पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात नेहमीच गरीब आणि वंचितांची काळजी असते, म्हणूनच त्यांच्या कार्यकाळात गरीब आणि मागासलेल्यांचे मसिहा, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याची बहुप्रतिक्षित मागणीही पूर्ण झाली.
बिहारच्या भूमीने देशाला अनेक महापुरुष, अनेक व्यक्तिमत्त्वे दिली; ज्यांचे जीवन आदर्श, प्रेरणादायी आणि सदैव स्मरणात राहील. कर्पूरी ठाकूर हे त्यापैकीच एक. बिहारचे सुपुत्र ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांना देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर करून, भारत सरकारने केवळ बिहार आणि मागासलेल्या समाजालाच नव्हे, तर समान आणि समरसतापूर्ण समाजाच्या उभारणीसाठी स्वतःलासमर्पित करणार्या लोकांचाही सन्मान केला आहे. देशातील सर्व व्यक्तिमत्त्व, सेलिब्रिटी आणि महापुरुषांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांनाही ‘भारतरत्न’ देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. मात्र, गरीब आणि मागासवर्गीयांचे सुपुत्र नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर गरिबांचा मसिहा ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाला, हे सर्वस्वी कौतुकास्पदच!
‘जननायक’ कर्पूरी ठाकूर हे नेहमीच ‘भारतरत्न’चे पात्र होते, पण यापूर्वी ज्यांनी ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली; त्यांना सत्तेत येताच या मागणीचा विसर पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात नेहमीच गरीब आणि वंचितांची काळजी असते, म्हणूनच त्यांच्या कार्यकाळात गरीब आणि मागासलेल्यांचा मसिहा असलेले कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ देण्याची बहुप्रतिक्षित मागणीही पूर्ण झाली, असे म्हणता येईल.
लोकनायक कर्पूरी ठाकूर हे नेहमीच ‘भारतरत्न’ या देशातील सर्वोच्च पुरस्कारासाठी पात्र का होते, हे त्यांच्या जीवनातील संघर्ष, आदर्श आणि तत्त्वनिष्ठा यावर नजर टाकली असता स्पष्टपणे दिसून येते. ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर हे इतके साधे आणि वास्तववादी होते की, ते मुख्यमंत्री असताना एकदा फाटलेला कुर्ता घालून एका कार्यक्रमाला गेले होते. एकदा परदेश दौर्यावर जाण्यासाठी त्यांनी मित्राकडून एक कोट घेतला, तोही फाटला. असे हे कर्पूरी ठाकूर दिसण्यापेक्षा वास्तवावर जास्त विश्वास ठेवणारे नेते होते. ते मुख्यमंत्री असताना त्यांना हवे असते, तर त्यांना स्वत:साठी एक अप्रतिम कुर्ता अगदी सहज शिवून घेता आला असता. मात्र, क्षणिक दिसण्यावर त्यांचा कदापि विश्वास नव्हता. ते मनापासून मानत होते की, आपल्या लोकांकडे अंग झाकण्यासाठी योग्य कपडे नसताना मला उंची कपडे घालणे शोभत नाही. साधेपणा हा त्यांचा गुण होता आणि तो दाखविण्यामध्ये त्यांचा कोणताही अभिनिवेशही नव्हता. राजकीय जीवनातील असा प्रामाणिकपणा, सत्य आणि आदर्शानेच त्यांना सर्वार्थाने ‘जननायक’ बनवले.
राजकारणाचा उद्देश हा शोषित, वंचित आणि मागासलेल्या लोकांना बळकट करणे हा आहे, असा अतिशय महत्त्वाचा संदेश ठाकूर यांनी देशास दिला. समाजाच्या अखेरच्या फळीत राहणार्या लोकांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे आणि ही उद्दिष्टे केल्यानेही पूर्ण होऊ शकतात, हे त्यांनी शिकवले. तत्वनिष्ठ राजकारण करता येते, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला.
कर्पूरी ठाकूर यांचा ज्या काळात जन्म झाला आणि त्यांचे राजकीय जीवन जगले, तो काळ अत्यंत अडचणींचा होता. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आठवला की, कर्पूरी ठाकूर कसे लोकनेते झाले आणि आज संपूर्ण देश त्यांच्यापुढे कसा नतमस्तक झाला आहे, हे दिसून येते.
त्यांच्या आयुष्यातील मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची घटना ही विशेष ठरते. ठाकूर यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी ही मोठी गोष्ट होती. आपल्या मुलाच्या यशाने त्यांचे वडील खूप आनंदी झाले आणि त्यांनी कर्पूरी ठाकूरांना गावातील मोठ्या जमीनदाराकडे नेले. त्यांनी आनंदाने जमीनदाराला सांगितले की, त्यांचा मुलगा मॅट्रिक पास झाला आहे. त्यावर जमीनदार म्हणाला की, “तो मॅट्रिक पास झालाय हे ठीक आहे; पण आता त्याने माझे पाय दाबावे.” या घटनेने कर्पूरी ठाकूर यांना धक्का बसला, पण त्यानंतर त्यांना आयुष्यात कठोर निर्णय घेण्याची सवय लागली आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
कर्पूरी ठाकूर यांनी मोठ्या कष्टाने आपला अभ्यास पूर्ण केला आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यामुळे गरीब, दुर्बल आणि मागासवर्गीयांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे, हे त्यांचे नेहमीच प्राधान्य होते. ते दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री होते आणि या काळात त्यांनी सर्वसामान्यांना शिक्षण देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. राज्यात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे ते देशातील पहिले मुख्यमंत्री होते. गरिबांना शिक्षणाचा पूर्ण लाभ मिळावा, यासाठी त्यांनी इंग्रजीची अटही रद्द केली. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली, पण ते डगमगले नाहीत. त्यांच्या प्रयत्नांमुळे मिशनरी शाळांमध्ये हिंदीतून शिक्षण सुरू झाले आणि गरीब मुलांच्या शाळेची फीही माफ झाली.
‘जननायक’ कर्पूरी ठाकूर हे प्रदीर्घ काळ देशाच्या राजकारणात त्रस्त असलेल्या घराणेशाहीच्या विरोधात होते आणि म्हणूनच त्यांचे राजकारण नेहमीच काँग्रेस आणि इंदिरा गांधींच्या विरोधात राहिलेले दिसते. जोपर्यंत ते हयात होते, तोपर्यंत त्यांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने राजकारणात प्रवेश केला नाही किंवा त्यांनी त्यांच्या कुटुंबाला एवढ्या मोठ्या पदावर राहून कोणताही लाभ दिला नाही. मुख्यमंत्री असताना कर्पूरी ठाकूर यांनी अनेकदा आपल्या मुलांना पत्र लिहून “कोणाच्याही प्रभावात पडू नका. लोक तुम्हाला लोभ दाखवतील, आमिष दाखवतील. मात्र, त्यामुळे आपलीच बदनामी होईल याचे नेहमी भान ठेवा,” असा सल्लाही दिला होता.
कर्पूरीजींना त्यांच्या पदाच्या सामर्थ्याची पूर्ण जाणीव होती. बिहारचे मुख्यमंत्री असताना ते आपल्या कुटुंबाला गरिबीतून पूर्णपणे मुक्त करू शकले असते, परंतु त्यांनी आपल्या कुटुंबाऐवजी राज्यातील सर्व गरीब जनतेची गरिबी दूर करण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी काम केले. म्हणूनच कर्पूरीजींची राजकीय कारकिर्द संपली.तेव्हा त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीत एक इंचही वाढ झाली नाही किंवा नवीन घरे बांधली गेली नाहीत.
सामाजिक न्याय आणि समान हक्क त्यांच्या राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी होते. संपूर्ण समाज पुढे गेला पाहिजे, हे त्यांचे लक्ष्य होते. प्रत्येक शोषित, वंचित आणि मागासलेल्या व्यक्तीला त्याचे हक्क मिळाले पाहिजेत, असेच त्यांचे राजकारण होते. त्यांनी कधीही कुटुंब आणि समाज यांच्यात भेद केला नाही. केवळ त्याच्या कुटुंबालाच नव्हे, तर प्रत्येकाला लाभ मिळावा हा त्यांचा उद्देश होता.
या संदर्भात आणखी एक मनोरंजक घटना आहे. कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री असताना त्यांचे मेहुणे त्यांना भेटायला आले आणि त्यांनी त्यांना नोकरीसाठी शिफारस करण्याची विनंती केली. पण, कर्पूरीजींनी आपल्या मेव्हण्याला स्पष्टपणे सांगितले की, त्यांना जे करायचे आहे ते करा. त्यांनी खिशातून 50 रुपयांची नोट काढली आणि आपल्या मेव्हण्याकडे दिली आणि म्हणाले, “जा वस्तरा वगैरे विकत घे आणि तुझा वडिलोपार्जित व्यवसाय कर.” कर्पूरी ठाकूर यांच्याशी संबंधित प्रामाणिकपणा आणि सत्यतेच्या अशा अनेक घटना आहेत, ज्या आज उच्च पदावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आजही तितक्याच प्रेरणादायी आहेत.
आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ आणि सबका विकास’ची घोषणा देतात, तेव्हा, कोठेतरी ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांचा संकल्प प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे. समाजातील शेवटच्या घटकाला 100 टक्के लाभ देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेत दिसून येते. तेव्हा, ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांनी दाखवलेल्या मार्गावर देश पुढे जात असल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल.
बिहारच्या एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांनी अतिशय बिकट परिस्थितीत शिक्षण घेतले आणि नंतर राजकारणात प्रवेश केला आणि उच्च स्थान मिळवले. परंतु, सर्व काही मिळवूनही त्यांनी स्वत:साठी काहीही ठेवले नाही. अशा या नेत्याची गणना भारतीय राजकारणाच्या सर्वोच्च आदर्शांमध्ये केली जाईल. बिहारचे लाल ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर हे संपूर्ण देशाचे अभिमान आणि राजकारणातील एक आदर्श पुरुष आहेत. ‘भारतरत्न’ ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांचे जीवन देशाच्या राजकारणाला नेहमीच दिशा देईल.
सय्यद शाहनवाज हुसेन
(लेखक भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत.)
(अनुवाद : पार्थ कपोले)