आपतत्व आणि भगवान शिव
आपतत्वाचे आराध्यदैवत भगवान शिवशंकर असून त्यांचा वर्ण शुभ्रच आहे. शंकराची पत्नी गौरी म्हणजे पार्वती हीसुद्धा गौरच आहे. पार्श्वभूमीतील हिमालय, शंख, नंदी, गंगा आणि चंद्र हे सारेच शुभ्र कांतिमान! आपचे व्यक्त स्वरुप शुभ्र आहे. म्हणूनच भगवान शंकराला पांढरी फुले वाहतात. भगवान शिव संगीताचे आदिदैवत मानले गेले आहेत, त्यांनी आपल्या एकेका मुखातून मिळून पाच स्वर दिले असून, पार्वतीने सहावा स्वर दिला, असे शास्त्रात वर्णन आहे. शंकराला पाच मुखे असतात, म्हणून त्यांना ‘पंचमुख’ म्हणतात. या दृष्टीने भगवान शिवशंकर संगीत दीक्षादेवता होय. शिवानेच स्वरशास्त्र आणि संगीतशास्त्र निर्माण केले आहे. स्वराचा आद्यस्वर ‘षड्ज’ असून तोही शुभ्र वर्णाचा आहे. त्यामुळे खर्ज साधनेने आपतत्वात प्रवेश करता येतो. पृथ्वीवरच्या भोगाला जे कंटाळले असतील किंवा अतृप्त असतील, त्यांनी आपतत्वातील सिद्धीभोगरुपी अप्सरांचा भोग घ्यावा. पुनः सांगायचे म्हणजे ‘अप्सराभोग’ ही कवी कल्पना नसून ती एक सत्य घटना आहे. अप्सराभोगाच्या दृष्टीने आपतत्वाचे जो साधन करेल, त्याला प्रत्यक्ष अप्सराभोग मिळू शकेल. ज्या स्त्रिया गंधर्व भोगाच्या लालसेने आपतत्वाची साधना करतील, त्यांना गंधर्व भोग प्राप्त होऊ शकतील. महाभारतादी पुराण ग्रंथात असल्या गंधर्व, अप्सरा भोगांची अनेक उदाहरणे दिली आहेत. त्या बाष्कळ कथा नसून ऐतिहासिक घटनांचा दाखला आहेत.
आपदेवता
आपतत्वातील अप्सरा म्हणजे सिद्धी वेगळ्या आणि आपदेवता निराळ्या. आपदेवता आपतत्वातील असल्या तरी त्या तत्वातील त्या उच्च अवस्थेतील अस्तित्वे आहेत. अप्सराभोग म्हणजे सिद्धीभोग. सिद्धीभोगातच जो रेंगाळेल, त्याला आणखी वरील तत्वात शिरता येणार नाही. असल्या सिद्धीभोगात रममाण होणारा साधक उच्च अवस्थांना जाणार तर नाहीच, पण पुण्यक्षय झाल्यावर आणखी अवनत दशेला त्याला यावे लागेल. गीतेत लिहिले आहे की, ’क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशंति!’ भोगप्रवण पुरुष केव्हा ना केव्हा खाली येणारच! जो तापसी असेल, योगी असेल, त्यालाच अप्सरा किंवा गंधर्व दिसतात. भक्तिमार्गामधील साधकाला असल्या गंधर्व अप्सरांचा उपसर्ग होत नसतो. तपस्व्याच्याच मागे सिद्धी म्हणजे अप्सरा लागून त्याला तपभ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतात. भक्ताने त्याचे सर्वस्व भगवंताला अपर्ण केले असल्यामुळे त्याच्या मागे अप्सरा लागू शकत नाही. भक्त सिद्धींच्या मागे नसतो, तर तो भगवंताच्या दर्शनाकरिता अहर्निश तळमळत असल्याने त्याला जो काय अनुभव येईल, तो त्याच्या इष्ट देवतेच्या रुपानेच येत असतो. म्हणून भक्ताच्या मागे अप्सरागंधर्व लागल्याचा दाखला पुराण वाङ्मयातून आढळणार नाही. भक्ताला साक्षात्कार होईल भगवंताचाच, अन्याचा नाही! आपतत्वातील देवतांचे वेदात मोठे सुरस वर्णन आले आहे. ऋग्वेदातील आपदेवतांचे वर्णन पाहा-
आपोहिष्टा मयोभूवस्था न उर्जे दधातन। महेरणाय चक्षसे।
यो वःशिवतमो रसः। तस्य भाजयतेह नः उशतीरिव मातरः। तस्मा अरंगमाम वः। यस्यक्षयाय जिन्वथ आपो जनयथा चनः।
अर्थात, हे जलदेवतांनो, या लोकात तुम्ही सुख उत्पन्न करणार्या आहात. अशा सुखरुप तुम्ही आम्हाला सर्व उत्तम अन्न आहार प्राप्त करून द्या. तुमच्या सुखस्वरुप शिवतम रसाने आम्हाला पुष्ट करुन शास्त्रज्ञान आणि आत्मज्ञानाने परिपूर्ण करा. माता बालकाला ज्याप्रमाणे दुधाचे पान करविते, तद्वत् आम्हालाही तुमच्या शिवतम रसाचे पान करवा. आम्ही त्या रसाच्या प्राप्तीकरिता तुमच्या सन्निध येतो, म्हणजेच त्याकरिता आम्ही तुमची साधना करतो. आमचे पापक्षालन करून आमचा वंश अविच्छिन्न राखण्यास आम्हास समर्थ करा! आपतत्वाची साधना सिद्धीप्रद आणि मंगलप्रद असते. आज या साधना लुप्तप्रायशा झाल्या असल्या, तरी नष्ट झाल्या नाहीत. साधना केल्यास त्या आजही प्राप्त होऊ शकतात. गानयोगी होण्याकरिता आपतत्वाची साधना आवश्यक आहे. फक्त वाचन करून गानयोगातील वर्णित सत्याचा आणि सिद्धीचा अनुभव येणार नाही.
आपतत्वाचे साधन
आपतत्वाबद्दल इतकी चर्चा केल्यावर आपतत्वाचे साधन कसे करावे; याबद्दल निर्देश करणे क्रमप्राप्त आहे असे वाटते. योगमार्गातील गुह्ये सर्वसामान्यांना प्रकट करू नये, असा योगमार्गीयांत एक सामान्य दण्डक आहे. एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामी यांनी तर जो योगमार्गातील गुपिते प्रकट करील त्याचा सर्वनाश होईल, असा स्पष्ट संकेत दिला आहे. भगवद्गीतेतही शेवटी सांगितले आहे- ’इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन।’ परंतु, भगवद्गीता ग्रंथ केवळ भारतातचनव्हे, तर सर्व जगातील विद्वान, साहित्यिक आणि पारमार्थिक अवस्था इच्छुकांचा आधारग्रंथ होऊन बसला आहे. भगवद्गीतेचा आजच्या इतका विस्तार जगात झाल्यानेच खर्या धर्माकडे जगातील विद्वान आणि जिज्ञासू वळत आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. प्रख्यात वैज्ञानिक आईनस्टाइन यांचा ‘सापेक्षवादाचा सिद्धांत’ भगवद्गीतेतील ‘संघातश्चेतना धृतिः’ या महावाक्यावरच मर्यादित ज्ञानात आधारला असावा, अशी लेखकाची साधार समजूत आहे. भारतातील वैज्ञानिकांनी त्याचा मर्यादित का असेना, पण योग्य अर्थ लावण्याचा प्रयल केला नाही. तो यत्न आईनस्टाइनसारख्या परस्थाने करावा, हे त्यांना खासच भूषणावह आहे. तात्पर्य, गीतेचा प्रचार सर्व जगात झाला नसता, तर त्याचा योग्य विनियोग करणारा आईनस्टाइनसारखा महान वैज्ञानिक उत्पन्न होण्यात अनेक अडथळे उत्पन्न होऊन बराच कालावधी वाया गेला असता. ज्यांना ते ज्ञान नको असेल, ते त्यापासून आपणहून दूर राहतील. फार फार तर ते त्याची टिंगल करतील एवढेच. पण, टिंगल करणार्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना त्या सनातन ज्ञानापासून वंचित करण्याच्या प्रयत्नात खर्या जिज्ञासूंनाही त्यामुळे वंचित व्हावे लागते आणि अशा तर्हेने ज्ञानपिपासा मंद होऊन कालांतराने ज्ञानाचे मार्गही लुप्तप्राय होत असतात.
अती उच्च धारणेचा आर्यावर्त शतकानुशतके गुलामीत राहावा आणि सर्वच बाबतीत परधार्जिणा आणि परावलंबी राहावा, याचे कारण वरील प्रकारच्या गुप्ततेत अभिमान ठेवण्याच्या वृत्तीत आहे, असे म्हटल्यास ते चूक होणार नाही, असे वाटते. ज्ञानाची द्वारे मोकळी असावी मग त्याचा उपयोग कोणी करो वा न करो. रामकृष्ण परमहंसांनी त्यांना जे ज्ञात होते, ते सर्व आपल्या भक्तांसमोर सजवून ठेवले. ज्यांना जे आवडले आणि जमले, त्याने त्याचा स्वीकार केला आणि त्याचा जगात प्रचार केला. स्वामी विवेकानंदांनी परिश्रमाने नावलौकिकास आणलेली जागतिक सद्धर्म संघटना ‘रामकृष्ण मिशन’ हे त्याच सद्बाजाराचे फळ होय, असे म्हणण्यास प्रत्यवाय असू नये. असे करताना ती रहस्ये प्रकट करण्यार्यांवर जर आपत्ती येत असतील, तर त्या त्याने सहर्ष स्वीकारल्या पाहिजेत.
योगिराज हरहरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७