नवी दिल्ली : ज्ञानवापी संकुलातील कथित वजुखान्यात असलेल्या शिवलिंगाचे पुरातत्त्व सर्वेक्षण करण्यात यावे, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याची माहिती हिंदू पक्षाचे वकील विष्णूशंकर जैन यांनी दिली आहे.
ज्ञानवापी संकुलाच्या करण्यात आलेल्या एएसआय सर्वेक्षणामध्ये सध्याच्या कथित मशिदीच्या ढाच्यापूर्वी तेथे भव्य मंदिर अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणामध्ये कथित वजुखाना आणि त्यामध्ये सापडलेल्या शिवलिंगाचा समावेश नव्हता. हे शिवलिंग म्हणजे पाण्याचे कारंजे असल्याचा दावा मुस्लिम पक्षातर्फे करण्यात येत आहे. मात्र, ते शिवलिंग असून त्याचेही एएसआय सर्वेक्षण करण्यात यावे असा अर्ज हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.
हिंदू पक्षाने आपल्या अर्जात दावा केला आहे की, कथित शिवलिंगाभोवती आधुनिक बांधकाम जाणूनबुजून केले गेले आहे जेणेकरुन पीठ, पीठिका इत्यादी शिवलिंगाची वैशिष्ट्ये लपवता येतील. शिवलिंगाचा मूळ स्त्रोत शोधण्यासाठी एएसआय सर्वेक्षण आवश्यक असल्याचे अर्जात म्हटले आहे. शिवलिंग, त्याच्या सभोवतालचा परिसर, भिंती आणि संपूर्ण प्रतिबंधीत क्षेत्राचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची विनंती करण्यात आली आहे.