नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी रोजी भव्य श्रीराम मंदिरात श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी अयोध्येत हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. भाविकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.
अयोध्येत येथे तात्पुरती वैद्यकीय केंद्रे बांधली जात आहेत आणि प्रत्येकी २० खाटांची दोन रुग्णालयेही तयार केली जात आहेत. अयोध्येत १५ जानेवारीपासून मकर संक्रांतीपासून जत्रेचे आयोजन करण्यात आले असून ती १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अशा परिस्थितीत १०४ डॉक्टरांना येथे कर्तव्यावर ठेवण्यात आले आहे.
वैद्यकीय व आरोग्य विभागाचे संचालक (प्रशासन) डॉ.राजगणपित. आर. यांच्या वतीने फिजिशियन, बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, ऑर्थोपेडिक सर्जन, भूलतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ व महिला वैद्यकीय अधिकारी आदींना सज्ज ठेवण्यात आले आहे. गरजेनुसार संजय गांधी पीजीआय, केजीएमयू आणि डॉ. राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या तज्ज्ञ डॉक्टर्सनाही येथे तैनात केली जाणार आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यंत्री ब्रजेश पाठक यांनी अयोध्येतील लोकांना उच्चस्तरीय आरोग्य सेवा पुरवल्या जाव्यात, अशा कडक सूचना दिल्या आहेत. अयोध्येत तज्ज्ञ डॉक्टर्ससह ७० फार्मासिस्ट आणि ६५ वॉर्ड बॉय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसह एकूण १३५ आरोग्य कर्मचारी सज्ज असणार आहेत. अयोध्येत सध्या ‘१०८ रूग्णवाहिका सेवा’ आणि ‘१०२ रूग्णवाहिका सेवा’ यांच्या एकूण ५९ रूग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यामध्ये आणखी ५० रूग्णवाहिकांची वाढ करण्यात येणार असून ही संख्या १०९ पर्यंत वाढविण्यात येणार आहे.