मुंबई : वक्फ बोर्डाच्या नावाखाली हिंदूंची लोकसंख्या कमी करून, २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्याविरोधात आम्ही सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चा काढला. त्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे ऐकले. परंतु, हिंदूंसाठी कितीही गुन्हे अंगावर घेण्याची आमची तयारी आहे, असे स्पष्ट मत भाजप आमदार नितेश राणे यांनी सोमवार, दि. ८ जानेवारी रोजी व्यक्त केले.
मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना राणे म्हणाले, इस्लाम मानणाऱ्या एकाही देशात किंबहुना पाकिस्तानातही वफ्क कायदा नाही. लॅण्ड जिहाद, लव्ह जिहादच्या माध्यमातून यांना भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे. दिवसरात्र त्यासाठी मेहनत घेतली जात आहे. मागे पडघा गावाचे नाव बदलून अल-शाम ठेवले. भविष्यात सोलापूरचे नाव सलामपूर ठेवतील. त्यामुळे यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी असे असंख्य गुन्हे अंगावर घ्यायची आमची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एव्हिडन्स अॅक्ट'चा अभ्यास करावा आणि सत्य म्हणजे पुरावे, असे समजून कारवाई करावी, असा सल्ला संजय राऊतांनी दिला. मग याच 'एव्हिडन्स अॅक्ट' अंतर्गत एका डॉक्टर महिलेने खुद्द संजय राऊतांच्या विरोधात जे सातत्याने पुरावे दिले आहेत, त्यांना नजरेसमोर ठेवून राऊतांना अटक करावी का?, असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला. संजय राऊतांच्या गळ्यात मातोश्रीचा पट्टा आहे, सिल्वर ओक की १० जनपथचा पट्टा आहे, हे त्यांनी सांगावे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश राम राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे जे घरात आणि बाहेर रावणाची भूमिका निभावत आहे, त्यांनी दुसऱ्यांना रावण बोलण्याची हिंमत करु नये, असा टोलाही राणे यांनी लगावला.
ठाकरे गटात दोनच आमदार राहतील
ज्याचा आवाज पुरुषाचा नाही, त्याने आव्हानांची भाषा करणे हास्यास्पद आहे. दाढी काढली, म्हणजे लोक तुम्हाला गांभीर्याने घेतात, असे कुठे लिहिलेले नाही. आताही तुम्ही हेराफेरीतले बाबुरावच दिसता. त्यात काही फरक झालेला नाही, असा टोला राणे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. उद्धव ठाकरेंना नाट्य संमेलनात बोलावून, एका राज्याच्या प्रमुखाने गळ्याला पट्टा लावून लोकांना मुर्ख कसे बनवले यावर नाटक करावे. याची स्क्रिप्टही उद्धव ठाकरेंकडे तयार आहे. २०२४ नंतर त्यांना राजकारणात जागाच राहणार नाही. उद्धव ठाकरेंना धक्क्याची भाषा जमत नाही. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, याचा खरा अर्थ तेव्हाच कळेल जेव्हा उबाठा गटात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोनच आमदार राहतील. येत्या २३ जानेवारीला उद्धव ठाकरे स्वत: जाहीर करतील की, मी उबाठा काँग्रेसमध्ये विलीन करीत आहे. त्यामुळे हे लोक 'कुछ दिनों के मेहमान' आहेत. यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण द्यावे, असेही नितेश राणे म्हणाले.