
(Fatwa issued against Imam Ilyasi)
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी निमंत्रितांमध्ये संतगणांसह इतर धर्माचे धर्मगुरुही उपस्थित होते. मात्र ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन (एआयआयओ) चे मुख्य इमाम डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांच्या विरोधात फतवा जारी करण्यात आल्याचे समोर येत आहे. तसेच भारतातील इतर मौलवींनाही इमाम इलियासी यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आवाहन फतव्याद्वारे केले आहे. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहिल्याने इमाम इलियासी यांच्याविरोधात अनेक स्तरातून टीका होत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना इमाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एकतेच्या संदेशा'बद्दल त्यांचे कौतुक केले होते. त्याचबरोबर मानवता हाच आपला सर्वात मोठा धर्म असून आमल्यासाठी राष्ट्र पहिले असल्याचेही ते म्हणाले होते. परंतु आता आपलाच समाज आपल्या विरोधात जाईल असे कधी वाटले नव्हते; अशी खंत इमाम इलियासी यांनी व्यक्त केली आहे.