नवी दिल्ली : मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे भारतीयांनी मालदीवला चांगलाच झटका दिला आहे. अनेक बॉलिवूड कलाकार आणि खेळाडूंनी पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांवर आणि नस्लभेदी टिप्पणी करणाऱ्या लोकांवर सडकून टीका केली आहे. बॉलिवूड कलाकारांनी भारतीय समुद्र किनाऱ्यांचे फोटो शेयर करत, येथे भेट देण्याचा सल्ला दिला आहे.
दुसरीकडे भारतीयांच्या नाराजीचा परिणाम मालदीवच्या पर्यटनावर पडण्यास सुरुवात झाली आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये २५०० विमान तिकीट रद्द करण्यात आली आहेत. त्यासोबतच ८ हजारहून अधिक हॉटेल बुकिंग सुद्धा रद्द करण्यात आल्याचा दावा काही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो.
दरवर्षी २ लाखाहून अधिक भारतीय मालदीवमध्ये फिरण्यासाठी जातात. मालदीवच्या एकूण पर्यटकांमध्ये भारतीयांची हिस्सेदारी १२ टक्के इतकी आहे. मालदीवमध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. त्यामुळे भारतीयांनी मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकल्यास, याचे गंभीर परिणाम मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर होतील.
सामान्य भारतीयांसोबत आता, कंपन्यांनी सुद्धा मालदीववर बहिष्कार टाकण्याचे धोरण स्विकारले आहे. देशातील प्रसिद्ध ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी EaseMyTrip ने मालदीवला मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या पोर्टलवरून मालदीवसाठी फ्लाइट तिकीट बुक करणे थांबवले आहे. भारतीय पंतप्रधानांविषयी अपमानास्पद भाषा वापरण्यात आल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
भारतीयांच्या दबावापुढे झुकत मालदीव सरकारने परस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारमधील मंत्री मरियम शिनुआ, मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूम यांना निलंबित केले आहे. मालदीवच्या सोशल मिडियावर सुद्धा लोकांनी या मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. चीनसमर्थक मानल्या जाणाऱ्या राष्ट्रपती मोईज्जू यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.