बाबरीचे पतन आणि हिंदू मंदिरे, मालमत्तांचा संहार (भाग-१)

    18-Jan-2024
Total Views | 138
BANGLADESH

डिसेंबर १९९२च्या बाबरी ध्वस्तीकरणाच्या अगोदर व नंतर भारतासह पाकिस्तान व बांगलादेशात हिंदूंना नृशंस अत्याचाराला सामोरे जावे लागले. हजारोंच्या संख्येने मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. हिंदू बांधवांची घरे, दुकाने अशा मालमत्तांनाही धर्मांधांनी लक्ष्य केले. तेव्हा, दि. २२ जानेवारीच्या अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, हिंदूंवरील या अनन्वित अत्याचारांचे स्मरण करणे क्रमप्राप्त ठरावे. 
 
आर. जगन्नाथन यांनी दि. ७ ऑगस्ट २०२० रोजी ’स्वराज्य’ मासिकामध्ये लिहिले होते की, “रामजन्मभूमीची लढाई जिंकली गेली असेल, पंतप्रधानांनी स्वतः हा मुद्दा मांडण्यासाठी दि. ५ ऑगस्टला भूमिपूजनाला हजेरी लावली असली, तरी आता आम्हाला तयार राहायला हवं ते उभ्या ठाकणार्‍या एका नवीन अंतर्गत युद्धासाठी. हिंदूद्वेष्टे डावे, देशविदेशातील इस्लामी गट आणि कथित ‘उदारमतवादी’ लिबरल यांचा संपूर्ण समूह आता आपल्या विरोधात ‘माहिती युद्धा’ची मोहीम उघडणार आहे.” दि. ३० सप्टेंबर २०२० रोजी सर्व ३२ मोठ्या आरोपींची (लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी इत्यादी) बाबरी ध्वस्तीकरणाच्या आरोपातून मुक्तता झाल्यानंतर डावे व इस्लामी गटांनी अपेक्षेप्रमाणे असेच ‘माहिती युद्ध’ (इन्फॉर्मेशन वॉर) आरंभले.
 
मार्क्सवादी व इतर डाव्या मंडळींच्या खोट्या मतांचा प्रचार-प्रसार करणार्‍या माध्यमांनी ’बाबरी मशीद कृती समिती’च्या मुस्लिमांना हे पटवून दिले की, बाबरीच्या जागेवर कोणतेही मंदिर अस्तित्त्वात नव्हते! सय्यद शहाबुद्दीन यांनी १९९० मध्ये एकदा नोंदीवर असे म्हटले होते की, घटनास्थळावर मंदिर अस्तित्त्वात होते, हे सिद्ध झाल्यास, ते स्वतः बाबरी मशीद हातोडीने पाडतील.
१९८९ पर्यंत अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेच्या इतिहासाबद्दल कोणताच प्रश्न उद्भवला नव्हता. हिंदू, मुस्लीम किंवा युरोपीय सर्व लेखी स्रोतात त्या जागेवर राम मंदिराच्या अस्तित्वाविषयी एकमत होते. “रामाचे जन्मस्थळ एका मशिदीने खुणावले आहे, जी मुघल सम्राट बाबरने १५२८ मध्ये आधी असलेल्या मंदिराच्या जागेवर उभारली होती,” असे ’एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका’च्या १९८९च्या आवृत्तीमध्ये ‘अयोध्या’ या प्रकरणात लिहिले होते. रामजन्मभूमी मंदिराच्या जागी मशीद बनल्यावर हिंदूंनी केलेला शोक व संताप आणि मुस्लिमांनी बढाई मारल्याच्या साक्षी मागून साक्षी होत्या.
 
डिसेंबर १९९० मध्ये तत्कालीन चंद्रशेखर सरकारने विश्व हिंदू परिषद आणि ’बाबरी मशीद कृती समिती’ (बीएमएसी) या दोन गटांना या प्रकरणातील ऐतिहासिक सत्यतेवर चर्चा करण्यासाठी विद्वानांच्या पथकाला नियुक्त करण्याचे आमंत्रण दिले. ‘हिंदूंचे अयोध्येवरील दावे शुद्ध कल्पनारम्य आहेत,’ या प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या चुकीच्या भूमिकेवर विश्वास ठेवून, ’बीएमएसी’चे पदाधिकारी कोणत्याही तयारीविना विश्व हिंदू परिषदेच्या धर्मांध, बदनाम, अवास्तवी दाव्यांवर सहज विजय मिळेल, अशी अपेक्षा बाळगून आले. जेव्हा विहिंपच्या गटाने आपल्या बाजूचे समर्थन करणारी अनेक डझन कागदपत्रे सादर केली, तेव्हा मात्र त्यांची बोलती बंद झाली.
 
त्यानंतर पुढच्या बैठकीसाठी ‘बीएमएसी’ने मार्क्सवादी प्राध्यापक आर. एस. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पात्र इतिहासकारांच्या टीमला (सर्व डाव्या विचारांचे) आमंत्रित केले. या बैठकीसाठी ‘बीएमएसी’च्या शर्मा व इतर टीमने त्यांना स्वतंत्र तज्ज्ञ-विद्वान म्हणून मान्य केले जावे, अशी मागणी केली. अर्थात, त्यांची नियुक्ती करणार्‍या ‘बीएमएसी’ आणि त्यांचे विहिंपचे विरोधी यांच्यातील वादावर निकाल देण्यासाठी त्यांना बसवावे, ही मागणी केली. सरकारी प्रतिनिधीने ही हास्यास्पद मागणी मान्य केली नाही.
 
पुढील बैठकीत या तज्ज्ञ मंडळींनी जाहीर केले की, त्यांनी अद्याप पुरावा अभ्यासलेला नाही आणि त्यांना आणखी सहा आठवड्यांची गरज आहे. ज्यांनी पुढाकार घेऊन, नुकत्याच ४२ शिक्षणतज्ज्ञांकडून बाबरीच्या आधी मंदिराच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही, याची एकदाची आणि नेहमीसाठी खात्री करवून टाकणार्‍या, अशा याचिकेवर सह्या घेतल्या होत्या, त्यांनी असे म्हणावे, हे आश्चर्यच! दि. २४ जानेवारी १९९१ला ठरलेल्या बैठकीला ते आलेच नाहीत.
 
१९९०-९१ मधील विद्वानांची चर्चा हिंदू पक्षासाठी शानदार विजय होता. यातून डावे इतिहासकार हे केवळ भोळ्या किंवा अज्ञानी श्रोत्यांसमोर किंवा अशा श्रोत्यांसमोर ज्यांना ते जे म्हणतात, हेच ऐकायचे आहे, खोटं बोलू शकतात, हे दिसले. खर्‍या विद्वानांसमोर मांडायला या डाव्या इतिहासकारांकडे कोणतीही तथ्य नव्हती. आपण हे सुप्रिया वर्मा यांच्यासारख्या डाव्या सत्य नाकारणार्‍यांच्या बाबतीतही पाहिले आहे. त्यांच्या लिखाणातून त्यांनी मंदिराचे अस्तित्व नाकारले. पुरातत्त्व विभागाचा अहवाल फेटाळून लावला (एएसआयने न्यायालयाच्या आदेशावरून उत्खनन करून २००३ साली बाबरी मशिदीच्या जागी मंदिराचे अस्तित्व आहे, हे सांगितले होते) पण, न्यायालयाने विचारणा केली असता कबूल केले की, त्या कधीही उत्खनन स्थळी गेल्या नव्हत्या व त्यांनी जे काही लिहिले, ते फक्त त्यांचे ’मत’ होते.
 
डिसेंबर १९९०, जानेवारी १९९१ मध्ये विद्वानांच्या चर्चेनंतर हे सिद्ध झाले होते की, मंदिर पाडल्यानंतरच बाबरी मशीद बांधली गेली होती. त्यानंतर सय्यद शहाबुद्दीन आणि मुस्लीम पक्ष अवाक् झाले आणि त्यांनी ‘घुमजाव’ भूमिका घेतली. नंतर ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे’ने (एएसआय) २००३ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार, उत्खनन केले. मुस्लीम बाजूच्या मागणीनुसार, उत्खनन करणार्‍यांमध्ये जाणीवपूर्वक कैक मुस्लीम मजूर होते. तसेच ’एएसआय’चा अहवाल लिहिणार्‍या लेखकांमध्ये २० पैकी चार लेखक मुस्लीम होते आणि त्यांच्याच अहवालात मग मंदिर असल्याचे म्हटले गेले. हे लेखकदेखील मुस्लीम बाजूच्या मागणीनुसार समाविष्ट केले गेले होते. उत्खननात त्या ठिकाणी प्राचीन मंदिर सापडले, असे असूनही मुस्लीम बाजूने सत्य मान्य केले नाही आणि आपला दावा सोडण्यास नकार दिला.
 
१९८९ नंतरच्या काळात मार्क्सवाद्यांनी आणि मुस्लिमांनी दावा केला होता की, बाबरी मशीद मोकळ्या जागी (व्हर्जिन लॅण्डवर) बांधली गेली होती. नंतर जेव्हा तेथे एका वास्तूचे (स्पष्टपणे मंदिर) अस्तित्व सिद्ध झाले, तेव्हा त्यांच्यातील काहींनी असा दावा करण्यास सुरुवात केली की, वास्तू बौद्ध आहे, हिंदू मंदिर नाही किंवा सुप्रिया वर्मा यांच्यासारखे काही विद्वान तर हेही म्हणाले की, ती जुनी वास्तूसुद्धा ‘जुन्या मशिदी’आहेत! मग बाबरने ’व्हर्जिन लॅण्ड’वर मशीद बांधल्याच्या दाव्याचे काय? थोडक्यात, जगातील कुठल्याही गोष्टीने या जगातील सर्व पुराव्यांनीदेखील बाबरी मशीद ही अगोदर असलेले मंदिर पाडून बनविण्यात आली आहे, हे मान्य करणार नाही. निर्णायक साहित्यिक पुरावे, पुरातत्त्व पुरावे असूनही, ’एएसआय’च्या अहवालाच्या लेखनात मुस्लीम लेखक असूनही, एवढेच काय तर खोदकाम करणारे कामगारसुद्धा मुस्लीम नेमल्यानंतरही मंदिर पडून बाबरी मशीद बांधली गेली, हे ते कधीही स्वीकारणार नाही.
 
बेल्जियमस्थित जगप्रसिद्ध अभ्यासक व विद्वान डॉ. कोनराड एल्स्ट (१९५९) आपल्या ‘बीजेपी विस-ए-विस हिंदू रिसर्जंस‘ (व्हॉईस ऑफ इंडिया, १९९७) या पुस्तकात लिहितात की, “त्यांचे चकचकीत कॉन्व्हेंट स्कूलचे इंग्रजी, त्यांची झोकदार शब्दावली आणि त्यांचा एकूणच पवित्रा, साधेपणाचा आव आणणे, यावरून आपल्या लक्षात येणार नाही; पण रोमिला थापर, इरफान हबीब किंवा ज्ञानेंद्र पांडे (हे आहेत डावे इतिहासकार, ज्यांनी इस्लामी शासकांनी केलेले गुन्हे नाकारले आणि विवादित जागेवर मंदिर अस्तित्वात होते हे नाकारले) यांचे हात रक्ताने माखलेले आहेत.
 
अयोध्येतील बाबरी विध्वंसानंतर उठलेली मुस्लीम हिंसाचाराची लाट व नंतर पोलिसांची दडपशाही व शिवसेनेचा बदला, जो मुस्लिमांवर उलटलाही. किमान काही प्रमाणात तरी या तथाकथित तज्ज्ञांनी पसरविलेल्या चुकीच्या माहितीमुळे हे घडले होते. या तथाकथित इतिहासकारांनी हेच नाकारले की, विवादित इमारतीचा (बाबरी मशीद) हिंसक मूर्तिपूजाविरोधी इतिहास होता (टिप्पणी ः म्हणजे मंदिर पाडल्यानंतर बांधण्यात आली होती) आणि असे सूचविले की, हिंदू खोटे ऐतिहासिक आधार देऊन निष्पाप, निष्कलंक मशिदींवर हल्ले करू शकतात.
 
या चुकीच्या माहितीमुळे मुस्लीम धर्मांधांना हिंसात्मक बदला घेण्यासाठी आणि सभ्य मुस्लिमांना हिंसाचारासाठी आवश्यक असलेले औचित्य मिळाले. जर त्यांना अयोध्येतील इस्लामच्या दोषाचे सत्य माहीत असते, तर ती हिंसाराची कृत्ये त्यांनी कधीही केली नसती.” आता एक खरा धोका असा होता की, छद्म धर्मनिरपेक्षतावाद्यांचे (हिंदूविरोधी व इस्लाम्यांची वकिली करणारे) बाबरी मशीद पाडणे व अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला केलेल्या विरोधामुळे व आता बाबरी ध्वस्तीकरण खटल्याप्रकरणी ३२ आरोपी निर्दोष सुटल्याच्या केलेल्या विरोधाने पाकिस्तान, बांगलादेशात आणि भारतातसुद्धा पूर्वी केल्याप्रमाणे हिंदूंवर हल्ले होण्याची शक्यता वाढली होती. म्हणूनच अत्यंत तातडीने पुढील गोष्टी उजेडात आणणे गरजेचे आहे. दि. ६ डिसेंबर १९९२ला बाबरी मशीद पाडण्यापूर्वी व नंतर बांगलादेश, पाकिस्तान आणि (भारताच्या नियंत्रणातील) काश्मीरमध्ये तब्बल पाच हजार हिंदू मंदिरे पाडली गेली होती. ज्यात बाबरी पडण्यापूर्वी ५५० हून अधिक मंदिरे पडल्याचा समावेश आहे. बांगलादेश व पाकिस्तानमध्ये अनेक हिंदूंची हत्या केली गेली व त्यांची मालमत्ता लुटली गेली व घरे उद्ध्वस्त करण्यात आली. भारतात मुंबई, चेन्नई आणि इतर ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले आणि हेही उजेडात आणणे आवश्यक आहे की, अयोध्येत एका नवीन ठिकाणी जागा देण्यात आली असून, तिथे नव्या मशिदीची पुनर्बांधणी होणार आहे.
 
अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यापूर्वी काश्मीरमध्ये (भारतीय नियंत्रणाखाली असलेल्या भागात) सुमारे १०० मंदिरे आणि बांगलादेशात ४०० हून अधिक मंदिरे जमीनदोस्त केली गेली होती. ‘अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेली म्हणून दहशतवाद आहे,’ असे म्हणून जे लोक इस्लामिक दहशतवादाचे समर्थन करतात, ते सोयीस्करपणे त्या अगोदर या किमान ५००हून अधिक पाडलेल्या मंदिरांचा उल्लेख करायला विसरतात. ज्याने कोणालाही असे वाटेल की, बाबरी मशीद पाडणे हाच या मंदिरांना पडल्याचा ‘बदला’ असू शकतो. बाबरी मशीद पूर्वीचे मंदिर उद्ध्वस्त करून बांधण्यात आली होती, याचाही ‘बदला’ असू शकतो, हे तर जाऊच द्या!
१९८९ मध्ये बांगलादेशात सुमारे ४०० मंदिरे जमीनदोस्त केली गेली होती. त्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत दि. ९ नोव्हेंबरला १९८९च्या अयोध्येतील शीलान्यासाच्या पार्श्वभूमीवर सुमारे २०० मंदिरे पाडली गेली. तसेच अनेक हिंदूंची दुकाने लुटली गेली आणि जाळली गेली.१९९० मध्ये बांगलादेशात दि. ३० ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबरच्या कारसेवेनंतर किमान ४५ मंदिरे जमीनदोस्त केली गेली. यावेळी झालेल्या हिंसाचारात बांगलादेशातील शेकडो (किमान ५५०) हिंदूंची दुकाने आणि घरे लुटली गेली किंवा जाळली गेली.हे हल्ले बांगलादेशात १९८९ आणि १९९० या काळात झाल्यामुळे, त्यावेळी पाकिस्तानमध्ये असा हिंदूविरोधी हिंसाचार झाला असावा, हे अगदी निश्चित आहे. तथापि, १९८९ किंवा १९९० मध्ये पाकिस्तानमध्ये उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांची वा हिंदूंवरील हल्ले यांची नेमकी संख्या प्रस्तुत लेखकाला सापडलेली नाही. त्याला एक वृत्त सापडले की, नोव्हेंबर १९९० मध्ये एक हिंदू ठार झाला आणि चार मंदिरांचे नुकसान झाले.
 
दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी पाडल्यानंतर पाकिस्तानमध्ये किमान २४५ मंदिरे पाडली गेली आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’ दि. १९ मार्च १९९३ अनुसार, बांगलादेशात ३ हजार, ६०० मंदिरे पाडली गेली. बाबरीनंतर बांगलादेशातील हिंदूविरोधी कारावायांमध्ये २८ हजार गैरमुस्लिमांची घरे नष्ट केली गेली व २ हजार, ७०० व्यापार (उदा. दुकाने) नष्ट करण्यात आली. एकूण दोन अब्ज (२०० कोटी) बांगलादेश टाका इतके नुकसान झाले होते. याचवेळी भारतात काश्मीरमध्ये १०० हून अधिक मंदिरे पडली. भोपाळ, आसामसारख्या भारतातील इतरही काही ठिकाणी मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. १९९० नंतर पाकिस्तानातील ९५ टक्के मंदिरे नष्ट किंवा दुसर्‍या उपयोगासाठी परिवर्तीत केली गेली. २०१४च्या अखिल पाकिस्तान हिंदू हक्क चळवळीच्या (APHRM) सर्वेक्षण अहवालानुसार देशातील एकूण ४२८ अल्पसंख्याक धार्मिक स्थळांपैकी ४०८ स्थळांचे खेळण्यांची दुकाने, रेस्टॉरंट्स, सरकारी कार्यालये आणि शाळांमध्ये रुपांतर झाले आणि तेथे आता केवळ २० हिंदू मंदिरे शिल्लक आहेत. एकूणच १९४७ मध्ये पाकिस्तान अस्तित्वात आल्यापासून हजारो हिंदू मंदिरे नष्ट केली गेली.
 
शीख धार्मिक स्थळेसुद्धा यामधून सुटलेली नाहीत. शिखांच्या अनेक उपासना स्थळांवरही पाकिस्तानने बुलडोझऱ फिरवला. त्यातील प्रमुख म्हणजे गुरू दुवारा गली या अबोटाबादमधील शीख धार्मिक स्थळाचे रुपांतर कपड्यांच्या दुकानात केले गेले. पाकिस्तानमधील सुमारे १७१ गुरुद्वारा एकतर नष्ट केले गेले किंवा कोसळण्याच्या बेतात आहेत, नाहीतर त्यांना मशिदींमध्ये (किंवा शाळा, पोलीस स्थानक इत्यादी) मध्ये रुपांतरित केले गेले किंवा घरे बांधण्यासाठी पाडण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीर सरकारने २०१२ मध्ये अधिकृतपणे सांगितले की, १९९०च्या दशकापासून २० वर्षांत काश्मीरमध्ये २०८ मंदिरे उद्ध्वस्त झाली. ही संख्या याहून अधिकही असू शकते. काश्मिरी पंडित संघर्ष समिती (KPSS)च्या अनुसार, नष्ट झालेल्या मंदिराची वास्तविक संख्या ५५०च्या आसपास आहे. जम्मू-काश्मीर सरकारने कबूल केले की, काश्मीरची उन्हाळ्यातील राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये सर्वाधिक मंदिरे तोडली गेली. इथे तोडण्यात आलेल्या मंदिरांची अधिकृत संख्या ५७ आहे. तथापि, या तोडफोडीत कोणतीही मशीद नष्ट झाली नाही आणि बर्‍याच मंदिरांचे आता मशिदींमध्ये रुपांतर झाले आहे.
 
या लेखात बाबरी विध्वंसानंतर फक्त एक दिवसात पाकिस्तानमध्ये काय घडले, याचा अंदाज मिळतो. पाकिस्तानी लोकांनी ३० हिंदू मंदिरांवर हल्ला केला, त्यानंतरही बरेच काही झाले. दि. ८ डिसेंबर १९९२च्या ’द न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस दलांनी मंदिरांवरच्या हल्ल्यांत हस्तक्षेप केला नाही व जेव्हा ‘एअर इंडिया’च्या कार्यालयावर गर्दी धावून केली व तेथील फर्निचर रस्त्यावर फेकून कार्यालयाला आग लावली, तेव्हासुद्धा त्यांनी कारवाई केली नाही. दि. १५ डिसेंबर १९९२च्या ’डॅलस मॉर्निंग न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानात किमान २४ लोक (आपण सुरक्षितपणे समजू शकतो, यातील बहुतेक हिंदूच असतील) मारले गेले आणि किमान १०० मंदिरांवर मुस्लिमांनी हल्ला केला.
 
पाकिस्तानी पत्रकार रिमा अब्बासी आणि छायाचित्रकार मडिहा ऐजाझ यांनी पूर्ण पाकिस्तानभर प्रवास केला आणि हिंदू मंदिरांच्या स्थितीचा आढावा घेतला. रिमा यांनी "Historic Temples in Pakistan : A Call to Conscience' नावाचे पुस्तक लिहिले. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर पाकिस्तानमधील मंदिरांच्या विनाशाच्या भीषण शृंखलेदरम्यान सुमारे एक हजार मंदिरांना लक्ष्य करण्यात आले होते, असे रिमा यांनी नमूद केले. तसेच या संकेतस्थळावर जी पाकिस्तानातील हिंदूंबद्दल माहिती देते, पाकिस्तानच्या एक हजार हिंदू मंदिरांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती दिली आहे. (क्रमश:)
-एम. डी. देशपांडे
(अनुवाद : गिरीजा जोशी )
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121