गोकूळ जाधव या उच्चशिक्षित तरुणाने पारंपरिक शेतीत संकरित गव्हाचा प्रयोग करत भरघोस उत्पन्न तर मिळवलेच, पण सोबतच इतर शेतकर्यांचे मार्गदर्शनही केले. त्यांची ही यशोगाथा...
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे सेंद्रिय शेती करणारे गोकूळ प्रकाश जाधव. त्यांनी कृषी विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन आपल्या मातीशी नाळ घट्ट ठेवली. शेतातच नव्या उमेदीने, नवसंकल्पनांसह काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. नोकरीवर अवलंबून न राहता, आपल्या शेतात अनेक नवनवीन प्रयोग केले व त्यातूनच महिन्याकाठी एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न ते घेत आहेत. गोकूळ यांचे प्राथमिक शिक्षण भगूर येथे झाले. पुढे दहावीनंतर २००८ साली त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून शेतीविषयक डिप्लोमा केला. पुढे यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. तसेच २०१२ मध्ये अर्थशास्त्रात ‘बीए’चे शिक्षण पूर्ण केले. शेती हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. त्यांचे आई-वडील हे आजही शेती करतात. लहानपणी शाळेतून आल्यावर जमेल ते, झेपेल तसे वडिलांच्या देखरेखीत शेतीची कामे करण्यास गोकूळ यांनी सुरुवात केली. यातूनच बालपणी त्यांना शेतीविषयी विशेष आवड निर्माण झाली आणि त्यातूनच पुढे कृषी शिक्षण घेण्याचे गोकूळ यांनी ठरविले. गोकूळ यांचे बंधू प्रवीण यांनीदेखील कृषी विषयावर उदयपूर येथून ‘पीएचडी’ केली आहे. तसेच त्यांची पत्नी अर्चनादेखील पदवीधर असून त्याही गोकूळ यांना शेतीत मदत करतात.
शिक्षण पूर्ण झाल्यावर शेतीला पंढरी आणि कष्टाला भक्ती समजणार्या शेतकरी आई-वडिलांच्या प्रेरणेने गोकूळ यांचा पिंड शेतीसाठीच घडला असल्याने, आता पूर्णपणे शेतीत उतरायचे त्यांनी ठरवले. प्रारंभी त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने भाजीपाला, ऊस लागवडीला सुरुवात केली. दहा एकरमध्ये टोकन पद्धतीने सोयाबीनची यशस्वी लागवड, सहा वर्षांपासून शेडनेटच्या माध्यमातून ढोबळी मिरची, पॉलिहाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरची अशी प्रयोगशील शेती ते करत करीत आहेत. आजही भाजीपाल्यासंबंधी छोटेमोठे प्रयोग ते करत असतात. इगतपुरी तालुक्यात रब्बी हंगामात शेतकरी ‘लोकवन’, ‘अजय ७२’, ‘अजित १०२’ या गव्हाचे पारंपरिक पीक घेतात. त्यात खर्च अधिक आणि उत्पन्न मात्र अतिशय तुटपुंजे. पारंपरिक गहूचे उत्पन्न १५ क्विंटल इतके मिळते. मात्र, संकरित गव्हाच्या प्रयोगातून एकरी ३० क्विंटल इतके उत्पन्न मिळते. एका महिन्यांत पीक निघणार असून या नवीन प्रयोगातून १० ते १२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे गोकूळ सांगतात. हा संकरित गहू खराब होण्याची भीती नसून साठवणूक करून ठेवू शकतो. शेतकर्यांनी या आधुनिक शेतीला जरुर भेट द्यावी, असे आवाहनदेखील गोकूळ करतात. मात्र, गोकूळ यांनी १५ एकर शेतीत संकरित जातीचा गहू पिकवला आहे. इगतपुरी तालुक्यात त्यांचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग. फार काही वेगळे न करता त्यांच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून संकरित गव्हाची पेरणी पद्धत त्यांनी बदलली. तसेच खत, जलव्यवस्थापन यातही थोडा बदल केला. कृषी अधिकार्यांसोबत चर्चा करून त्यांनी हवामानाचा अंदाज घेतला व त्यानुसार संक्रमित गव्हाचे पीक यशस्वीपणे घेतले. विशेष म्हणजे, पारंपरिक गव्हाच्या खर्चाएवढ्याच खर्चात संक्रमित गव्हाचे जास्त उत्पन्न त्यांनी घेतले. भविष्यात स्वत:च्या १५ एकरवर पिकवलेल्या गव्हाची व्यापार्यांमार्फत विक्री न करता, थेट ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी दरात विकण्याचा मानस आहे.
तसेच गोकूळ हे तालुक्यातील शेतकर्यांना मोफत मार्गदर्शन करतात. त्यात पिकाची लागवड कशी करावी, कमी खर्चात उत्पादन कसे वाढवावे, याविषयी ते शेतकर्यांना आपल्या अनुभवांतून जागरूक करतात. वेळप्रसंगी अडचण आल्यास स्वखर्चाने शेतकर्यांच्या बांधावर भेट देऊन त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शनही करतात. तसेच, त्यांनाही शेतात कुठला नवीन प्रयोग करायचा असल्यास, ते कृषी अधिकारी व इतर प्रगतीशील शेतकर्यांचेही आवर्जून मार्गदर्शन घेतात व चर्चेतून निघालेल्या निकषावर निर्णय घेऊन प्रयोग करत असतात. उच्च शिक्षण घेऊनही आपल्या मातीशी एकरूप असलेल्या या तरुणाने शेतात अनेक नवनवीन उपक्रम केले आहेत. याची दखल कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनाने घेऊन नुकताच ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ही गोकूळ जाधव यांना जाहीर केला आहे. आजची परिस्थिती दुर्दैवाने अशी आहे की, शिकलेले शेतकरी नोकरीकडे धाव घेतात आणि न शिकलेले शेतकरी हे शेतीकडे वळत आहेत. आजची भौगोलिक परिस्थिती आधीपेक्षा खूप बदलली आहे. जमिनीची धूप आणि विभाजन मोठ्या प्रमाणात झाले आहे. तसेच, वातावरणात जमीन-आसमानचा फरक पडला आहे. त्यामुळे आज जो शेतकरी योग्य शिक्षण घेऊन शेतीकडे वळेल, तोच शेतकरी येणार्या काळात टिकणार आहे. दुर्दैवाने तरुण शेतकरी आज फारसा शिकलेला दिसत नाही. जो कोणी भविष्यात शेतीकडे वळू इच्छितो, त्याने शिक्षित होऊनच शेतीकडे वळावे, असे गोकूळ सांगतात. पारंपरिक शेती ही कधीच दुरापास्त झाली असून, असमानी आणि सुलतानी संकटांनी प्रयोगशील शेती उदयास आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस होणार्या बदलांना लक्षात घेऊन शेतकर्यांनी स्वत:च्या कार्यशैलीत बदल करणे आवश्यक आहे, अन्यथा शेती ही नेहमीसारखी तोट्याची ठरल्याशिवाय राहणार नाही. तरुणांनी शिक्षित होऊनच शेतीकडे वळावे, असे ते आवर्जून सांगतात. अनेक परिस्थितीशी व अडचणींशी सामना करीत एका खेडेगावातील पदवीधर तरुण यशस्वी शेतकरी होऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. गोकूळ जाधव यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
गौरव परदेशी