ज्ञानदानासोबतच सतत शिकत राहणार्या गोसेवक आरती अनिल सोहोनी या होतकरू लेखिकेविषयी...
आरती अनिल सोहनी अर्थात पूर्वाश्रमीच्या शोभा अवधूत काळे, यांचे बालपण अतिशय सुखात गेले. वडील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असल्याने, बालपणापासून घरात सर्व सुखसोयी पायाशी लोळण घेत होत्या. तरीदेखील वडिलांच्या कडक शिस्तीमुळे सर्वच भावंडांच्या अंगी शिस्त बाणली होती. लहानपणी वडिलांची सारखी बदली होत असल्याने, शिक्षणाची काहिशी ओढाताण झाली. तरीही असेल तिथे, जमेल तशी कसरत करून आरती यांनी शिक्षण घेतले. शालेय शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतले असले, तरी पुढील महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीच्या व्ही. एम. व्ही. महाविद्यालयामध्ये पूर्ण केले. तेथील कर्मचारीवृंद अतिशय उत्तम होता. तिथे डॉ. अष्टीकर, गणोरकर, डहाके, पुरोहित अशी माणसे पाहायला मिळाली. डॉ. पटवर्धन, कुष्ठरोग्यांचे तारणहार तुकडोजी महाराज तसेच, सुरेश भट यांसारख्या प्रभूतींना पाहता आले. तेव्हा, इतके कळत नव्हते, पण वडील आवर्जून अशा व्यक्तीपर्यंत नेत व त्यांना नमस्कार करावयास सांगून, यांच्याविषयी सांगत असत. त्यामुळे नकळत संस्कारांचे बीज रोवले जात होते. शिवाय कुठेही राहिलो तरी घरात शुध्द मराठीच बोलायचे असा आईचा आग्रह असल्याने, मराठी भाषेवर नितांत प्रेम जडले, जे आजही कायम आहे. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच मोठ्या बहिणी पदवीधर होऊन , वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका बनल्या होत्या. त्यांचा ज्ञानदानाचा वसा तसेच, आई-वडिलांकडून लहानपणापासून मिळालेले देशभक्ती, समाजासाठी काही करण्याचे धडे, भावी आयुष्यासाठी मौलिक ठरल्याचे आरती सांगतात.
वास्तविक उच्चशिक्षण घेऊन आरती यांना वकील बनण्याची इच्छा होती. पण मुलींसाठी लॉ कॉलेज जवळपास नसल्याने त्यांनी, राज्यशास्त्रामधून एम.ए शिक्षण पूर्ण केले. त्याच दरम्यान अध्यापनात रूची निर्माण झाली. तसेच, शिक्षक म्हणून मिळणारा नावलौकिक, मानसन्मान आणि विद्यार्जन व विद्यादान करण्याची हीच नामी संधी असल्याचे हेरून, पदवीनंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एड. पूर्ण करून शिक्षकी पेशाला वाहून घेतले.
भिवंडी येथील ओसवाल विद्यालयात आरती यांनी तब्बल दोन दशके मुख्याध्यापिका म्हणून काम केले. या सेवेची पावती म्हणून ‘आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार’ त्यांना मिळाला. निवृत्तीनंतर ’एव्हरशाईन’ या इंग्लिश माध्यम शाळेत समन्वयक म्हणूनही काम केले. लग्नानंतर भिवंडीतील कशेळी या लहानशा गावात वास्तव्य होते. कोळी-आगरी भूमिपूत्रबहुल गावात सोहोनी हे एकमेव ब्राह्मण कुटुंब होते. पण हळूहळू त्यांच्यात रुळल्याने राहायची सवय लागली. तेथील वास्तव्यात खेड्यातील नागरिकांच्या अडचणी समजू लागल्या. सोहोनी कुटुंबातही समाजसेवेची आवड होतीच. खेडेगावात कोणी फारसे सुशिक्षित नसल्याने, नोकरी व घर सांभाळून त्या गावातील मुलांना शिकवू लागल्या. गावातील विद्यार्थ्यांना शिकवून संस्कार केल्याने, गावातील प्रत्येक घराशी एक वेगळेच नाते निर्माण झाले होते.
शिक्षण आणि लेखनाची परंपरा घरातच असल्याने, आरतीताई कथा व लेख लिहू लागल्या. मासिके तसेच नियतकालिकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. अशा सर्व लेखांचे संकलन करून २०२२ साली त्यांनी ’सहज सुचले’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्यासाठी शारदा प्रकाशनच्या प्रा. संतोष राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. लेखनाचा व्यासंग जडलेला असल्याने, वेळ मिळेल तेव्हा, लिखाण सुरूच असते. त्यामुळे, योग येईल तेव्हा, पुढील पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा असल्याचे त्या सांगतात.
मुळात आवड असली की सवड मिळतेच.त्यामुळे कुटुंब सांभाळून त्या सतत शिकत असून, इतर छंद जोपासत आहेत. स्वयंपाकातील वेगवेगळ्या रेसिपीज करायला आणि इतरांना खाऊ घालायला त्यांना आवडते. पाककलेच्या स्पर्धेतही बक्षीसे मिळाल्याचे त्या सांगतात. ‘हरीयाली संस्था’ तसेच, संस्कार भारतीचेही थोडेबहुत कार्य त्यांनी केले असून, संस्कार भारती कशेळी काल्हेर शाखेच्या अध्यक्षा म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. अंबिका योगकुटीरमधून योगासने, गीता परिवारामधून गीता, तर सध्या सुजाता भावथनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पौरोहित्य त्या शिकत आहेत. स्वतः कानसेन असल्याने आवड म्हणून, कल्याणच्या बर्वे सरांकडे ऑनलाईन भजन त्या शिकत आहेत. सतत काहीतरी काम करीत राहणे, मिळेल तसे नवीन शिकणे, ही आयुष्याची खरी गुरुकल्ली असल्याचे त्या मानतात.
घरी गाई असल्याने गोसेवा करण्यात सध्या त्यांचा वेळ व्यतीत होत असून, एक अनुष्ठान म्हणून ही गोसेवा घडत असल्याचे त्या सांगतात. त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामातही योगदान देत आहेत. एक मुलगा दंतवैद्यक, तर दुसर्याचा मिनरल वॉटरचा व्यवसाय आहे. पालक म्हणून त्यांच्या कामातही हातभार लावत असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात.
माणूस जन्माला येतो पण, माणुसकी जगावी अन् जगवावी लागते असे मानणार्या आरती, एक सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी झटत आहेत. सतत नाविन्याचा ध्यास, क्रियाशीलता, वेळेचे महत्व, प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट हे त्यांच्या यशस्वीतेचे मूलमंत्र असून, या मूलमंत्रांमुळे आजवर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेले नाही, परिस्थितीनुरूप जिद्दीने उभ्या राहून, उत्तरोत्तर यशाला गवसणी घालणार्या या ज्ञानदानी व्यक्तीमत्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा !