर्तमानपत्रांच्या आणि पुस्तकांच्या ढिगार्यात नीला मॅडम शांत बसल्या होत्या. गालावर अश्रू ओघळत होते. पण, तरीही त्या काही टिपणं काढतच होेत्या. मला बघून त्यांनी स्मितहास्य करण्याचा प्रयत्न केला. ‘बाबा गेले ग’ म्हणाल्या. मी म्हणाले, “मॅडम, तुम्ही शांत व्हा. ही कसली टिपणं काढता?” त्या म्हणाल्या ”बाबा गेले, उद्या मीही जाईन. पण, ‘एशियाटिक सोसायटीची फेलोशिप’ मिळाली आहे. त्याचे काम सुरू आहे. तशी कमिटमिंट आहे. ती पूर्ण न करता मेले, तर मेल्यावर माझा जीव तळमळेल ना? म्हणून वेळ वाया न घालवता काम पूर्ण करायला घेतले.” असे म्हणून त्या लगबगीने आत गेल्या. पाचच मिनिटांत परत आल्या. हातात एक सुंदर साडी होती म्हणाल्या, ”काही दिवसांनी तुझा वाढदिवस आहे ना? ही साडी माझ्या म्हातारीकडून तुला गिफ्ट बर का? पहिल्यादांच घरी आलीस ना?” स्वत:चे दु:ख विसरून माझा वाढदिवस आठवणार्या नीला मॅडम. क्षणात हसणार्या, क्षणात गंभीर होणार्या नीला मॅडम माझ्या सदैव मार्गदर्शक होत्या. ”पत्रकारितेच्या क्षेत्रात टिकून राहाण्यासाठी आपली गुणवत्ता वाढवणे तसेच, मुद्दाम निरूत्साही करणार्या लोकांना गांभीर्याने घेऊ नये.” असे त्या सारखे सांगायच्या. ’वरिष्ठ त्रास देतात, मुद्दाम कमी लेखतात, संधीच देत नाहीत, अपमान करतात, स्वत:हून जॉब सोडावा यासाठी दडपण आणतात, त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊ का’ असे म्हणत सल्ला मागणारे अनेक पत्रकार आणि अगदी उपसंपादकही त्यांच्याकडे यायचे. नीला मॅडम सगळ्यांचेच सगळे काही अगदी शांतपणे ऐकून घ्यायच्या आणि पत्रकार म्हणून कार्यरत असताना त्यांचे वरिष्ठ त्यांच्याशी कसे वागले? यावर त्यांनी काय केले, याची अगदी सडेतोड भाषेत मांडणी करायच्या. म्हणायच्या, ‘’बघा, हे असे असते. आपण कुणासाठी या क्षेत्रात आलेलो नाही, तर आपण स्वत:साठी आणि समाजासाठी या क्षेत्रात आलो आहोत. बॉसच्या वर पण बॉस असतो आणि त्याच्याही वर देव असतोच ना?” त्यांच्या या सूचनांमुळे अनेक जण, अनेक वेळा त्यांच्या कार्यक्षेत्रात योग्य तो निर्णय घेऊ शकले.
त्यांची आणि माझी शेवटची भेट काही महिन्यांपूर्वीची. त्यांनी एक लेख लिहिला होता, तो घेऊन जाण्यासाठी मी गेले होते. नेहमीप्रमाणे त्या वर्तमानपत्र आणि पुस्तकांच्या ढिगार्यात हरवलेल्या. मला पाहून लगेच कागदावर लिहिलेला लेख दिला. मी जाणार इतक्यात म्हणाल्या, ”थांब, अशी कशी जाशील! हे बघ तुझ्यासाठी नवीन पुस्तकांचा संच काढूनच ठेवला आहे. हो, ही म्हातारी आजपण पुस्तक विकत घेते बरं का? तर ही पुस्तक मी गेल्या महिन्यात विकत घेतली होती. त्यातली टिपणं काढून ठेवली. मला वाटतं ही पुस्तक तू वाचावीस.” असे म्हणत त्यांनी तो पुस्तकांचा संच मला दिला. माझा प्रत्येक लेख आवर्जून वाचणार्या, मला मिळणार्या प्रत्येक संधीबद्दल भरभरून आनंद व्यक्त करणार्या आणि भविष्यात मी काय करावे, याचे नियोजन करून त्याची मला वारवांर आठवण करून देणार्या नीला मॅडम. नाती फक्त रक्ताचीच नसतात, हेच खरे. नीला मॅडमची ममता, प्रेम आणि माझ्याबद्दल असणारी त्यांच्या मनातली आपुलकी मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. जन्म देणार्या आईची जागा दुसरे कोणी घेऊ शकत नाही, हे खरे; पण नीला मॅडम माझी दुसरी आईच होत्या. नीला मॅडमचा जीवनसंघर्ष, पत्रकारितेतले साहित्यातले कर्तृत्व, कार्यनिष्ठा, समाजनिष्ठा माझ्यासारख्या अनेकांना आयुष्यभर प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन!