गर्गे आर्ट स्टुडिओची शंभरी प्रवास १०० वर्षांचा...

    05-Jan-2024   
Total Views | 135
Article on Garge Art Studio

नाशिक येथील ‘गर्गे आर्ट स्टुडिओ’ २०२३ साली १०० वर्षांचा झाला. त्यानिमित्त गेल्या तीन पिढ्यांनी साकारलेल्या कल्पक कलाकृती, शिल्प आणि चित्र तसेच छायाचित्र यांचे प्रदर्शन जहांगीर गॅलरी येथे आयोजित करण्यात आले होते. तेव्हा कलासाधनेत पूर्णपणे रममाण झालेल्या या कुटुंबाशी त्यांच्या १०० वर्षांतील अनुभव, कलावारशाविषयी साधलेला कलासंवाद...

शाळेतल्या कलाशिक्षकाने एक चित्र फाडून ते विद्यार्थ्यांच्या तोंडावर फेकलं. ज्या १२ वर्षीय मुलाचं चित्र त्या कलाशिक्षकाने तेव्हा भिरकावलं होतं, तो मुलगा आज गर्गे घराण्याचा कला वारसा उत्तम चालवतोय. ‘गर्गे आर्ट स्टुडिओ’चा हा तिसर्‍या पिढीतील कलाकार म्हणजे श्रेयस मदन गर्गे.

नाशिकजवळ काही अंतरावर गजानन नारायण गर्गे यांनी गणपतीमूर्ती बनवण्याचा कारखाना सुरू केला. त्या मूर्तींना पंचक्रोशीतून मागणी होती. पुढे त्यांच्या मुलानेही हेच मूर्तिकाम सुरू केले. परंतु, मदन गर्गे फार लहान असतानाच गजाननरावांचे निधन झाले. त्यांची काही छायाचित्र स्टुडिओमध्ये आजही जतन करून ठेवली आहेत. ग. ना. गर्गे उपाख्य ’आर्टिस्ट’ व त्यांचे दोन बंधू १९२३ सालापासून स्टुडिओची जबाबदारी सांभाळत होते. पुढे शिल्पकार मदन गर्गे जे. जे. स्कूलमधून शिक्षण पूर्ण करून नाशिकला परतले. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी अरुणा गर्गे यांनी पुढे समर्थपणे गर्गे कला दालनाची धुरा आपल्या शिरोधार्य घेतली. या दोघांनी साकारलेल्या शिल्पकृतींमध्ये दर्जेदार कलात्मक मूल्य व गुणवत्ता, अभिरुचीपूर्ण सौंदर्यदृष्टी, उदात्त प्रतीकात्मकता या गुणांचा सुरेख मेळ साधलेला दिसतो. त्यांच्या कलाकृती गुणसंपन्नतेमुळे भारतात व भारताबाहेरही गौरवल्या गेल्या. व्यावसायिक शिल्पनिर्मिती करताना कलेसोबतच मूल्यांचे भान असणे किती गरजेचे आहे, हा आदर्शच त्यांनी पुढील पिढीसमोर मांडला. २००८ मध्ये मदन गर्गे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर एकट्या अरुणाताईंनी हा सर्व डोलारा एक हाती सांभाळला. ८४ वर्षे म्हणजे जवळपास अर्धशतक त्यांनी या स्टुडिओमध्ये काम केले. त्यांचा धाकटा मुलगा श्रेयस आणि पुतणे मंदार व मिलिंद हे तिघेही कला परंपरा समर्थपणे चालवत आहेत.

अरुणा गर्गे आपला प्रवास सांगताना म्हणाल्या की, “खरं तर आमच्या या कलासाधनेला १०० वर्षे झाली, हे आम्हा कुणालाच ठावूक नव्हते. एक दिवस घर आवरताना तेजसला एक पावती सापडली. स्थापना १९२३. माझ्या सासर्‍यांनी स्थापना केली होती. माझे अहो जेजेत शिकून आले. त्यांना त्यावेळी फेलोशिप देऊ केली. महिन्याचे पैसे मिळणार, पण मुलांना शिकवायचे. तेच तेच नाक, कान, डोळे किती दिवस करत बसायचे? मी चित्र काढायचे. एकदिवस मी म्हटलं वेगळं माध्यम आहे, करून पाहूया. करता करता इतकं जमू लागलं की, हे माझंच माध्यम झालं. शिल्पकार म्हटलं तर एकट्या एकट्याच काम नाही. टीम लागते. स्टुडिओने ही टीम मला उपलब्ध करून दिली. शिकत गेले, करत गेले. आज ४८ वर्षे स्टुडिओ सांभाळतेय. आता मात्र श्रेयसने मला निवृत्त करावं, अशी इच्छा आहे. काम मात्र थांबवणार नाहीए. मला बरेच काही करायचे होते. कॉलेजमध्ये असल्यापासून एम्ब्रॉयडरी वगैरे करताना पाहिली, तेव्हा ती इच्छा अपुरी आहे. चित्र माझी थांबलीच. ती पुन्हा सुरू करायची आहेत.”

आपल्या कलेविषयी श्रेयस गर्गे अगदी भरभरुन सांगतात. ते म्हणतात की, “इन्स्टाग्राम हातात आलं आणि मी करत असणार्‍या कामाविषयी जगात काय होतंय, हे मी शोधू लागलो. युरोपमध्ये वगैरे माझ्यापेक्षा लहान वयाची मुलं उत्तम काम करताना दिसतायेत. हे मलाही करावं वाटू लागलं. भारतातही ही पद्धत हळूहळू पाय रोवू लागली होती. पारंपरिक पद्धतींवर तर आता हात बसला आहे. पण, इथे अजूनही शोध घेणं सुरूच आहे. कारागिरी शिकतोय. कलाकाराचा प्रवास कारागिरीपर्यंत पूर्ण होत नाही, तर तिथून सुरू होतो आणि अभिव्यक्तीच्या मूर्त स्वरूपांवर स्थिरावत असतो. तो पूर्ण कधीच होत नाही. एकदा का हे माध्यम, ही पद्धत माझ्या पूर्ण परिचयाची झाली की, त्यात कलाभिव्यक्ती दिसू लागतील. अर्थात काही काम हातानेसुद्धा करावे लागतेच. काही विशिष्ट भाव दाखवायचे झाल्यास हाताशिवाय दुसरा पर्याय नसतो.”

तेजस गर्गे म्हणाले, “मी लहान असताना एकदाच छन्नी हातात घेतली. त्याचवेळी बाबांचा दात तोडला आणि मग मी या कलेपासूनच दूर राहिलो. पुरातत्व अभ्यासात स्वतःला झोकून दिलं आणि इथे आलो. परंतु, जेव्हा मुलांना घेऊन अजिंठा-वेरूळसारख्या ठिकाणी जातो, तेव्हा मला ती शिल्प उत्तम समजावता येतात त्यांचे भाव समजतात. मला वाटतं ही घरातूनच मिळालेली देणगी. आज शतकपूर्तीचं प्रदर्शन मुंबईत जहांगीर कलादालनात होतंय, ही आनंदाची गोष्ट आहे. नाशिकमध्येच वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम करायचे ठरले होते. पण, शेवटी स्टुडिओच मुंबईत आला आणि हे कलाविश्व मुंबईकरांसाठी खुलं झालं. आजोबांनी केलेल्या पेंटिंग्सपासून श्रेयसने केलेल्या शिल्पांपर्यंतचा १०० वर्षांचा प्रवास यात आहे. मी जरी कलाकार नसलो तरीही एक कलारसिक आणि या कुटुंबाचा भाग म्हणून मला या सोहळ्यात सहभागी होता आले, याचा अतिशय अभिमान वाटतो!”

त्यामुळे कलेकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता, गेली १०० वर्षे अविरतपणे कलासाधना करणार्‍या या गर्गे कुटुंबीयांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्यांची ही कलाकारी, हा कलावारसा असाच पिढ्यान्पिढ्या बहरत जावो, याच मनस्वी शुभेच्छा...

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121