बारामती अॅग्रोवर ईडीची धाड? मोठी कारवाई? रोहित पवारांनी केलं ट्विट
05-Jan-2024
Total Views |
मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या सहा ठिकाणांवर ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. बारामती अॅग्रो गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी दि. ५ जानेवारी २०२४ शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून ईडीची कारवाई सुरु आहे. बारामती अॅग्रो गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना गेल्यावर्षी ईडीची नोटीस आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची कारवाई अद्याप सुरु आहे. कारवाई दरम्यान कोणालाही बारामती अॅग्रोच्या कार्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येत नाहीये.
बारामती अॅग्रो लिमिटेड उत्पादने विशेषत: मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. बारामती अॅग्रो कंपनी प्राणी आणि पोल्ट्री फीड मॅन्युफॅक्चरिंग, साखर आणि इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग, वीज निर्मिती, शेतीमाल, फळे आणि भाजीपाला आणि डेअरी उत्पादने या क्षेत्रात काम करते.
वादात अडकण्याची बारामती अॅग्रोची ही पहिलीच वेळ नाही. याआधी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने बारामती अॅग्रो नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आधी सुद्धा बारामती अॅग्रोच्या साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओ आहेत. तर त्यांचे वडील राजेंद्र पवार हे संचालक आहेत. ईडीच्या छापेमारीनंतर रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर रोहित पवारांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, "अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल."