मॅक्रॉन यांनी भारताच्या निमंत्रणाला मान देऊन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, भारत-फ्रान्स यांच्यातील सामरिक भागीदारीला २५ वर्षं पूर्ण होत असताना, ही भेट पार पडली. या भेटीदरम्यान २०४७ सालापर्यंत भारत आणि फ्रान्स संबंध कुठे असावेत, याबाबत एक दृष्टिपत्र तयार करण्यात आले.
स्वतंत्र भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. साडेचार महिन्यांपूर्वी मॅक्रॉन ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने भारतात आले होते. दि. १४ जुलै, २०२३ रोजी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमधील चॅम्प्स एलिसी महामार्गावरील दिमाखदार संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मॅक्रॉन यांनी यंदाच्या भारत भेटीमध्ये आपल्यासोबत ४० जणांचे शिष्टमंडळ आणले. त्यात फ्रान्सचे संरक्षणमंत्री, परराष्ट्र व्यवहारमंत्री तसेच सांस्कृतिक मंत्र्यांचा देखील समावेश होता. याशिवाय फ्रान्समधील आघाडीचे उद्योजकही या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले होते. प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात फ्रान्सच्या लष्कराच्या एका तुकडीने तसेच फ्रेंच हवाई दलाच्या तीन विमानांनी भाग घेतला. भारत-फ्रान्स यांच्यातील सामरिक भागीदारीला २५ वर्षं पूर्ण होत असताना, ही भेट पार पडली. या भेटीदरम्यान २०४७ सालापर्यंत भारत आणि फ्रान्स संबंध कुठे असावेत, याबाबत एक दृष्टिपत्र तयार करण्यात आले.
मॅक्रॉन यांनी भारताच्या निमंत्रणाला मान देऊन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर्षी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी प्रजासत्ताक दिनाला यावे, अशी भारताची इच्छा होती. पण, अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांची रणधुमाळी तसेच अमेरिकेतल्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे निमित्त करून बायडन यांनी हे निमंत्रण नाकारले. कदाचित अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे नरेंद्र मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेला आपण खतपाणी घालू नये, असा विचार त्यामागे असू शकतो. नरेंद्र मोदी आजच्या घडीला जगातील सर्वांत लोकप्रिय नेते असून, जो बायडन अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत अप्रिय अध्यक्षांपैकी एक आहेत. अमेरिकेने नाकारलेले निमंत्रण स्वीकारणे यात फ्रान्ससारख्या देशाला कमीपणा वाटणे स्वाभाविक होते. पण, मॅक्रॉन यांनी ते आनंदाने स्वीकारले.
शीतयुद्धात ज्याप्रमाणे सोव्हिएत रशिया भारताच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला होता, त्याचप्रमाणे गेल्या २५ वर्षांत फ्रान्स भारताचा ऊन-पावसातील मित्र ठरला आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे उत्पादन क्षेत्र, अणुऊर्जा, विमाननिर्मिती, संरक्षण ते कला आणि चित्रपट इ. अनेक क्षेत्रांत फ्रान्सचा दबदबा आहे. रशियापेक्षा फ्रान्सची शस्त्रास्त्रे आधुनिक आणि अधिक विश्वासार्ह असल्याने तसेच संरक्षणाच्या बाबतीत वैविध्य महत्त्वाचे असल्यामुळे भारतासाठीही फ्रान्स महत्त्वाचा आहे. दुसर्या महायुद्धानंतर फ्रान्स अमेरिकेच्या अत्यंत जवळ राहिला असला तरी त्याने शीतयुद्धात अमेरिकेच्या धोरणाची री ओढली नाही. भारताच्या परराष्ट्र धोरणातही स्वायत्तता जपणे महत्त्वाचे असल्याने भारत आणि फ्रान्स यांची मैत्री नैसर्गिक आहे. शीतयुद्ध मध्यावर असताना, भारत, अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांपासून वेगळा पडला असताना फ्रान्सने भारताला हात दिला.
फ्रान्सचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची ही सहावी खेप आहे. आणीबाणीच्या काळात पाश्चिमात्य देशांकडून भारतातील लोकशाहीच्या संकोचावर आक्षेप घेतले गेले असता, फ्रान्सचे पंतप्रधान जॅक शिराक हे १९७६ सालच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याच शिराक यांनी १९९८ मध्ये इंद्रकुमार गुजराल यांचे डळमळीत सरकार असताना फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात येऊन भारताशी असलेले संबंध वाढवून सामरिक भागीदारीच्या स्तरावर नेले. यावर्षी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे पाश्चिमात्य देशांतील उदारमतवादी माध्यमांकडून भारत हिंदूराष्ट्र होण्याकडे वाटचाल करत असल्याची टीका केली जात आहे. सेक्युलॅरिझमचे आदर्श उदाहरण असलेल्या फ्रान्सच्या अध्यक्षांनी प्रजासत्ताक दिनाला येणे, ही या कंपूला सणसणीत चपराक आहे.
फ्रान्सच्या दृष्टीने भारताचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. अमेरिकेत नोव्हेंबर २०२४ मध्ये निवडणुका होत असून, त्यात ‘डोनाल्ड ट्रम्प विरूद्ध जो बायडन’ अशी लढत होईल, असा अंदाज आहे. या लढतीत ट्रम्प यांचे पारडे भारी आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यास युक्रेन युद्धातून अमेरिका माघार घेईल. तसेच, ‘नाटो’मध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणेल, असा अंदाज आहे. असे झाल्यास फ्रान्सला भारताचा मोठा आधार आहे. २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत फ्रान्सच्या व्हिएतनाम, सीरिया, लेबनॉन यांच्यासह पश्चिम आणि उत्तर आफ्रिकेत माली, बुर्किना फासो, मोरक्को, ट्युनिशिया अशा अनेक देशांमध्ये वसाहती होत्या. या सर्व भागांमध्ये फ्रान्सचा आजही प्रभाव असला तरी गेल्या काही महिन्यांमध्ये आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये लष्करी उठाव होऊन तिथे फ्रान्सविरोधी राजवटी आल्या आहेत. या देशांमध्ये चीनचे आव्हान असल्यामुळे तिथे शिरकाव करण्यासाठी भारताला फ्रान्सचा उपयोग होऊ शकेल. फ्रान्ससाठीही हिंद-प्रशांत महासागरीय क्षेत्राचे मोठे महत्त्व असून, तिथे चीनच्या विस्तारवादाला वेसण घालण्यासाठी भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. पश्चिम आशिया पेटून उठला आहे. येमेनमधील इराणचे समर्थन असलेल्या हुती बंडखोरांनी सुएझ कालव्यातून होणार्या वाहतुकीला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. तांबड्या समुद्रातून प्रवास करणार्या जहाजांवर क्षेपणास्त्रे तसेच ड्रोनद्वारे हल्ले करून या भागातील वाहतूक ठप्प करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इस्रायल आणि हमासमधील युद्धामध्ये इस्रायलला विरोध करण्यासाठी आपण त्याच्या मित्रराष्ट्रांच्या जहाजांवर हल्ले करत आहोत, अशी त्यांची भूमिका असली तरी प्रत्यक्षात मात्र या हल्ल्यांचा सर्व देशांना त्रास होत आहे. अमेरिकेने आजवर पश्चिम आशियातील स्थैर्याची जबाबदारी घेतली असली, तरी ती सुएझ कालव्यावर फारशी अवलंबून नाही. युरोपीय देश आखातातून मोठ्या प्रमाणावर खनिज तेल आयात करत असल्याने त्यांना या भागाच्या सुरक्षेसाठी पावले उचलावी लागतील. त्यासाठीही फ्रान्स आणि भारतामधील सहकार्यास मोठा वाव आहे.
आफ्रिकेतून होणार्या अवैध मानवी वाहतुकीमुळे फ्रान्ससह सर्व युरोपीय देश हैराण आहेत. फ्रान्समध्ये मुस्लीम लोकसंख्या सुमारे नऊ टक्के असून त्यात वेगाने वाढ होत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये फ्रान्सला मोठ्या संख्येने दहशतवादी हल्ले आणि दंग्यांना सामोरे जावे लागले. दुसरीकडे फ्रान्सची लोकसंख्या वेगाने वयोवृद्ध होत असून, त्यांना व्यवस्था चालवण्यासाठी बाहेरील लोकांची आवश्यकता आहे. त्यासाठी इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी २०३० पर्यंत भारतातून ३० हजार विद्यार्थी आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी भारतात ठिकठिकाणी फ्रेंच भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
फ्रान्स आणि भारत द्विपक्षीय संबंधांमध्ये संरक्षण, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्राचेही विशेष योगदान आहे. वर्षानुवर्षे भारत लढाऊ विमानांमध्ये अमेरिकेपेक्षा फ्रान्सला प्राधान्य देत आहे. मोदी सरकारने विरोधाला न जुमानता फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने विकत घेण्याचा निर्णय घेतला. फ्रान्सनेही दिलेल्या मुदतीत ही विमानं भारताला सुपुर्द केली. आता भारत नौदलासाठी २६ राफेल घेण्यासाठी इच्छुक असून नौदलासाठी तीन ‘स्कॉर्पेन’ जातीच्या पाणबुड्या भारतात बनवण्यासाठीही करार झाला आहे. याशिवाय संयुक्त प्रयत्नांतून हेलिकॉप्टरसाठी इंजिन बनवण्यासाठीही चर्चा सुरू आहे.
सौरऊर्जेच्या क्षेत्रात भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त प्रयत्नांतून आंतरराष्ट्रीय भागीदारी करण्यात आली असून त्यात १०० हून अधिक देशांचा सहभाग आहे. फ्रान्स अणुऊर्जेच्या बाबतीत आघाडीवर असून त्या क्षेत्रातही आपले तंत्रज्ञान भारताला देण्याची त्याची तयारी आहे. भारताची ‘युपीआय’ व्यवहार प्रणाली स्वीकारण्यास फ्रान्स उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत जयपूरमध्ये रोड शो करताना रस्त्यात थांबून चहा प्यायला. तेथे मोबाईल फोनद्वारे चहाचे पैसे भरताना मॅक्रॉनही थक्क झाले. भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सच्या अध्यक्षांना बोलावून दोन्ही देशांतील संबंध आणखी मजबूत झाले असून, आजवर फ्रान्सने भारतासाठी केलेल्या मदतीचा मान राखला गेला आहे.