फणसाडचा कृतिशील वन अधिकारी

    17-Jan-2024
Total Views |
tushar kalbhor
 
फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असणार्‍या तुषार प्रल्हाद काळभोर यांच्या आजवरच्या प्रयोगशील प्रवासाची ही कहाणी...
 
फणसाड अभयारण्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) या पदावर कार्यरत असणारे एक धडाडीचे आणि प्रयोगशील अधिकारी म्हणजे तुषार काळभोर. दि. १० जून १९९० रोजी तुषार यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील कडवे बुद्रुक गावात झाला. तुषार यांचे बालपण कराड तालुक्यामध्ये हरपळवाडी या त्यांच्या मूळ गावी गेले. इथेच शैक्षणिक वाटचालीला सुरुवात केलेल्या तुषार यांना लहानपणापासून खेळांची आवड, त्यात क्रिकेट तर त्यांच्या विशेष आवडीचे. हरपळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षणानंतर, पुढे माध्यमिक शिक्षण त्यांनी पाल येथील म्हाळसाकांत विद्यामंदिर येथे पूर्ण केले. ग्रामीण भाग असूनही दहावीमध्ये पहिला क्रमांक पटकाविणार्‍या तुषार यांनी आपल्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सातार्‍यातील रामकृष्ण ज्युनिअर कॉलेज, नागठाणे येथे प्रवेश घेतला. २००७ मध्ये बारावीतही पहिला क्रमांक पटकावित ’बीएससी अ‍ॅग्री’ या पदवीसाठी त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या कडेगाव येथील लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेही ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. इथेच न थांबता ‘एमएससी हॉर्टीकल्चर‘ ही पदव्युत्तर पदवी महात्मा फुले कृषी विद्यापीठ पदव्युत्तर महाविद्यालयातून २०१३ मध्ये पूर्ण केली. पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच, इतर मुलांसोबत स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही तुषार यांनी आरंभला. त्यावेळी जमतील तितक्या सरकारी पदांसाठीच्या विविध परीक्षाही त्यांनी दिल्या. वनसेवेत रुजू व्हायचे, असे काही ठोस तुषार यांनी ठरवले नव्हतेच. अनेक स्पर्धा परीक्षांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांची पुढे निवड होत नसे. अखेर २०१४ साली दिलेल्या वनसेवेच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत, २०१६ पासून ते वनसेवेत रुजू झाले. दि. १५ जुलै २०१६ रोजी सुरू झालेल्या तुषार यांच्या प्रवासाने आजवर त्यांना अनेक वळणांवर नेत, अनुभव समृद्ध केले.
 
दि. १५ जुलै २०१६ ते १५ जानेवारी २०१८ अशी दीड वर्षं वनसेवेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करत, २०१८ साली त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या अनेक अभ्यास दौर्‍यांबरोबरच, वन विभागाशी संबंधित अनेकविध विषयांचा अभ्यास करता आला. त्यानंतर २०१८ मध्ये डहाणू वनविभागाअंतर्गत भालिवली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी गस्त पथकामध्ये त्यांचे पहिले पोस्टिंग झाले. यामध्ये अतिक्रमण, विविध कारवाया, वनगुन्ह्यांची नोंद अशा प्रकारच्या जबाबदार्‍या पार पाडल्या. यामध्ये त्यांनी अवैध खैर तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करून, वाहने पकडली आहेत. या गस्त पथकामध्ये सहा महिने काम केल्यानंतर पुढे जून महिन्यात त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून मनोर येथे काम करण्याची संधी मिळाली. साधारणपणे चार- पाच वर्षे या क्षेत्रातील कार्यभार सांभाळताना वनमहोत्सव, रोपवाटिका, वनविभागाच्या इतर योजनांची कामे, अवैध तस्करी, शिकारी तसेच अतिक्रमण निष्कासित करणे अशी कित्येक वाटा तुषार यांनी चोखाळल्या. यादरम्यान, प्रसंगी आलेले अतिरिक्त कार्यभारही तुषार यांनी समर्थपणे पेलले. पुढे तुषार यांची फणसाड येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्याचबरोबर सध्या ते (ACE) साहाय्यक वनसंरक्षक म्हणूनही अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. फणसाड येथे नियुक्ती झाल्यापासून नियमितपणे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने पक्षीगणना, शालेय-महाविद्यालयीन मुलांचा जंगलाशी संपर्क यावा, यासाठी अभ्यास फेर्‍यांचे आयोजन, असे त्यांचे अनेकविध उपक्रम सुरू आहेत. त्याचबरोबर फणसाड येथे निसर्ग पर्यटनाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असून, फुलपाखरू उद्यान, वन्यजीव सप्ताहांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन असे उपक्रम आणि प्रकल्पदेखील राबविले जात आहेत. त्यामुळे वनसेवेची वाट अनपेक्षितपणे निवडली असली, तरी तुषार यांचं जंगलाशी जवळचं आणि घट्ट नातं निर्माण झालं. त्यातूनच आधीपासूनच असलेली छायाचित्रणाची आवड जोपासण्यासाठी एक कॅमेरा खरेदी करुन आकर्षक निसर्गझटा टिपायला सुरुवात केली. वन्यजीव, फुलपाखरे, विविध पक्षी अशा जैवविविधतेतील विविध घटकांना कॅमेर्‍यात कैद करण्याचा तुषार यांना छंद जडला तो आता कायमचाच!
 
लहानपणापासूनच हुशार आणि क्रियाशील असलेले तुषार तितकेच प्रयोगशील. त्याच जोरावर फणसाड वनक्षेत्राचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार करत, त्यांनी त्याविषयी जोमाने काम सुरू केले. वनविभागाच्या विविध योजनांचा स्थानिकांना लाभ व्हावा, त्याचबरोबर नवनवीन प्रकल्पही या क्षेत्रात सुरु व्हावे, यादृष्टीने तुषार सातत्याने प्रयत्नशील असतात. यामध्ये निसर्ग पर्यटनाबरोबरच त्यांनी गिधाडांच्या संवर्धनासाठी ‘गिधाड आहार केंद्र’ (Vulture Restaurant) ही स्थापन करून ही संकल्पना यशस्वीपणे राबविली. महिला बचतगटाच्या माध्यमातून फणसाडला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी सोयीसुविधा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असून, विविध नेचर ट्रेल्सही ते आयोजित करतात.
 
एकूणच निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांची संख्या वाढावी, तसेच अधिकाधिक निसर्गप्रेमींपर्यंत फणसाड अभयारण्याची माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तुषार आवर्जून सांगतात. वन विभागातील त्यांच्या आजवरच्या या अमूल्य योगदानासाठी तुषार काळभोर यांना दै. ’मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.