मुंबई : “तरुणांनो, मी तुम्हाला सांगत आहे, आम्ही आमची मशिद गमावली आहे आणि तिथे काय केले जात आहे ते तुम्ही पाहत आहात. तरुणांनो, तुमच्या अंतःकरणात वेदना नाही का? ज्या ठिकाणी आपण बसून ५०० वर्षे कुराण-ए-करीमचे पठण केले ते आज आपल्या हातात नाही. तरुणांनो, तुम्हाला दिसत नाही का आणखी तीन-चार मशिदींबाबत षडयंत्र सुरू आहे, ज्यामध्ये दिल्लीची मशीदही सामील आहे." असे वक्तव्य एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काही दिवस शिल्लक राहिले असताना त्यांचे हे विधान हिंदू-मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करणारे आहे, अशी टीका केली जात आहे. त्यांनी आपल्या या वक्तव्यात मुस्लीम तरुणांना मशिदीच्या रक्षणासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या वक्तव्यात कुठेही राम मंदिर आणि बाबरीच्या ढाच्याचा उल्लेख केला नसला तरी, त्यांच्या वक्तव्यावरुन त्यांना बाबरीविषयीच सांगायचे होते, हे दिसून येते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना ते म्हणाले की, “अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आज आम्ही आमचे स्थान प्राप्त केले आहे. या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही तुमचा पाठिंबा आणि तुमची ताकद कायम ठेवा. तुमच्या मशिदी लोकवस्तीत ठेवा. असे होऊ शकते की या मशिदी आपल्याकडून काढून घेतल्या जातील. इंशाअल्लाह… आजचा हा तरुण, जो उद्याचा म्हातारा होणार आहे डोळ्यासमोर ठेवून मन एकाग्र करेल आणि स्वतःला, कुटुंबाला, शहराला, परिसराला कसे वाचवायचे याचा विचार करेल. "एकता ही शक्ती आहे, एकता ही वरदान आहे."