उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वराज्य भूमीचे लोकार्पण
गिरगाव चौपाटीवर नागरिकांना अनुभवता येणार महापुरुषांच्या जीवनावर आधारित लाईट अँड साउंड शो
19-Jan-2024
Total Views | 33
मुंबई: कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मुंबई येथील गिरगाव चौपाटीवर महापुरुषांच्या जीवनावर आधारित लाईट अँड साउंड शो सुरू होणार आहे. या शिवाय गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक उद्यानात ग्लो-गार्डन तयार करण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या लाईट अँड साउंड शो आणि ग्लो गार्डनचे आज लोकार्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक उद्यान आणि सभोवतालच्या परिसराला ‘ ‘स्वराज्य भूमी’ असे नाव देण्यात आले. या लाईट अँड साउंड शो च्या माध्यमातून भारतातील महापुरुषांची गाथा उलगडली जाणार आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने या लाइट अँड साउंड शो च्या माध्यमातून प्रभू श्रीरामांचा जीवनप्रवास सर्वांना अनुभवता येईल.
प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले “ स्वराज्यभूमी हा विषय नेहमीच उचलून धरल्याबद्दल आणि त्या अनुषंगाने हा लाईट अँड साउंड शो सुरु केल्या बद्दल मी मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन करतो. आज संपूर्ण भारतात राममय वातावरण झालेलं आहे, या लाईट अँड साउंड शो च्या माध्यमातून प्रभू श्री रामाचे जीवन आपल्याला उलगडून दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक महापुरुषांचे जीवन आपल्याला येथे बघायला मिळणार आहे. हा अतिशय चांगला उपक्रम सुरु केल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो.
कार्यक्रमास मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रसाद लाड, विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची संकल्पना मांडलेल्या कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कार्यक्रमाचे अध्यक्ष पद होते.