परी तू जागा चुकलासी!

    30-Jan-2024   
Total Views | 80
monalisa
 
‘कला की शाश्वत खाद्य संस्था?’ हा प्रश्नच मुळात कितपत रास्त आहे, हा प्रश्न पडावा, असा प्रसंग नुकताच घडला. युरोपात गेले अनेक दिवस सुरू असलेली आंदोलने-मोर्चे लक्षात घेता, तेथील अडचणी समजून घेतानाच, त्या हाताळाव्या कशा याचाही मागोवा घेणे तितकेच गरजेचे.  
 
फ्रान्समधील पॅरिसच्या सुप्रसिद्ध लुव्र संग्रहालयात लिओनार्डो दा विंचीचे जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र पाहण्यासाठी आजही गर्दी उसळून येते. जगभरातून लाखो पर्यटक मोनालिसाच्या त्या ऐतिहासिक चित्राची एक झलक पाहण्यासाठीही फ्रान्स गाठतात. तेव्हा, अशा या चित्रावर रविवार, दि. 28 जानेवारी रोजी दोन महिलांनी चक्क सूप फेकल्याची घटना घडली. अनेक माध्यमांतून या घटनेचे वृत्त, व्हिडिओ झळकू लागले. मग काय तथाकथित पर्यावरणवाद्यांनी केलेले हे कृत्य, त्यामागची कारणे जगाच्या केंद्रस्थानी आली. झाले असे की, जेवणामध्ये असलेले खाण्याचे सूप वाट्यांमध्ये घेत रविवारी दोन महिला संग्रहालयात उपस्थित होत्या. या वाट्यांमधील सूप जगप्रसिद्ध मोनालिसाच्या चित्रावर फेकल्यामुळे एकच गोंधळ उडाला. चित्रावर सूप फेकल्यानंतर चित्राभोवती लावलेल्या अडथळ्यांना पार करून या दोन महिलांनी आपले जॅकेट्स काढत शर्टवरील संदेश दाखविला. "Riposte Alimentaire' असे त्यांच्या कपड्यांवर काळ्या अक्षरांत लिहिलेले होते."Riposte Alimentaire'या फ्रेंच शब्दाचा इंग्रजी अर्थ 'Food Response' असा आहे. याच नावाच्या संस्थेचे प्रतिनिधित्व करणार्‍या या सूपफेकू महिला. मोनालिसाच्या चित्रावर यापूर्वीही अशा प्रकारचे नुकसानीचे प्रयत्न झाल्यामुळे या चित्राला तेथील सरकारने एक बुलेटप्रुफ काचच बसवली आहे म्हणा. या काचेमुळेच मूळचे चित्र खराब झाले नाही. मात्र या कृतीतून स्वतःलापर्यावरणवादी म्हणवणार्‍यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अज्ञानाचे दर्शन मात्र घडले. ‘कला की शाश्वत खाद्याचा अधिकार? यामध्ये काय निवडाल?’ असा काहीसा विचित्र प्रश्न उपस्थित करत, घोषणाबाजी करणार्‍या या महिलांनी तिथेच मग आंदोलनही केले.
 
उपस्थित संरक्षकांनी पडदे लावून हा प्रसंग सावरला खरा, पण माध्यमांमध्ये ही बातमी वार्‍यासारखी पसरलीच. या घटनेचे पुढे स्पष्टीकरण देताना पर्यावरण आणि अन्नस्रोतांचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी आम्ही ही सूपफेक करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, असे त्या आंदोलक महिलांचे म्हणणे. म्हणजे एकीकडे अन्नसोतांच्या संरक्षणासाठी आंदोलन करतोय, अशी भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे त्याच अन्नातील सूपची अशी नासाडी करायची, हा कुणीकडचा दुटप्पीपणा? त्यातच या कृत्यामुळे हे आंदोलन चर्चेत आले खरे, पण यातून शेतकर्‍यांचे आणि शाश्वत खाद्य संस्था निर्माण करण्याबाबतचे प्रश्न सुटले का? शेतकर्‍यांचे आणि पर्यावरणाचे प्रश्न जितके खरे आणि रास्त आहेत, त्याचप्रमाणे कला, कलादालने ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. शेतमालाला मिळणारा कमी भाव, कररुपी मोजावे लागणारे अधिकचे पैसे अशा आंदोलकांच्या मागण्या रास्त असल्या, तरी अशाप्रकारे आपल्याच देशातील वारसा चित्राला त्यासाठी लक्ष्य करणे, हे सर्वस्वी निंदाजनकच. कारण, फ्रान्समधील कलेच्या आणि संस्कृतीच्या या पुरातन वारशावर तेथील पर्यटन उद्योग विसंबून आहे. म्हणूनच पर्यावरणाचे किंवा शेतकर्‍यांचे प्रश्न खरे असले तरी ते सोडविण्यासाठी कलेची अशी अवहेलना करणे, हे कदापि स्वीकार्ह नाही. पर्यावरण, वन्यजीवांचे, शेतकर्‍यांचे प्रश्न भावनिक नव्हे, तर जितके वास्तववादी आणि तात्त्विक दृष्टिकोनातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, तितकेच यश अधिक. म्हणूनच हे सगळे प्रश्न विचारात घेतले तरी संशोधनाची, तात्त्विक दृष्टीने, अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यावर तोडगा काढण्याऐवजी एखाद्या कलाकृतीवर नाहक रोष व्यक्त करुन निषेध नोंदविणे हे विकृतपणाचेच लक्षण नाही का?
 
जगप्रसिद्ध चित्र असल्याचा फायदा घेऊन केवळ प्रसिद्धीझोतात आंदोलन खेचण्याऐवजी संशोधनात्मक पद्धती वापरून, जनजागृती करून, कृतिशील पाऊले उचलणे आवश्यक आहे. पण, पर्यावरणवादी विचारांच्या व्यक्तीने कलेची अशी अवहेलना करणे, हे असंवेदनशीलपणाचेच लक्षण. पर्यावरणाचे प्रश्न केवळ आणि केवळ संशोधन, अभ्यास, तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच सोडवले जाऊ शकतात. म्हणून पर्यावरणाच्या नावाखाली प्रसिद्धीचा घाट घालणार्‍यांनी केलेले हे निंदनीय कृत्य पाहिले की, संत तुकारामांच्या ओळी अगदी साजेशा ठराव्यात - ‘तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी!’

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई मेट्रो-३

मुंबई मेट्रो-३ 'बीकेसी ते आचार्य अत्रे' मार्गाचे लोकार्पण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने ..

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121