सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा अडवून, लालकृष्ण आडवाणी यांना अटक करणारे, लालू यादवांचे सुपूत्र तेजस्वी यादव सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहे. प्रभू श्रीराम मंदिरात दि. २२ जानेवारी रोजी रामललाची प्रतिष्ठापना होत आहे. संपूर्ण देश राममय होत असताना, या लालू पुत्राला भलतीच जळजळ झालेली दिसतेय. आजही देशात मंदिराचं नुसतं नाव जरी घेतलं, तरी लागलीच अनेकांना दवाखाना आठवलाच म्हणून समजा. नुकतेच लालू पुत्र तेजस्वी यादव म्हणाले की, “आजारी पडल्यावर तुम्ही मंदिरात जाल की दवाखान्यात? पंडितजी कामी येतील की डॉक्टर? भूक लागली तर मंदिरात जाल का, तिथे तर दान द्यावे लागेल. भगवान राम हृदयात आहे, कणाकणात आहे. हजारो लाखो, कोटी रूपये अयोध्येत खर्च होत आहेत. त्याऐवजी या पैशांमध्ये कितीतरी विद्यार्थ्यांना शिक्षण देता आले असते.” तेजस्वी यादव भले ३४ वर्षांचे असले, तरी राजकारणातील मतगणित त्यांना चांगलेच जमते. जितकं राम मंदिराविरुद्ध बोललं जाईल, तितकी आपली वोट बँक अधिक मजबूत होईल, हे ते जाणून आहे. त्यामुळेच पहिली आपली वोट बँक आणि मग भगवान श्रीराम. नीती आयोगाच्या अहवालानुसार, आरोग्य व्यवस्थेत बिहार सर्वात पिछाडीवर आहे. बिहारमधील जवळपास सगळीच रुग्णालये रामभरोसे आहेत. बिहारमध्ये २२ हजार लोकांमागे एक डॉक्टर आहे. ज्याचे प्रमाण ’जागतिक आरोग्य संघटने’नुसार, एक हजार लोकांमागे एक डॉक्टर असे आहे. २०२२ मध्ये ’कॅग’च्या अहवालानुसार, २००९ नंतर बिहारमधील रुग्णालयांतील बेडची संख्या वाढविण्यात आलेली आहे. ३८ पैकी नऊ जिल्ह्यांमध्ये अधिकृत रक्तपेढीच नाहीय. आरोग्य व्यवस्थेत बिहार इतका पिछाडीवर असून, खुद्द उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेच बिहारचे आरोग्यमंत्री असूनही ही अवस्था आहे. मंदिर पाहिजे की रुग्णालय हे लोकांना विचारण्याआधी तेजस्वी यांनी बिहारमधील रुग्णालयांची स्थिती कधी बदलेल याचे उत्तर दिले पाहिजे. स्वतः आरोग्यमंत्री असताना, बिहारमध्ये आरोग्य व्यवस्था उत्तम करावी, त्यांना कुणी अडवलय? मशीद आणि रुग्णालय असा संदर्भ कधीच लावला जात नाही. मात्र, मंदिर म्हटलं की शाळा आणि दवाखाने बांधण्याच्या गप्पा सुरू होतात. तेजस्वी यादव यांनी स्वतः आरोग्यमंत्री असताना, अशा वायफऴ गप्पा करण्याआधी हजारदा विचार करायला हवा.
आम आदमी पक्षाची सत्ता असलेल्या, दिल्लीमध्ये एकामागून एक घोटाळे समोर येत आहे. दिल्लीचे अरविंद केजरीवाल सरकार घोटाळ्यांनी घेरले असून, स्वतः केजरीवालांच्या मागेही ’ईडी’चे शुक्लकाष्ठ लागले आहे. कथित दारू घोटाळ्यानंतर आता दिल्लीत मोहल्ला क्लिनिक घोटाळा समोर आला आहे. केजरीवाल सरकारने मोठ्या धूमधडाक्यात दिल्लीकरांच्या मोफत उपचारासाठी मोहल्ला क्लिनिकची स्थापना केली होती. मात्र, या क्लिनिकमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या खोट्या चाचण्या केल्या गेल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनीदेखील या घोटाळ्याची ’सीबीआय’कडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. रुग्णही नकली, लॅब टेस्ट होतायत, त्यादेखील नकली मात्र त्यासाठी लागणारा पैसा मात्र खराखुरा आहे! राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर २०२३ दरम्यान दिल्लीतील सात मोहल्ला क्लिनिकमध्ये जवळपास ५ लाख, २१ हजार, २२१ वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. ५० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंचा खर्च या चाचण्यांसाठी येत होता. मात्र, यापैकी अनेक चाचण्या खोट्या दाखविण्यात आल्या आहेत. यातील अनेक चाचण्या झाल्याच नाही; मात्र त्या प्रत्यक्षात झाल्याचे सांगितले आहे. दररोज ५०० हून अधिक चाचण्या होत असल्याचे दाखविण्यात आले, ज्या कधी झाल्याच नाही. जुलै २०२३ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान ज्या सात मोहल्ला क्लिनिकच्या रेकॉर्डची तपासणी केली गेली, त्यातून ११ हजार, ६५७ रुग्णांच्या मोबाईल क्रमांकासमोर शून्य असे लिहिण्यात आले. ३ हजार, ९२ रुग्णांचा मोबाईल क्रमांक ९९९९९९९९९९ असा सारखाच होता. ८ हजार, १९९ रुग्णांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदच करण्यात आली. जर मोबाईल क्रमांक नोंदविलाच गेला नाही, मग त्यांना तपासणी अहवाल कसा पाठवला जाणार होता, याचे उत्तर अस्पष्टच आहे. आधीच कथित दारू घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खा. संजय सिंह तुरुंगात असताना, मुख्यमंत्री केजरीवालही तुरुंगवारीच्या प्रतीक्षेत आहेत. ’ईडी’ वारंवार चौकशीला बोलावत असतानाही, केजरीवाल दांड्या मारत आहे. मोहल्ला क्लिनिकमध्ये इतकी गडबड होत असताना, दिल्लीचा आरोग्य विभाग नेमका काय काम करतोय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.