एक कसलेला अभिनेता म्हणूनच नव्हे, तर डबिंग क्षेत्रात ‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणूनही नाव कमावलेला शरद केळकर. एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटासाठी प्रभासला आवाज देण्याची संधी शरद यांना मिळाली. या संधीचे सोनं करून शरद केळकर यांनी अभिनयासोबतच डबिंग क्षेत्रात ‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी वाहिनीवर ‘द लेजेंड ऑफ हनुमान’ या वेबसीरिजमध्ये केळकर यांनी रावणाच्या भूमिकेला आवाज दिला असून, त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
नवं काहीतरी शिकण्यासाठी...
अभिनेते शरद केळकर यांनी मराठी, हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटांतही उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. अभिनय आधी की डबिंग आर्टिस्ट, असा प्रश्न शरद यांना विचारला असता ते म्हणाले, “आधी मी अभिनय क्षेत्राची निवड केली. कारण, त्यावेळी माझ्या आवाजाचा मी डबिंगसाठी उपयोग करू शकतो, याची माहिती मला नव्हती. कारण, लहानपणापासून मला अडखळत बोलण्याचा त्रास होता. त्यातून मी स्वत:ला बाहेर काढून पुढे अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. सुरुवातीपासून एक गोष्ट कायम माझ्या डोक्यात होती, ती म्हणजे ज्यावेळी आपण चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम करतो, जिथे तुमच्याकडे डबिंग करण्यासाठी वेळ नसतो आणि घाईत डबिंग केले जाते. डबिंगची कला तुमच्याकडे अवगत नसेल, तर त्याचा त्रास होतो. तेव्हा मी विचार केला की, भविष्यात ज्यावेळी मी चित्रपटांत काम करेन, त्यावेळी मला डबिंग करावे लागेल आणि सर्वसाधारणपणे डबिंग करताना तुम्ही तुमचे काम अधिक चांगले करू शकता किंवा बिघडवूदेखील शकता. त्यामुळे स्वत:ला डबिंगची कला अवगत असावी म्हणून शिकण्यासाठी मी डबिंग शिकलो. त्यावेळी भविष्यात एस. एस. राजामौली मला संधी देतील आणि ‘बाहुबली’सारखा चित्रपट माझ्या जीवनात येईल, असे कधी स्वप्नातदेखीव वाटले नव्हते. त्यामुळे यातच करिअर करायचे या उद्देशाने नव्हे, तर ही कला एक अभिनेता म्हणून मी शिकावीशी असे वाटल्याने मी डबिंग शिकलो, पण आज नक्कीच त्या कलेचे सोने झाले आहे, असे वाटते.”
डबिंग आर्टिस्ट एक उत्तम नट असणंही गरजेचं
डबिंगमुळे कोणत्याही भाषेतील चित्रपट आपल्याला आवडीच्या भाषेत पाहता येतात. परंतु, डबिंग ही एक अभिनयाचीच कला आणि भाग आहे, असे शरद केळकर सांगतात. ‘व्ह़ॉईस ओव्हर’ किंवा ‘डबिंग आर्टिस्ट’ म्हणून काम करत असताना ज्या व्यक्तिरेखेला आपलाआवाज द्यायचा आहे, त्या पात्राला बघून किंवा केवळ त्यांच्या ओठांच्या हालचालींचा पाहून डबिंग केले जाते, हा विचार चुकीचा आहे. डबिंग करताना केवळ आवाजात बदल न करता, आवाजातूनहीअभिनय करावा लागतो. मी आत्तापर्यंत ज्या पात्रांना आवाज दिला, तो आवाज देत असताना त्याक्षणी मी ती भूमिका डबिंग कलाकार म्हणून जगत असतो. त्यामुळे कोणत्याही डबिंग आर्टिस्टला आधी नट होणं फार गरजेचं आहे. कारण, त्याला ते पात्र तंतोतंत साकारावे लागते, केवळ आवाजातून तो फरक जाणवू शकत नाही. समजा, तेलुगू किंवा इंग्रजी चित्रपटाचे डबिंग करताना ती व्यक्तिरेखा कोणत्या कलाकाराने साकारली आहे हे मला माहीत नसेल, पण त्या व्यक्तीच्या शरीरयष्ठीला, अभिनयाला साजेसा आवाज देणं, ही प्रत्येक डबिंग आर्टिस्टची जबाबदारी असेल. केवळ आवाज देऊन काही उपयोग होत नाही. त्यात भावनादेखील असाव्या लागतात,” असे महत्त्वाचे विधान शरद यांनी केले.
“शिकण्याची जिद्द असताना २० रुपयांतही काम केले. एक नट किंवा एक कलाकार म्हणून कायम शिकण्याची वृत्ती ही प्रत्येक कलाकाराकडे असली पाहिजे,” असा अट्टहास शरद यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “नट म्हणून मागे वळून पाहताना माझ्यातला बदल रसिक प्रेक्षकांनी सांगावा. पण, इतकी वर्षं मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपट, मालिकेत काम केल्यानंतर आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून नावारुपास आल्यानंतर एक माणूस म्हणून माझ्या स्वभावात स्थैर्य आले आहे. आता मी खर्या अर्थाने जीवन जगतो, असे वाटत आहे.”
यावेळी एक किस्सा सांगताना शरद केळकर म्हणाले की, “ज्यावेळी मी डबिंग शिकण्यास सुरुवात केली तेव्हा, एका चित्रपटासाठी मी डबिंग केलं होतं. त्या चित्रपटासाठी तीन दिवस डब केल्यानंतर मला केवळ २० रुपये मिळाले होते. पण, मला त्या पैशांपेक्षा ती कला शिकण्याची आणि तो अनुभव घेण्याची इच्छा होती. प्रत्येक कलाकार मग तो कोणत्याही क्षेत्रात पारंगत असो, कामं सातत्याने केली की नवी कामं तुमच्याकडे येतात. हे कायम कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर करणार्या कलाकारांनी लक्षात ठेवले पाहिजे. शिवाय कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज तत्पर राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्यातील कलागुणांची पारख करून जीवनात पुढे जावे आणि ध्येय गाठावे,” असा तरुण कलाकारांना सल्लादेखील शरद केळकर यांनी दिला.
रसिका शिंदे-पॉल