कल्याणमधील चंद्रसेन सोनावळे यांनी ‘शिवसाई प्रतिष्ठान’ची स्थापना करून महिलांच्या सक्षमीकरणाचे व्रत हाती घेतले आहे. उद्यापासून प्रारंभ होणार्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणासाठी व्यापक कार्य करणार्या‘श्री शिवसाई प्रतिष्ठान’च्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
चंद्रसेन सोनावळे यांनी 2018 साली ‘श्री शिवसाई प्रतिष्ठान’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, स्वच्छता अभियान यांसारखे असंख्य समाजहितैषी उपक्रम राबविले जातात. या प्रतिष्ठानची स्थापना महिलांना रोजगारासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना बचतगटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करून देणे या उद्देशाने झाली.
‘शिवसाई प्रतिष्ठान’मधील समितीवर एकूण नऊजण कार्यरत आहेत. समितीचे कमीत कमी 100 ते 150 सभासद आहेत. प्रतिष्ठानच्या समितीत संस्थापक अध्यक्ष चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे, उपाध्यक्ष गजानन इंगळे, सचिव चंद्रकांत कांबळे, सहसचिव नितीन सूर्यवंशी, खजिनदार चरणदास गायकवाड, सल्लागार नितीन निकम, सहसल्लागार सतीश बंडू शेंडे, सभासद दिलीप शांताराम जगदाळे हे कार्यकारिणीवर कार्यरत आहेत. सुरुवातीला याकामासाठी बचतगटाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी 20 जणांचा एक बचतगट होता. असे तीन ते चार बचतगट अद्याप कार्यरत आहेत. उर्वरित बचतगटांत दहा ते 12 जणी आहेत.
‘शिवसाई प्रतिष्ठान’च्या माध्यमातून 20 महिला बचतगट स्थापन करून गरजू महिलांना स्वयंरोजगार प्रदान केला जातो. त्या महिलांना आता समाजात लघुउद्योजिका म्हणून मान आहे. चंद्रसेन यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्वधर्मीय नागरिकांना समाजाचे देणे फेडण्यासाठी प्रवृत्त केले. महिलांना चूल व मूल या चौकटीतून बाहेर काढून त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम चंद्रसेन यांनी केले. ‘शिवमाऊली महिला बचतगट’, ‘शिवप्रतिज्ञा महिला बचत गट’, ‘शिवतेज महिला बचतगट’, ‘महिला बचतगट 2020’, ‘शिवदुर्गा महिला बचतगट’, ‘शिवाई सवाई महिला बचतगट’, ‘बांगर शिव माऊली गट’, ‘गोकुळनगरी गट’, ‘शिवनव दुर्गा महिला बचतगट’ असे 20 प्रकारचे बचतगट प्रतिष्ठानच्या अंतर्गत कार्यरत आहेत. बचतगटाच्या माध्यमातून महिला कापडी पिशव्या बनविणे, मसाले, कुरडई बनविण्याची कामे करतात. त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचे कामही प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाते. बचतगटातील महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.
‘शिवसाई प्रतिष्ठान’च्या माध्यमातून 20 बचतगट स्थापन केले आहेत. त्या बचतगटांतील महिला या कल्याण पूर्वेतील मलंगगड परिसरातील आहेत. आता या महिला बचतगटांच्या माध्यमातून एकत्रित येतात. एकमेकांच्या मदतीने आर्थिक व्यवहार चांगल्या रितीने सांभाळतात. पूर्वी केवळ चूल आणि मूल सांभाळणार्या या महिल्या आर्थिक व्यवहार योग्य रितीने सांभाळत असल्याने समाजात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पैशांचे व्यवस्थापनही या महिलांना करता येऊ लागले आहे. प्रतिष्ठानतर्फे महिलांना बचतगटासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. ज्या महिला बचतगट चांगल्या रितीने सांभाळत आहेत, अशा महिलांची ओळख करून दिली जाते. त्यांचे मार्गदर्शनही या महिलांना मिळते.
‘श्री शिवसाई प्रतिष्ठान’ महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासोबतच अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यामध्ये त्यांनी आरोग्य शिबिरे भरविणे, रक्तदान शिबिरे भरविणे अशा सामाजिक कामांचा समावेश आहे. रक्तदान शिबिरांतून जमा होणारे रक्त कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात असलेल्या रक्तपेढीत दिले जाते. महापालिकेची ‘अर्पण ब्लड बँक’ रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आहे. ही ‘ब्लड बँक’ महाराष्ट्रातील अनेक शहरे आणि ग्रामीण भागांशी संलग्न आहे. त्यामुळे रक्ताची गरज भासल्यास या बॅँकेतून रक्तपुरवठा केला जातो. त्यामुळे संस्थेतर्फे भरविण्यात येणार्या रक्तदान शिबिरातील रक्त ‘अर्पण ब्लड बँके’त दिले जाते. दर सहा महिन्यांतून हे शिबीर घेतले जाते.
परिसरातील लोकांना सोयीसुविधा मिळाव्या, याकरिता आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र मिळवून देण्यासाठीदेखील संस्थेतर्फे शिबीर भरविण्यात येते. आपल्याच परिसरात नागरिकांना सोयीसुविधा मिळत असल्याने दूरवर जाण्याचा त्यांचा त्रास कमी होतो. एवढेच नव्हे, तर संस्थेतर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने दुर्गाडी किल्ल्यावर मशाल घेऊन कार्यकर्ते जातात. सभासद आणि कार्यकर्त्यांकडून दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविले जाते. या अभियानाच्या माध्यमातून किल्ल्यांची संपूर्णपणे स्वच्छता करून तेथील कचरा उचलला जातो. त्यामुळे किल्ल्यांची स्वच्छता राखण्यास मदत होते.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून कल्याणमधील बचतगटांतील महिलांना कल्याणमध्येच उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दिली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला जातो. परंतु, त्यांच्या मालाला ठाण्यात आणि मुंबईतही मागणी असावी, असा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे.
(अधिक माहितीसाठी संपर्क - चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे-
9320528020)