शेजारच्या बांगलादेशमध्ये रविवार, दि. ७ जानेवारी रोजी होणार्या संसदेच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान शेख हसिना यांच्या अवामी लीगचा विजय ही केवळ औपचारिकताच. बांगलादेशमधील २९ पक्ष निवडणुकांच्या रिंगणात असले तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने या निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे. त्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलनांच्या माध्यमातून लढा देण्याचा निर्धार केला आहे.
बांगलादेशच्या संसदेत ३५० जागा असतात. त्यातील ५० महिलांसाठी राखीव असतात आणि विजयी झालेल्या पक्षांना जिंकलेल्या जागांच्या प्रमाणात त्या वाटून दिल्या जातात. उरलेल्या ३०० जागांसाठी निवडणुका होतात. १९७१ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बांगलादेशचे राजकारण वंगबंधू शेख मुजीबुर रेहमान यांची अवामी लीग आणि माजी अध्यक्ष-लष्कर प्रमुख झियाउर रेहमान यांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बीएनपी) या दोन पक्षांभोवती फिरते. विशेष म्हणजे, आज या दोन्ही पक्षांचे नेतृत्त्व पंतप्रधान शेख हसिना आणि बेगम खलिदा झिया या महिलांकडे आहे. अवामी लीग उदारमतवादी असून ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ इस्लामिक मूलतत्त्ववादी आहे.
वंगबंधु शेख मुजीबुर रेहमान यांची कन्या असलेल्या शेख हसिना चार वेळा पंतप्रधान राहिल्या असून गेली १५ वर्षं त्या सत्तेत आहेत. सर्वाधिक काळ सत्तेवर असलेल्या महिला नेत्या म्हणून त्यांचा लौकिक. शेख हसिना ७६ वर्षांच्या असून त्यांच्या नेतृत्त्वामध्ये बांगलादेशने वेगाने आर्थिक विकास साधला. गरिबी रेषेखालील लोकांचे प्रमाण ४० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आणले. त्यांच्यावर विरोधी पक्ष तसेच आपल्या सरकार विरोधात भूमिका घेणार्यांवर दडपशाही केल्याचाही आरोप केला जातो.
बांगलादेशमधील लोकशाहीचे निमित्त करून अमेरिका आणि युरोपीय देशांनी बांगलादेशच्या राजकारणात ढवळाढवळ करायला सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँथोनी ब्लिंकन यांनी सूचित केले की, “बांगलादेशच्या लोकशाही व्यवस्थेला धक्का पोहोचवणार्या लोकांना अमेरिका व्हिसा देणार नाही, तसेच त्यांची संपत्तीही गोठवण्यात येईल.” अमेरिकेचे राजदूत पीटर हास बांगलादेशच्या निवडणूक आयुक्तांना भेटून त्यांना मुक्त वातावरणात निवडणुका घ्यायला सांगितले. त्यामुळे बेगम खलिदा झियांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शेख हसिनांनी राजीनामा देऊन निवडणुकांपूर्वी काळजीवाहू सरकार नेमावे, ही पाश्चिमात्य देशांची मागणी मान्य करण्यात आली नाही. या निवडणुकीत निरीक्षक पाठवण्याची संधी देण्यात आली.
चीनने दक्षिण आशियात आपले जाळे विणले असून भारताच्या शेजारी देशांना गळाला लावले आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि मालदीव चीनच्या प्रभावाखाली असून, भूतानने भारताला दूर करून सीमाप्रश्नावर थेट चीनशी चर्चा करण्याचा दबाव त्यांच्यावर आहे. या सगळ्यात एकटा बांगलादेश अपवाद आहे. बांगलादेशनेही आपल्या बाजूने कळावे, यासाठी चीन प्रयत्नशील आहे. पण, शेख हसिनांना परिस्थितीची जाणीव आहे. भारताने बांगलादेशला तीन बाजूंनी वेढले असून एका बाजूला बंगालचा उपसागर आहे. भारतातून बांगलादेशमध्ये ५४ नद्या वाहतात. भारताने सहकार्य न केल्यास पावसाळ्यात या नद्या बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण करू शकतात.
बांगलादेश निर्मितीत भारताच्या योगदानामुळे शेख हसिना यांचा कल कायमच भारताच्या बाजूने राहिला. १९९६ साली शेख हसिना पंतप्रधान झाल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध सुधारू लागले. २००१ साली बेगम खलिदा झिया पंतप्रधान झाल्यावर मात्र बांगलादेश पाकिस्तान आणि चीनजवळ सरकू लागला. या कालावधीत बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होऊ लागल्याने काही काळासाठी लष्कराने सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. २००८ सालच्या अखेरीस झालेल्या निवडणुकांमध्ये शेख हसिनांच्या नेतृत्त्वाखाली अवामी लीगला मोठा विजय मिळाला. २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर भारत आणि बांगलादेशमधील संबंधांना बहर आला. भारताने सवलतीच्या दरात कर्जपुरवठ्याच्या तीन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विकास प्रकल्पांसाठी तब्बल आठ अब्ज डॉलर दिले आहेत.
भारत आणि बांगलादेश यांना जोडणार्या पाच रेल्वेसेवा सध्या कार्यरत आहेत. ‘कोविड-१९’च्या काळात, गाड्यांची वाहतूक प्रभावित झाली असता, या रेल्वे मार्गांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. भारत आणि बांगलादेशमध्ये पाईपलाइनद्वारे दहा लाख टन डिझेल पुरवठ्याचे काम सुरू झाले असून, त्यामुळे बांगलादेशमध्ये ऊर्जा सुरक्षा प्राप्त होणार आहे. भारत बांगलादेशला एक हजार मेगावॅट वीज पुरवठा करीत असून, भारतीय कंपन्यांनी बांगलादेशमध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प उभारले आहेत. बांगलादेशमधील विद्यार्थ्यांना भारतात मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी येण्याची संधी मिळते. दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांमध्ये उत्तम सहकार्य असल्याने भारताला ईशान्य भारतातील दहशतवाद मोडून काढणे शक्य झाले. त्यामुळेच ‘जी २०’ परिषदेला भारताने शेख हसिनांना निमंत्रण दिले होते.
शेख हसिनांनी आपल्या राजनयिक कौशल्याचा वापर करत चीनलाही आपल्या बाजूने वळवले. पारंपरिकदृष्ट्या चीन पाकिस्तानच्या बाजूने असला आणि पाकिस्तानचा कल बेगम खलिदा झियांकडे असला, तरी बांगलादेशात चीनला पायाभूत सुविधा प्रकल्प निर्मितीच्या दृष्टीने मर्यादित संधी आहेत. अमेरिका बेगम खलिदा झियांच्या माध्यमातून बांगलादेशच्या राजकारणात ढवळाढवळ करत असल्याचे ओळखून चीनने शेख हसिनांना पाठिंबा दिला. रशियापासून बांगलादेश हजारो किमी अंतरावर आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धात गुंतला असल्याने बांगलादेशच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करण्याची ताकद त्यांच्याकडे नाही. तरीही रशियाने शेख हसिनांच्या बाजूने भूमिका घेतल्याने अमेरिकेचा नाईलाज झाला.
अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षात मुस्लीम लॉबी ताकदवान आहे. त्यांच्यावर तुर्की, मलेशिया, पाकिस्तान आणि कतारसारख्या देशांचा लक्षणीय प्रभाव आहे. एकीकडे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध वाढवत असताना भारताने डोईजड होऊ नये, यासाठीही अमेरिका प्रयत्नशील आहे. अमेरिका आपल्या मित्रदेशांसोबत असेच धोरण राबवतो आणि त्यांना कायम आपल्यावर अवलंबून ठेवतो. सध्या चालू असलेल्या इस्रायल आणि ‘हमास’ युद्धामध्ये जो बायडन यांनी स्पष्टपणे इस्रायलची बाजू घेतल्यामुळे त्यांच्या उदारमतवादी तसेच मुस्लीम मतदारांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यांना खूश करण्यासाठी बांगलादेशमधील मुस्लीम मूलतत्ववादी गटांना चुचकारण्याचे काम अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने केले असले तरी परिस्थिती बघून त्यांनी नमते घेतले.
शेख हसिना यांच्या कार्यकाळात बांगलादेशातील लोकशाहीची गळचेपी झाली, यात कोणालाही शंका नाही. पण, बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर तिथे कायमच राजकीय अस्थिरता राहिली आहे. तेथील दोन्ही पक्ष निवडणुकीतील हिंसाचारासाठी तितकेच कुप्रसिद्ध. बांगलादेशच्या लष्करातील काही सैनिकांनी अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांची त्यांच्या परिवारातील ३५ सदस्यांसह दि. १५ ऑगस्ट, १९७५ रोजी हत्या केली होती. त्यांच्या कन्या शेख हसिना तेव्हा परदेशात असल्यामुळे या हल्ल्यातून वाचल्या. १९७७ साली अध्यक्ष झालेले माजी लष्करप्रमुख झियाउर रहमान यांची १९८१ साली सैनिकांनी हत्या केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी बेगम खलिदा झिया यांनी त्यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे नेतृत्त्व करत आहेत.
दोन्ही पक्षांनी सत्तेवर असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. शेख हसिना सरकारने मुस्लीम मूलतत्त्ववादी गटांना डोके वर काढू न दिल्यामुळे बांगलादेशला राजकीय स्थैर्य प्राप्त झाले असून वेगाने आर्थिक प्रगती झाली. त्यांनी पाकिस्तान आणि चीनपासून अंतर राखले असून, भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. त्यांचे सरकार यावे, यासाठी भारताने पडद्यामागून भूमिका बजावली असल्यास आश्चर्य वाटता कामा नये. त्यांच्या विजयामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध आणखी सुदृढ होणार आहेत, हे निश्चित.