मुंबई, दि.१२: राज्यातील गृह विभागांतर्गत ७०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व उदघाटन राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार, दि.११ रोजी पुणे करण्यात आले. यावेळी उपमुख्यंमत्री फडणवीस यांनी उपस्थित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांसोबत संवाद साधला.
गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले," पुणे हे प्रचंड वेगाने नागरीकरण होणारे शहर आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढते तेव्हा आव्हाने वाढतात. गुन्हेगारी देखील वाढते. किती नागरिकांमागे किती पोलिस आणि पोलिस आस्थापने असावीत या आकृतिबंधाच्या निर्णयासंबंधी १९६०नंतर बदल झाला नव्हता. ६३ वर्षांनी २०२३मध्ये नवीन आकृतीबंध तयार करण्याचे काम आम्ही हाती घेतले आणि नव्या पोलिस स्टेशनच्या निर्मितीला सुरुवात झाली. याअंतर्गत आज पुण्यामध्ये ७ पोलिस ठाण्यांचे उदघाटन केले. सुरक्षित शहरांच्या निर्मितीसाठी सीसीटीव्हीचे नेटवर्क उभे करण्यासाठी काम सुरू आहे. याअंतर्गत सीसीटीव्ही फेज ॥ च्या शुभारंभामध्ये २८८६ नवे कॅमेरे लागणार आहेत. यासोबतच पुण्याच्या ट्रॅफिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी ट्रॅफिकसाठी 'ॲडिशनल सीपी'ची पोस्ट द्यायची आणि अधिकची एक डीजीपीची पोस्ट द्यायची असा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
'पिंपरी चिंचवड येथे उभारली जाणार्या आयुक्तालयाच्या इमारतीसाठी ५० एकर जागा सुनिश्चित करून उद्याच याचा शासन निर्णय काढण्यात येईल. पुराव्यांच्या व्यवस्थापनासाठी आधुनिक फॉरेन्सिक लॅब तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात ४०,००० पोलिसांची विक्रमी भरती होऊ शकली याचा आनंद आहे. यासोबतच महिला आणि बालकांवरील अत्याचाविरोधात आणि ड्रग्स विरोधात 'नो टॉलरन्स पॉलिसी' राज्याने स्वीकारली आहे. कारण पोलिसिंगचे मूल्यमापन किती गुन्ह्यांची उकल होते आणि लोकांना किती सुरक्षित वाटते यावरून होते', असेही फडणवीस म्हणाले.
गृहविभागअंतर्गत भूमिपूजन व उदघाटन
१.पुणे शहरातील सात नवीन पोलीस ठाण्यांचे उदघाटन
२.'CCTV फेज II' चा शुभारंभ
३.पोलीस आयुक्तालय, पुणे शहर, नवीन इमारतीचे भूमिपूजन
४.बंड गार्डन पोलीस स्टेशन, नवीन इमारतीचे भूमिपूजन
५.मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत सहायक पोलीस आयुक्त कार्यालय, तुळींज व बोळींज पोलीस ठाण्यांचे उदघाटन (ऑनलाइन)