लॅण्ड जिहाद करणाऱ्यांसाठी महाराष्ट्रात 'बुलडोझर देवा' पॅटर्न : नितेश राणे
24-Jan-2024
Total Views | 59
मुंबई : योगीजींनी ज्याप्रमाणे बुलडोझर पॅटर्न आणलं तसाच आता महाराष्ट्रात 'बुलडोझर देवा' नावाचा पॅटर्न सुरु झालेला आहे, अशी माहिती भाजप आमदार नितेश राणेंनी दिली आहे. रविवारी रात्री मीरा रोडच्या नया नगर परिसरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यास सुरुवात झाली.
नितेश राणे म्हणाले की, "नया नगरमध्ये झालेल्या बुलडोझरच्या कारवाईमुळे महाराष्ट्रातही बुलडोझर पॅटर्न येऊ शकतं, असा विश्वास हिंदु समाजात आला आहे. यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मनापासून आभार मानतो. ज्याप्रमाणे योगीजींनी बुलडोझर पॅटर्न आणलं तसाच आता महाराष्ट्रात 'बुलडोझर देवा' नावाचा पॅटर्न सुरु झालेला आहे. जिथे जिथे हे जिहादी लॅण्ड जिहादच्या नावाने अतिक्रमण करतील तिथे तिथे बुलडोझर देवा चालताना दिसेल," असे ते म्हणाले.
रावणमुक्त महाराष्ट्र करण्याची वेळ आली आहे!
श्रीराम हे भाजपमुक्त करावे लागतील, असे वक्तव्य मंगळवारी उद्धव ठाकरेंनी केले होते. यावरून नितेश राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "श्रीराममुक्त भाजप हे कोण बोलतंय जो दहा तोंडी रावणासारखा आहे. दहा तोंडी रावणमुक्त महाराष्ट्र करण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्रातील जनता २०२४ ला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनाही त्यांची लायकी दाखवण्याचं काम करेल, असा माझा विश्वास आहे," असेही ते म्हणाले.
रोहित पवारांच्या ईडी चौकशीबद्दल बोलताना ते म्हणाले की, "महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबई पोलिसांना घरगडी सारखं वापरण्याचे असंख्य प्रकार केले. महाविकास आघाडीच्या काळात मुंबई पोलिसांच्या कारवाया फक्त भाजपच्याच नेत्यांवर का व्हायच्या? तेव्हा मविआचे लोक कुठलेही गुन्हे करायचे नाहीत का? तेव्हा आम्ही शेंबड्यासारखे रडलो नाही. या सगळ्याला सामोरं गेलो. रोहित पवारांनी काही केलंच नसेल तर त्यांना घाबरण्याची गरज नाही. युवा संघर्ष यात्रेला कुणी मोजलं नाही म्हणून स्वत:हून लाठीचार्ज करण्याची गरज भासली. जितेंद्र आव्हाडच रोहित पवारांची लायकी काढतात," असा टोलाही त्यांनी लगावला.