कोणत्याही परिस्थितीत पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातच होणार : रविंद्र चव्हाण
02-Jan-2024
Total Views | 57
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे, असा निर्णय मंगळवारी घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. या पार्श्वभुमीवर मंगळवारी मंत्रालयात बैठक पार पडली असून नियोजनानुसार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पाची सद्यस्थिती व वस्तुस्थिती जाणून घेत या प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पाणबुडी पर्यटन विकासासाठी मंजूर निधीपैकी काही निधी हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे का(एमटीडीसीकडे) वर्ग करण्यात आला आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही व सदर प्रकल्प सकारात्मक पूर्ण होण्याच्या दृष्टीने विभागाने तातडीने प्रयत्न करावेत असे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.
या बैठकीला पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी- शर्मा यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे हे व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते.