१ मे २०२२ सर्वत्र कामगार दिन जल्लोषात साजारा केला जात होता. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे व्यासपीठावर आले आणि त्यांनी शरद पवारांचा समाचार घ्याला सुरुवात केली. राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीचं राजकारण सुरु झालं. शरद पवार हे कधीही कुठल्या जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत. इतकंच नाही तर शरद पवार हे नास्तिक असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी त्यावेळी केला होता. ते म्हणाले की, शरद पवार नास्तिक असल्याचं मी नाही खुद्द शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत म्हणटले होते.
त्यावरून शरद पवार नास्तिक आहेत, ह्या राज ठाकरेंच्या विधानाची बरीच चर्चा झाली होती. पण त्यानंतर आणि त्याआधी शरद पवारांनी केलेली विधानं पाहता ते नास्तिक असल्याचं राजकीय विश्लेषक ही सांगतात. त्यावेळी राज ठाकरेंच्या विधानाला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले होते की, "मी माझ्या देवधर्माविषयीचे प्रदर्शन कुठेही करत नाही." हा झाला २०२२ चा किस्सा. आता दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याबद्दल शरद पवार म्हणाले की, "श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाचे मला निमंत्रण आलेले नाही. आणि आले तरी मी जाणार नाही. कारण मी मंदिरात जात नाही. पुजाअर्चा हा वैयक्तिक भाग आहे. माझी काही श्रद्धास्थान आहेत. त्याठिकाणीच मी जातो." हे झाले शरद पवारांच्या बाबतीतले दोन किस्से. दरम्यान दि. ३ डिसेंबर रोजी जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांबाबत एक वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तूळात एकच वाद निर्माण झाला. शरद पवार गटाचे आमदार असलेल्या आव्हाडांनी हे वक्तव्यं जाणूनबुजून राम मंदिर सोहळ्याच्या काही दिवसांपूर्वीच का केलं? अशा वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास नेमका काय आहे ?
दि. ३ डिसेंबर रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात बोलताना आव्हाड यांनी राम मंदिराच्या लोकार्पणावर एक वादग्रस्त विधान केलं. आव्हाड म्हणाले की, राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. शिकार करून खाणार राम आमचा आहे. आज सगळे आम्हाला शाकाहारी बनवायला जातात पण आम्ही रामाचा आदर्श पाळतोय. त्यामुळे राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. रामाने १४ वर्ष वनवास भोगला, मग शाकाहारी कसा असेल? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. जितेंद्र आव्हाडांच्या विधानानंतर सर्वत्र संतापची लाट पसरली. या आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना मंहत सुधीर दास पुजारी म्हणाले की, अत्यंत मुर्खपणाचे विधान आहे. वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते, असा उल्लेख नाही. उलट प्रभू रामचंद्र फळ,मूळ, कंदमूळ खाऊन चौदा वर्ष वनवासात राहिलेत, असा उल्लेख आहे.
तसेच आव्हाडांचे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. आणि असे विधान करून ते तमान हिंदूंची भावना दुखावत आहेत, अशी भुमिका महंत अनिकेत शास्त्री यांनी घेतली. त्याचबरोबर शरद पवार आणि त्यांचा पक्षचा स्तर इतका खालवला की, त्यांची मजल प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यापर्यत गेली आहे, अशी टीका आचार्य तुषार भोसले यांनी केली. विशेष म्हणजे आव्हाडांनी केलेले पहिले वादग्रस्त विधान नाही. याआधी ही अशा प्रकारची विधाने जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आली आहेत. शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य देखील आव्हाडांनी दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी केले होते. त्यामुळे हिंदूंच आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आता प्रभू श्रीरामचंद्रांबद्दलचे वादग्रस्त विधान आव्हाडांना नक्कीच भोवणार आहे.
मुळात आपल्या घरी रामनवमी, गुढीपाडवा असा काहीही शुभ प्रसंग असला तर आपण देवाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतो. उलट अशावेळी मांसाहार घरीही वर्ज्य असतो. अशीच आपली संस्कृती आहे. पण तरीदेखील आव्हाड असे विधान जाणूनबुजून वाद निर्माण करण्यासाठी करत आहेत का? , असा प्रश्न निर्माण होतो. याआधी ही शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा नव्हते. त्यामुळे 'जाणता राजा' हे बिरुद रामदास स्वामींनी शिवरायांना दिलं. पण रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असे विधान केले होते. त्यामुळे आव्हाड आपल्या पक्षप्रमुखांसारखीच भुमिका फक्त पवारांना खुश करण्यासाठी तर घेत नाहीत ना? असा ही प्रश्न निर्माण होतो.
मुळात जनसामान्यांच्या आस्थेवर आघात करून जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार काय साध्य करू पाहत आहेत? हा ही प्रश्न आहे. एका विशिष्ट आणि विघ्नसंतोषी वर्गाला खूश करण्यासाठी पवार आणि त्यांचा गट अशी विधानं करत नाहीत ना? ह्यांचा ही आपण विचार करायला हवा. या आव्हाडांच्या वादग्रस्त विधानामुळे फक्त हिंदूत्ववादी पक्ष, महंत यांनीच आक्रमक पवित्रा घेतला नाही. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने ही ठाण्यात आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन केली. त्यामुळे आव्हाडांच्या बंगल्याजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आव्हाडांना घरचा आहेर देत रोहित पवार म्हणाले की, देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ, अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा टोला ही रोहित पवारांनी लगावला.
तरीदेखील आव्हाडांनी आपण ते विधान अभ्यासाअंती केल्याचे पत्रकार परिषदेत ही बोलून दाखवले. तसेच “रोहित पवार काय बोलतात याला मी फार महत्त्व देत नाही. मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही. अजून लहान आहेत" , अशा शब्दात आव्हाडांनी रोहित पवारांना टोला लगावला. मात्र आव्हाडांच्या या विधानावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी मौन बाळगले आहे. त्यामुळे आव्हाडांच्या विधानाला कुणीही पाठिंबा देत नाही आहे. त्यामुळे मी कोणताही प्रश्न एकटा लढतो, अशी खंत खुद्द आव्हाडांनीच बोलून दाखवली. तरी पवार- सुप्रियाताई यांच्याशिवाय आव्हाडांकडे कोणीही वाली उरलेला दिसत नाही. त्यामुळेच अशी मुक्ताफळे आव्हाड उधळत आहेत का? असा ही प्रश्न निर्माण होतो.