लहान तोंडी मोठा घास घेतला की, तो घशात अडकणारच! मालदीवनेही आपल्या लहान तोंडात भारताला दुखावण्याचा असाच मोठा घास घेतला असून, त्यामुळे त्याच्या श्वासाला घरघर लागली आहे. केवळ पर्यटकांवर अवलंबून असलेल्या, या बेटसमूहाची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीनंतर डबघाईला येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शत्रूला केवळ लष्करी हल्ल्यांनीच नामोहरम केले जाते असे नव्हे; कारण मोदी हे तर राजनैतिक डावपेचांनीही एखाद्या देशाला गुडघ्यावर आणू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला दिलेल्या दोन दिवसांच्या भेटीने मालदीव बेटांवर त्सुनामी आली आहे. त्या देशात नव्यानेच सत्तेवर आलेल्या, सरकारमधील तीन मंत्र्यांना सरकारमधून काढावे लागले आहे आणि सरकारी पातळीवर मालदीवने भारताकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. हे सर्व होण्याचे कारण मोदी यांनी लक्षद्वीपला दिलेल्या आपल्या भेटीत त्या बेटांवरील रमणीय आणि स्वच्छ समुद्र किनार्यांची तसेच समुद्रात पाण्याखाली दिसणार्या वैविध्यपूर्ण जीवसृष्टीची छायाचित्रे प्रसिद्ध केली आणि लक्षद्वीपला पर्यटनासाठी जाण्याचे आवाहन केले, हे आहे. त्यांच्या या कृतीने मालदीवला जाणार्या, बहुसंख्य पर्यटकांनी आपली बुकिंग्ज रद्द केली असून, लक्षद्वीपला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चिडलेल्या मालदीवच्या तीन मंत्र्यांनी मोदी यांच्यावर टीका करणारी टिप्पणी सोशल मीडियावर केली. तेव्हा सोशल मीडियावरील भारतीयांनी, त्यातही बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी मालदीववर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद लाभला. भारतीय पर्यटकांनी आपल्याकडे पाठ फिरविल्यास, आपली अर्थव्यवस्था डबघाईला येईल, ही गोष्ट त्या सरकारच्या लक्षात येताच, या तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून तत्काळ काढून टाकण्यात आले आणि भारताकडे त्यांच्या टिप्पणीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली.
मालदीव हे भारताच्या एखाद्या महानगराइतकेही मोठे राष्ट्र नाही. त्या देशाचे सर्व उत्पन्न हे तेथे येणार्या पर्यटकांवरच अवलंबून आहे. यातही ८० टक्के पर्यटक हे भारतातूनच येत असतात. भारताकडून मालदीवला अनेक प्रकारे मदत केली जाते. पण, हे काही लक्षात न घेता, त्या देशाचे नव्यानेच अध्यक्ष झालेल्या मोहम्मद मुईझू यांनी भारताला दुखावण्याचा प्रमाद केला. मोदी यांनी त्यावर कोणतेही भाष्य न करता, मालदीवपेक्षा लक्षद्वीप बेटे ही अधिक निसर्गसंपन्न आहेत, हे दर्शविणारी छायाचित्रे तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसृत करताच, पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरविण्याचा निर्णय घेतला. यावरून देशात ‘मोदी हा ब्रॅण्ड’ किती ताकदवर आहे, तेच दिसून आले.
लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रातील भारताचे पश्चिम टोक आहे. मालदीव बेटसमूहांच्या उत्तरेला असलेली ही बेटे नितांत सुंदर समुद्र किनारे आणि निळे-हिरवे नितळ पाणी यांसाठी प्रसिद्ध आहेत. हे समुद्र किनारे आणि तेथील शांत वातावरण हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असते. मोदी यांच्या भेटीनंतर दोन-तीन दिवस लक्षद्वीप बेटे ही ’गूगल’ आणि ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) सर्वात मोठा शोधविषय ठरली आहेत. मालदीववर ही आपत्ती येण्याचे कारण त्या देशात नुकताच झालेला सत्ताबदल आहे. मोहम्मद मुईझू यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच, मालदीवमध्ये तैनात करण्यात आलेल्या, भारतीय सैनिकांना मायदेशी पाठविण्याचा आदेश काढला. वास्तविक त्या बेटांच्या सुरक्षा व्यवस्थेत भारताचा सर्वात मोठा सहभाग आहे. मालदीवच्या सैन्याला आणि नौदलाला भारताच्या लष्कर आणि नौदलाकडून प्रशिक्षण दिले जाते. मालदीव हे अरबी समुद्रात मोक्याच्या ठिकाणी असल्याने, भारताच्या सागरी सुरक्षेत त्याचे स्थान महत्त्वाचे ठरते. म्हणूनच भारताने पहिल्यापासूनच मालदीववर लक्ष केंद्रित केले होते. लष्करी मदतीखेरीज त्या देशाला भारताकडून अनेक प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाते. पण, यासाठी भारताशी कृतज्ञ राहण्याऐवजी मुईझू यांनी भारताविरोधी भूमिका घेतली. इतकेच नव्हे, तर भारताऐवजी चीनला झुकते माप देण्याचा निर्णय घेतला. भारत सरकारने मालदीवचे सार्वभौमत्त्व मान्य केले असले, तरी भारताच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड भारत सरकार स्वीकारणार नाही, हे उघडच होते.
मालदीवच्या बदललेल्या या अधिकृत भूमिकेला बलाने उत्तर देण्याची गरज नव्हती. मालदीवचे सारे अर्थकारण हे भारतातून येणार्या पर्यटकांवर अवलंबून आहे. उत्पन्नाचा हा प्रमुख स्रोत बंद केल्यास, तो देश आपोआप झुकेल, ही गोष्ट उघड होती आणि मोदी यांनी नेमके हेच केले. भारताचे सर्व शेजारी देश हे या ना त्या कारणाने भारतावरच अवलंबून आहेत. भूतान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, मालदीव वगैरे छोट्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार भारताकडून मिळणारी आर्थिक मदत आणि भारतीय पर्यटक हेच आहेत. पण, गेल्या काही वर्षांत या छोट्या राष्ट्रांमधील नेतृत्वात भारतविरोधाचे बीज पेरण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात आहे. भारताला चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न चीन करीत असला, तरी त्याला या देशांना भारताकडून मिळणार्या, भक्कम आर्थिक मदतीची जागा घेता आलेली नाही. चीनने या देशांना दिलेली मदत ही कर्जाच्या स्वरुपात आहे. या कर्जावर तो देश भरमसाठ व्याजही आकारतो आणि ते फेडण्याची ताकद या देशांमध्ये नाही.
चीनचा हा सापळा या देशांच्या आधी लक्षात आला नसल्याने, काही देशांनी भारताचा मित्रत्वाचा आणि मदतीचा हात झिडकारला होता. पण, श्रीलंकेसारख्या देशाला त्याची भीषण किंमत चुकवावी लागली. दोन वर्षांपूर्वी श्रीलंका दिवाळखोरीत गेला आणि त्या देशाच्या अध्यक्षांना देश सोडून परांगदा व्हावे लागले. देशात अराजक माजले. तेव्हा झाले गेले विसरून, पुन्हा भारतानेच श्रीलंकेला मोठ्या मनाने भक्कम आर्थिक मदत पुरविली. परिणामी, या देशाची अर्थव्यवस्था आता रुळावर येऊ लागली आहे. नेपाळमध्येही माओवादी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर, त्यानेही चीनला झुकते माप दिले. पण, त्या देशात आलेल्या भीषण भूकंपाच्या वेळी भारतानेच त्याला मदतीचा हात दिला. त्यामुळे या सरकारने आपली भारतविरोधी ताठर भूमिका बरीच मवाळ केली आहे. मालदीवलाही हा धडा शिकविण्याची गरज होती. मोदी मास्तरांच्या एका छोट्या कृतीने मालदीवचे डोळे उघडले असतील, अशी आशा आहे.