प्राणप्रतिष्ठा सोहळा हा हिंदू समाजाच्या दृष्टीने ‘अत्यंत महत्वाचा’ आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील न्यू यॉर्क शहराचे महापौर इरिक अॅडम्स यांनी केले आहे. या शहरात हिंदूंची लोकसंख्या मोठी आहे आणि त्यांना या समारंभाचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्याची अनुमती द्यायलाच हवी.
अयोध्येमध्ये दि. २२ जानेवारी रोजी भव्य राम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची तयारी जोरदारपणे सुरू असतानाच, विदेशातील रामभक्तही हा सोहळा उत्साहात साजरा करण्याची तयारी करीत आहेत. “प्राणप्रतिष्ठा सोहळा हा हिंदू समाजाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यासारखाच आहे,” असे प्रतिपादन अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे महापौर इरिक अॅडम्स यांनी केले आहे. केवळ भारतातील हिंदू समाजासाठीच नव्हे, तर न्यूयॉर्क शहरात असलेल्या दक्षिण आशियाई आणि इंडो- कॅरेबियन समाजाच्या नागरिकांसाठी ही आनंदाची पर्वणी असल्याचेही या महापौरांनी म्हटले आहे. दि. ६ जानेवारी रोजी आयोजित ‘माता की चौकी’ धार्मिक कार्यक्रमात न्यूयॉर्कचे महापौर सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. अयोध्येतील राम मंदिर आणि त्याबद्दल न्यूयॉर्क शहरातील हिंदूंच्या भावना काय आहेत, असे महापौराना विचारले असता, प्राणप्रतिष्ठा सोहळा हा हिंदू समाजाच्या दृष्टीने ‘अत्यंत महत्त्वाचा’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शहरामध्ये हिंदूंची लोकसंख्या मोठी आहे आणि त्यांना या समारंभाचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्याची अनुमती द्यायलाच हवी.
महापौर अॅडम्स हे न्यूयॉर्क शहराचे ११०वे महापौर असून, त्यांच्या काळातच दिवाळीमध्ये न्यूयॉर्क शहरातील शाळांना सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली होती. तसा कायदाच राज्याचा प्रतिनिधींनी संमत केला होता. दिवाळी हा सण सार्वजनिक सुट्टीचा दिवस घोषित करणारे, ते इतिहासातील पहिलेच महापौर असल्याचे महापौरांचे निकटचे सहकारी दिलीप चौहान यांनी म्हटले आहे. दिवाळीला सार्वजनिक सुट्टी घोषित केल्याबद्दल, चौहान यांनी महापौरांचे आभार मानले. न्यूयॉर्क शहरामध्ये आशियाई जनतेची लोकसंख्या १९९० मध्ये ९४ हजार इतकी होती. ती आणि २०२१ मध्ये २ लाख, १३ हजार इतकी झाली. आपल्या विजयामध्ये या शहरातील हिंदू समाजाचे मोठे योगदान राहिले असल्याचे सांगण्यास महापौर विसरले नाहीत. आपल्या भाषणात महापौरांनी, भगवान राम आणि देवी सीता यांचा आणि त्यांच्या शिकवणुकीचा आवर्जून उल्लेख केला. सर्व जगात दि. २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहोळ्यानिमित्ताने रामभक्तांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असतानाच, हा सोहळा हिंदू समाजासाठी ‘अत्यंत महत्त्वाचा’ आहे, असे न्यूयॉर्क शहराच्या महापौरांनी म्हणणे, ही नक्कीच अभिमानाची बाब मानायला हवी!
पूर्वोत्तर संत मणिकांचन संमेलन
आसाम राज्यामध्ये गेल्या दि. २८ डिसेंबर रोजी पूर्वोत्तर संत मणिकांचन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात १०४ आध्यात्मिक संत आणि ३७ धार्मिक संस्था सहभागी झाल्या होत्या. या आधी १९६६ मध्ये जोरहाट येथे अशा संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आता इतक्या वर्षांच्या खंडानंतर प्रथमच ‘उत्तर कमला बारी सत्र ऑफ माजुली’ येथे हे संमेलन योजण्यात आले होते. या पवित्र स्थानास आसाममध्ये ‘संतांची भूमी’ म्हणूनही ओळखले जाते. या संमेलनास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे उपस्थित होते. सर्व ईशान्य भारतातील संतमहंत या संमेलनास उपस्थित होते. विविध सनातन आध्यात्मिक परंपरा आणि समुदाय यांच्यात समन्वय आणि सलोखा साधणे आणि त्याचा पाठपुरावा करणे या हेतूने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ईशान्य भारतातील जनतेला जे प्रश्न भेडसावत आहेत, त्यावर या संमेलनात विचार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, “ एकम सत विप्रा बहुधा वदन्ति।’ यामधून भारतीय संस्कृती प्रतिबिंबित होते. अशी सर्वसमावेशक परंपरा केवळ भारतामध्येच अस्तित्वात आहे. भारताने संपूर्ण जगास शांतता आणि सहअस्तित्वाचा संदेश दिला पाहिजे. या पवित्र कार्याची पूर्तता करण्यासाठी समाजातील संतमहंत यांनी पुढे आले पाहिजे,” असे आवाहन सरसंघचालकांनी केले.
मिझोरम मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र संताप!
भारत आणि म्यानमार यांच्यादरम्यान जी सीमा आहे, त्या सीमेवर कुंपण घालण्यास मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी जो विरोध दर्शविला आहे, त्यामुळे मैतेई समाजात संतापाची लाट उसळली आहे. ‘मैतेई हेरीटेज सोसायटी’ या संघटनेने याबद्दल मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचा तीव्र निषेध केला आहे. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालणे अस्वीकारार्ह आहे, असे म्हटले आहे. म्यानमारच्या सीमेवरून घुसखोरी होत असल्याचे माहीत असताना, एका राज्याचा मुख्यमंत्री असे कसे काय म्हणू शकतो? देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेस ज्या खुल्या सीमेमुळे धोका निर्माण होत आहे, त्या सीमेवर कुंपण घालायला हवे, अशी मागणी खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी करायला हवी होती, तर तेच मुख्यमंत्री असे कुंपण अस्वीकारार्ह आहे, असे म्हणत आहेत! मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे हे विधान धक्कादायक आहे. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या चर्चेच्या वेळी आपली ही भूमिका स्पष्ट केली. मिझो जनतेला एका प्रशासनाखाली ज्या स्वतंत्र देशाची निर्मिती करायची आहे, त्याच्याशी हे विसंगत आहे, असे मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. चीन-कुकी-झो या घुसखोरांच्या गटाच्या भूमिकेशी सुसंगत अशी मिझोरम मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. ईशान्य भारताचा काही भाग, म्यानमार आणि बांगलादेशचा काही भाग मिळून, या घुसखोरांना कुकीलॅण्ड किंवा झोलॅण्ड निर्माण करायचा आहे. पण, मैतेई समाजाने या मागणीस विरोध केला आहे. ही सीमा खुली असल्याने मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते, अमली पदार्थांचा व्यापार होतो, असे मैतेई समाजाचे म्हणणे आहे. मणिपूरमधील विद्यमान परिस्थितीला या गोष्टी कारणीभूत आहेत, याकडेही मैतेई समाजाने लक्ष वेधले आहे. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याचा फेरविचार करावा, असे आवाहन मैतेई समाजाच्या या संघटनेने केले आहे.
ख्रिस्ती धर्मगुरूकडून घटनेचा अवमान
आंध्र प्रदेशातील एक ख्रिस्ती धर्मगुरू पॉल इमन्युअल यांनी भारतीय घटनेसंदर्भात आक्षेपार्ह विधाने करून घटनेचा आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. अमेरिकन आणि ब्रिटिश घटनेतील तरतुदीचे संकलन ही घटना तयार करताना केले गेले, असे तारेही या धर्मगुरूने तोडले आहेत. नववर्षानिमित्त संदेश देणार्या आपल्या भाषणात सदर धर्मगुरूने हे वक्तव्य केले आहे. अमेरिकन आणि ब्रिटिश घटना पाहिल्यास, त्यातील अनेक गोष्टी या बायबलमधून घेण्यात आल्याचे दिसून येते. हे पाहता भारतीय घटनेने अप्रत्यक्षपणे घटना बनविताना, बायबलचा आधार घेतला असल्याचा तर्क या धर्मगुरूने लढविला आहे. विजयवाडा येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात सदर धर्मगुरूने भारतीय घटनेचा अवमान करणारे वक्तव्य केले. पॉल इमन्युअल आणि त्याची पत्नी निस्सी हे दोघेही धर्मप्रसाराचे कार्य करतात आणि त्यांच्या कार्यक्रमास ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने उपस्थित असतो. ख्रिस्ती धर्मगुरूकडून भारतीय घटनेचा अवमान करण्याचा प्रकार निषेधार्ह आहेच. या अशा वक्तव्याबद्दल सदर धर्मगुरूवर कारवाई करायला हवी.
९८६९०२०७३२