या लेखाच्या कालच्या पहिल्या भागात मांडलेली बाबरीच्या पतनापूर्वी आणि पश्चात हिंदू मंदिरांसह मालमत्तांच्या नरसंहाराची दाहक आकडेवारी सर्वस्वी मन विषण्ण करणारी अशीच. आजच्या दुसर्या भागात बाबरी पतनानंतर हिंदूंवर झालेले जीवघेणे हल्ले आणि या एकूणच घटनाक्रमात इस्लामी ताकदींनी माध्यमांचा नॅरेटिव्ह सेटिंगसाठी केलेला यथायोग्य वापर, याचा केलेला हा पदार्फाश...
अयोध्यामधील १९९०च्या कारसेवेच्या काळात बांगलादेशात झालेल्या हिंसाचाराबद्दल दि. ३१ ऑक्टोबर १९९०चा ’असोसिएटेड प्रेस’चा अहवाल काय सांगतो, तो पाहूया.
बांगलादेशात मुस्लिमांचा हिंदू मंदिरांवर हल्ला
चित्तगाव, बांगलादेश (एपी म्हणजे असोसिएटेड प्रेस) भारतातील दंगलींच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांच्या टोळ्यांनी ज्यांच्यापैकी अनेक चाकू आणि सोट्यांनी सशस्त्र होते, हिंदू मंदिरांवर हल्ला केला, मूर्त्या फोडल्या आणि शेकडो घरांना आग लावली, असे साक्षीदारांनी आज सांगितले. भारतातील कट्टरपंथी हिंदूंनी पवित्र शहर अयोध्येत एक मशीद ताब्यात घेण्याचा (तिच्या जागी मंदिर बनविण्यासाठी) प्रयत्न केल्याची बातमी ऐकताच, संतप्त जमाव मंगळवार, दि. ३० ऑक्टोबर १९९० रोजी रात्री उशिरा रस्त्यावर उतरला. या विवादामुळे उसळलेल्या हिंसाचारात भारतात दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
सुमारे १०० जणांच्या जमावाने आज पहाटेच्या वेळी लावण्यात आलेल्या कर्फ्यूचे उल्लंघन केले आणि एका हिंदू धर्मस्थळावर हल्ला केला. अधिकारी आणि साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारपासून किमान ११ मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे.
सर्वात भयंकर हिंसाचार चित्तगावच्या सर्वात मोठ्या मंदिरात कैबल्यधाम येथे भडकला. साक्षीदारांनी सांगितले की, मध्यरात्री मंदिराच्या सभोवतालच्या असलेल्या निवासी जिल्ह्यात घरांवर चाकू व लोखंडी रॉड असलेल्या दोन हजार जणांच्या जमावाने हल्ला केला व या हल्ल्यात किमान ३०० घरे जाळण्यात आली.
अग्निशमन दलाला या भागात जाण्यापासून रोखणार्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. मंदिराच्या वरच्या टेकडीवर छावणी लावून बसलेल्या ५०० विस्थापितांपैकी एक सुशील घोष म्हणाले की, “चार माणसे बेपत्ता आहेत.”
रियाझुद्दीन बाजार आणि चित्तगाव वैद्यकीय महाविद्यालयामध्येही २०० हून अधिक लोकांच्या जमावाने मंदिरात तोडफोड करण्याचा आणि हिंदूंच्या मालकीच्या दुकानांना जाळण्याचा प्रयत्न केला, तेव्हादेखील पोलिसांनी गोळीबार केला. एका गटाने खालच्या जातीच्या हिंदूंची, जे मुख्यतः मच्छीमार होते, वस्ती असलेल्या ठिकाणी सुमारे ५० मातीची घरे नष्ट केली. आणखीन एका गटाने एका हिंदूच्या मालकीच्या गॅरेजवर हल्ला केला आणि पाच वाहनांचे नुकसान केले.पोलीस म्हणाले की, चौकबाजार जिल्ह्यातील सुमारे १ हजार, ५०० हिंदू मच्छीमार रात्रीच्या हल्ल्यात घर सोडून पळून गेले; परंतु परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर सकाळी घरी परत आले.
जर हिंदूंवर झालेल्या या हल्ल्यांचा उल्लेख मीडियाने वारंवार केला असता (उदा. पाकिस्तानात बाबरीनंतर २४ लोकांचा मृत्यू, अधिकांश हिंदू), बाबरीच्या आधी आणि नंतरच्या पाच हजार मंदिरांचा नाश, हजारो हिंदूंच्या घरांचा नाश, २०० कोटी टाक्यांच्या हिंदूंच्या मालमत्तेची हानी (केवळ १९९२ मध्येच), हे मुस्लिमांसकट सर्वांना माहीत असते, तर मुस्लिमांमध्ये उत्तेजन दिले गेले नसते (किंवा निदान कमी प्रमाणात असते) आणि मार्च १९९३च्या मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट आणि त्यानंतरच्या दहशतवादाच्या घटना टाळता आल्या असत्या.
परंतु, त्यानंतर मार्च १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेत २५७ लोकांचा बळी गेला. १ हजार, ४०० हून अधिक जखमी झाले आणि १०० कोटींपेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान झाले. कोलकाता येथेही इस्लामी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात ६९ ठार झाले. एका बाबरीच्या विध्वंसचा हा ’पुरेसा बदला’ नव्हता का? यानंतर ऑगस्ट १९९३ मध्ये चेन्नई येथील रा. स्व. संघाच्या कार्यालयात केलेल्या बॉम्बस्फोटात सहा उच्चस्तरीय प्रचारकांसह ११ जण ठार झाले. त्यानंतर दि. ६ डिसेंबर १९९३ला विविध गाड्यांमध्ये स्फोट केले गेले. दि. ६ डिसेंबर १९९७ला तामिळनाडूत पुन्हा रेल्वेमध्ये स्फोट केले गेले आणि त्यात दहा लोक ठार तर ७० जखमी झाले.
परंतु, भारतीय मीडियाने पाकिस्तान, बांगलादेश व काश्मीरमधील मंदिरांच्या विध्वंसांवर तसेच इस्लामिक कट्टरपंथीयांनी भारतातील केलेल्या बॉम्बस्फोटांवर (१९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट सोडून) पांघरूण घातले आणि केवळ बाबरी मशिदीवरच लक्ष केंद्रित केले, तेही ती मशीद तेथे मंदिर उद्ध्वस्त करून बांधण्यात आली व ती जागा हिंदूंसाठी अतिशय पवित्र होती (श्रीरामाची जन्मभूमी), या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून. याशिवाय १५२८ मध्ये मंदिर जमीनदोस्त करण्याआधी तेथे बाबराच्या सैनिकांनी शेकडो हिंदूंची कत्तल केली होती, याकडेही पूर्ण दुर्लक्ष केले.
याशिवाय हे अगदी स्पष्ट आहे की, एक हिंदू पवित्र स्थळ हिंदूंचे आहे (अयोध्या); कुठलाही धार्मिक पाश्चात्य किंवा पूर्व आशियाई किंवा मुस्लीम कोणीही आपली स्वतःची पवित्र स्थाने इतरांना देण्यास कबूल होणार नाही. अयोध्येत अनेक डझन मशिदी आहेत; मंदिरे तर राहूच द्या. मक्का आणि मदिनामध्ये गैरमुस्लिमांना प्रवेश करण्यासदेखील परवानगी नाही. येथे आपण हजारो मंदिरे पाडण्याचा आणि कोट्यवधी हिंदूंच्या कत्तलींच्या ऐतिहासिक संदर्भांचा विचारही करणार नाही. दि. ६ डिसेंबर १९९२च्या पूर्वी आणि नंतरच्या हिंसाचाराच्याच बदल्यात अयोध्येत मंदिर बांधणे, हे इस्लामवाद्यांच्या कृत्यांसाठी अतिशय लहान प्रायश्चित्त आहे आणि इथे आपण कारसेवकांनी दिलेल्या प्राणांच्या आहुतींचाही विचार करत नाही आहोत. १९९०च्या कारसेवेमध्ये अयोध्येमध्ये दि. ३० ऑक्टोबर १९९०ला कारसेवकांच्या मृत्यूची संख्या १२०हून अधिक होती (मुलायमसिंहचा सरकारी आकडा १६ फारच चूक आहे). दि. २७ फेब्रुवारी २००२च्या गोध्रा हत्याकांडात ५९ हिंदू जाळले गेले होते. ज्यात २५ महिला आणि १५ लहान मुले होती. या सर्व वस्तुस्थितीच्या प्रकाशात राम मंदिर एक अत्यंत छोटासा दिलासा आहे.
कोनेरॅड एल्स्ट यांनी म्हटल्याप्रमाणे, योग्य संदर्भात पाहिल्यास लक्षात येते की, बाबरी विध्वंसामुळे मुसलमानांना रोष होण्यासारखे काहीही नव्हते. परंतु, मीडियाने अनावश्यकपणे मुस्लिमांना आणखीन डिवचेल, असे दाहक अहवाल दिले. यामुळे अतिरेकी पेटून उठलेच; पण सामान्य मुस्लिमांमध्ये सुद्धा संतापाची भावना मीडियाने निर्माण केली. एकीकडे मुस्लिमांच्या हिंदूविरोधी कारवायांवर पांघरूण घालणे व दुसरीकडे सतत बाबरी मशीद पडण्याची घटना घोकत राहून माध्यमांनीही अक्षम्य चूक केली. मुस्लिमांमध्ये संतापाची भावना नसतीच असे नाही. कारण, जे दहशतवादी हल्ले करतात आणि ठार मारतात ते समजतात की, सर्व गैरमुसलमानांना मुस्लीम बनविणे किंवा ठार मारणे, हेच त्यांचे कर्तव्य आहे. विशेषतः मूर्तिपूजा आणि एकापेक्षा अधिक देवाची पूजा (अनेकेश्वरवाद) ही अक्षम्य पापे आहेत, असा त्यांचा विश्वास आहे. या विचारधारेनुसार हिंदू जे मूर्तिपूजक आणि अनेकेश्वरवादी आहेत, यांना चिरडून टाकले गेले पाहिजे. पण, सामान्य मुसलमान दहशतवादी नाहीत आणि त्यांची संतापाची भावना फार कमी असती, असे चित्र उभे केले गेले.
भूरे लाल, माजी आयएएस अधिकारी ज्यांनी सैन्यामध्ये ‘विजीलंस कमिशन’मध्ये देखील काम केले होते व जे एक सन्मानित विशेषज्ञ आहेत, यांनी आपल्या ’द मोन्सट्रस फेस ऑफ आयएसआय’ (१९९९च्या कारगिलच्या युद्धानंतर लगेच २०००च्या अगदी सुरुवातीला प्रकाशित) या पुस्तकात पान ४४-४५ वर लिहिले आहे की,
’आयएसआय’ खालीलप्रमाणे काम करते-
- माध्यम संस्थांमध्ये घुसखोरी करुन त्या काबीज करणे आणि इस्लामी समर्थक वृत्तपत्रे शोधून त्यांना पाकिस्तानी समर्थक आणि इस्लामी समर्थक लेख लिहायला सांगणे.
- भारतीय मुस्लीम पीडित आहेत, असा दुष्प्रचार माध्यमांद्वारे करणे.
- बांगलादेशी मुस्लीम व्होटबँकेवर भरभराट करणारे, भारतीय राजकारणी शोधून त्यांना पोलीस आणि इतर प्रशासकीय कारवाईपासून संरक्षण मिळू शकेल असे करणे.
- एजन्सीने (आयएसआयने) एक ‘डिसइन्फॉर्मेशन’ सेल तयार करून ठेवली आहे. भारताची निंदा करण्यासाठी खोट्या ‘कथा’ प्रसारित करण्यासाठी. ‘आयएसआय’ने बातम्यांमध्ये फेरफार करण्यासाठी, वेगळे फंड (पैसे) ठेवले आहेत.
- ’आयएसआय’ने दहा हजार एजंटांना नोकरीवर ठेवले आहे व यात किमान प्रत्येक दुसरा वृत्तपत्राचा पत्रकार सामील आहे.
मुस्लिमांना वारंवार पीडित म्हणून चित्रित करून, त्यांचा धर्मांधपणावर पांघरूण घालून, कोणाला फायदा होतो? याने केवळ सीमेपलीकडील आपल्या शत्रूंना आणि भारतात असलेल्या इस्लामी कट्टरवाद्यांना मदत होते. अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणावरून मुस्लिमांना पीडित म्हणून रंगवून व बाबरी खटल्यातील ३२ आरोपी निर्दोष सुटले, यावरून खोटा राग व्यक्त करून आणि बाबरीच्या विध्वंसाचा वारंवार उल्लेख करून मुस्लिमांमध्ये रोष व संताप निर्माण करण्याचा सामना करणे आवश्यक आहे. त्याचा सामना पाकिस्तान, बांगलादेश, काश्मीर येथील १९८९-१९९२च्या दरम्यानच्या हिंदूविरोधी कृत्यांच्या मुस्लिमांच्या अपराधावर प्रकाश टाकून केला पाहिजे. तसेच १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट, १९९३ आरएसएस चेन्नई कार्यालयात स्फोट, १९९७ तामिळनाडू गाड्यांचे स्फोट इत्यादी यांचाही वारंवार उल्लेख करून, याचा सामना करणे आवश्यक आहे, हाच या सगळ्या इतिहासातून हिंदूंनी घ्यायचा धडा!
(समाप्त)
एम. डी. देशपांडे
mddeshpande४८@yahoo.com
(अनुवाद : गिरीजा जोशी)