इस्रायल-‘हमास’ युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक राजकारणात पश्चिम आशिया क्षेत्र केंद्रस्थानी आले. इस्रायल-‘हमास’ युद्ध, गाझा पट्टीतील छोट्याशा भूभागावर लढण्यात येत असले तरी, या युद्धाचे राजकीय, आर्थिक परिणाम संपूर्ण जगाला भेडसावत आहेत. पश्चिम आशियातील प्रादेशिक शक्ती विरूद्ध जागतिक महाशक्ती असा संघर्षही इस्रायल-‘हमास’ युद्धामुळे उफाळून आला. यात जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होताना दिसतात.
इस्रायल-‘हमास’ युद्धात भारताने इस्रायलच्या दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा दिला. त्यासोबतच पॅलेस्टाईनमधील सर्वसामान्य नागरिकांना मानवीय मदतसुद्धा पाठवली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशांतर्गत राजकारणाचा विचार न करता, इस्रायलसोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यात आले. स्वत: नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा ऐतिहासिक दौरा केला. याच काळात भारताने अरब देशांशीसुद्धा घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले. पण, हे करताना भारताने इराणकडे दुर्लक्ष केले नाही. पश्चिम आशियाच्या राजकारणात सुन्नीमुस्लीम बहुल सौदी अरेबिया आणि शियाबहुल इराण असे दोन गट. या दोन्ही गटांचे लेबनॉन, येमेन, इराक, सीरिया या देशांमध्ये संघर्ष चालूच आहे. त्यामुळे या संघर्षरत दोन्ही गटांसोबत आपले संबंध प्रस्थापित करणे, कोणत्याही देशाच्या कूटनीतिसाठी तसे कर्मकठीण. तरीही भारताने या दोन्ही गटांसोबत आपल्या संबंधाचा सुवर्णमध्य साधला.
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर दि. १४ जानेवारीपासून दोन दिवसांच्या इराण दौर्यावर होते. या दौर्यात त्यांनी इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांची भेट घेतली. त्यासोबतच त्यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर-अब्दोल्लाहियन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये पश्चिम आशियातील सद्यःस्थिती,लाल समुद्रातील हुथी बंडखोरांचे हल्ले आणि चाबाहार बंदराविषयी चर्चा करण्यात आली. इस्रायल-‘हमास’ युद्धाच्या पार्श्वभूमीवर एस. जयशंकर यांचा इराण दौरा जागतिक राजकारणात महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
इस्रायल-‘हमास’ युद्धाला १०० दिवसांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. तरीही युद्ध थांबण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाहीत. याउलट पश्चिम आशियातील इराणच्या ‘प्रॉक्सी’ संघटनांनी इस्रायलवर आणि अमेरिकेच्या ठिकाणांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे, यमनच्या हुथी बंडखोरांकडून लाल समुद्रात करण्यात येत असलेल्या मालवाहू जहाजांवरील हल्ले. आशिया आणि युरोपला समुद्रमार्गे जोडणार्या सर्वांत जवळचा रस्ता सुएज कालव्यातून जातो. या कालव्याला जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनरेषा म्हटले तरी वावगं ठरणार नाही. याच सुएज कालव्याच्या रस्त्यात पडणार्या लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी मालवाहू जहाजांवर हल्ले केले आहेत. त्यातच वाहत्या गंगेत हात धुण्याच्या उद्देशाने सोमालियन चाच्यांनीसुद्धा मालवाहू जहाजांमध्ये लुटमार करण्यास सुरुवात केली आहे. जागतिक व्यापाराच्या एकूण व्यापारापैकी जवळपास ४० टक्के व्यापार लाल समुद्रातून होतो. त्यामुळे लाल समुद्र व्यापारासाठी सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. इराणचे हुथी बंडखोरांशी संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळे हुथींना नियंत्रणात ठेवायचे असल्यास इराण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. त्यामुळे इराणला सोबत घेणे भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
लाल समुद्रानंतर भारतासाठी मागच्या काही दशकांपासून रखडलेला बंदर विकास प्रकल्प म्हणजे चाबाहार. इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षेला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वात पाश्चिमात्य देशांनी इराणवर आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे इराणसोबत भारताला द्विपक्षीय व्यापार करण्यात अडचणी येत आहेत. याच काळात चीनने अमेरिकेच्या निर्बंधांना केराची टोपली दाखवत इराणसोबत आपले व्यापार संबंध वृद्धिंगत केले. सध्या इराण आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. याउलट भारताचा चाबाहार प्रकल्प रखडला आहे. पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापासून हाकेच्या अंतरावर असलेले चाबाहार बंदर भारताच्या समुद्री सुरक्षेसाठी आणि मध्य आशियातील देशांसोबत व्यापार करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण. त्यामुळे इराणच्या मैत्रीच्या किमतीवर सौदी, इस्रायल आणि पाश्चिमात्य देशांशी संबंध ठेवता येणार नाहीत. भारताला या सर्व देशांसोबत सुवर्णमध्य साधावाच लागेल. जयशंकर हा सुवर्णमध्य कसा साधतात, हे पाहणे औत्सुक्याचे!
श्रेयश खरात