पुण्यात 'श्रीराम रंगी रंगले' कार्यक्रमाचे आयोजन!

    18-Jan-2024
Total Views |

Shriram Pune

पुणे :
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिराचा भव्य उद्धाटन सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने संपुर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातच आता विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० आणि २१ जानेवारी रोजी पुण्यातील नारायण पेठेतील रमणबाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
नारायण पेठेतील रमणबाग प्रशालेत सकाळी १० ते रात्री १० यावेळेत प्रभू श्रीरामांची १०० फुटांची भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. तसेच यावेळी रामचरित्रावर अखंड गायन-भजन-नृत्य सादरीकरण, रामायणावरील १२५ चित्रांचे प्रदर्शन, श्रीराम खिचडी प्रसाद वाटप, प्राचीन शस्त्र आणि श्रीराम मंदिर प्रतिकृती, पुस्तके, गौ साहित्याचे प्रदर्शन अशा नानाविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रसार प्रमुख तुषार कुलकर्णी, संस्कार भारतीचे प्रांत सहमंत्री सतीश कुलकर्णी, रांगोळी संयोजक अभय दाते, श्री रामराज्य फाउंडेशनचे संस्थापक आशिष काटे आदी उपस्थित होते.
तुषार कुलकर्णी म्हणाले, विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती पुणे महानगर यांनी उत्सवाचे संयोजन केले आहे. श्रीराम मंदिर, अयोध्या येथे होता असलेल्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव पुण्यात भव्य स्वरूपात होणार आहे. प्रभू श्रीरामाची ७००० स्क्वेअर फूट भव्य रांगोळी संस्कार भारती व श्रीरंग कलादर्पणचे कलाकार ७ हजार चौरस फूट आकारात साकारणार आहेत. यामध्ये रामायणातील ७ प्रसंग रेखाटण्यात येणार असून त्याकरिता २५० किलो रंग व रांगोळी लागणार आहे आणि ही भव्य रांगोळी साकारण्यासाठी ४० तासांचा कालावधी लागणार आहे.
सतीश कुलकर्णी म्हणाले, आर्ट इंडिया फाऊंडेशनतर्फे श्री रामायणावर आधारित १२५ चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातून काढलेल्या २ हजार चित्रांमधील १२५ सर्वोकृष्ट चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचातर्फे प्राचीन ७०० शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तसेच रामचरित्रावर अखंड गायन-भजन- नृत्य सादरीकरण दिग्गज कलाकार करणार आहेत.
दोन दिवसीय उत्सवात येणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला श्रीराम खिचडी प्रसादाचे वाटप केटरिंग असोसिएशन च्या वतीने होणार आहे. उत्सवात प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 
बुधवारी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रसार प्रमुख तुषार कुलकर्णी, संस्कार भारतीचे प्रांत सहमंत्री सतीश कुलकर्णी, रांगोळी संयोजक अभय दाते, श्रीरामराज्य फाउंडेशनचे संस्थापक आशिष काटे आदी उपस्थित होते.