मुंबई : बहुचर्चित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप यांची ईडीने चौकशी केली. कोरोना महामारीच्या काळात खिचडी वितरणात गुंतलेल्या एका फर्मकडून संदीप राऊत यांना पैसे मिळाल्याचा आरोप आहे.
यापूर्वी या प्रकरणी ईडीने उबाठा गटाचे सचिव तथा आदित्य ठाकरेंचे सहकारी सूरज चव्हाण यांना अटक केली. याच प्रकरणात संदीप राऊत यांचीही चौकशी केली जात आहे. स्नेहा केटरर्स आणि डेकोरेटर्ससह अन्य कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहारांची तपासणी ईडीकडून केली जात आहे. या कंपन्यांवर खिचडी घोटाळ्याची रक्कम वळवल्याचा आरोप आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस (एफओएमएस) या सुरक्षा फर्मने सुनील कदम उर्फ बाला याच्या मदतीने पालिकेचे कंत्राट मिळवले होते. कदम या कामासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंट आणि संजय माळी यांच्या स्नेहा केटरर्स आणि डेकोरेटर्सना खिचडीची पाकिटे पुरवतील, असे ठरले होते. पालिकेने फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला ८.६४ कोटी रुपये दिले होते, असे सुरज चव्हाण यांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात म्हटले आहे.
सह्याद्री रिफ्रेशमेंटने पालिकेकडून मिळालेल्या पैशांचा काही भाग संजय राऊत यांच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांचा भाऊ संदीप यांच्या खात्यात वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. खिचडी पुरवठादारांनी मान्यतेपेक्षा कमी प्रमाणात पुरवठा करून आणि वाढीव बिले सादर करीत पालिकेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.