शिकारी खुद यहा, शिकार हो गया!

    15-Jan-2024   
Total Views |
AFRICAN RAPTORS
 
निसर्ग संपदेचा र्‍हास आणि पर्यावरणीय परिसंस्थेतील अनेक घटकांचे होणारे नुकसान, तसेच त्यामुळे प्रजातींचे नष्ट होणे चिंताजनकच. याच नष्ट होण्याच्या साखळीमध्ये आणखी एका प्रजातीचा समावेश झाला आहे, ती म्हणजे ‘आफ्रिकन रॅप्टर्स’ म्हणजेच ’आफ्रिकी शिकारी पक्षी.’ गेल्या ४० वर्षांच्या कालावधीमध्ये या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये तब्बल ८८ टक्के इतकी घट झाल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी निरीक्षण केलेल्या ४२ प्रजातींपैकी दोन तृतीयांश प्रजाती जागतिक स्तरावर धोक्यात असल्याचे पुरावे सूचित केले गेले होते.
 
एका नवीन अभ्यासामधून गेल्या ४० वर्षांत ‘आफ्रिकन रॅप्टर्स’च्या प्रजातींमध्ये ८८ टक्के इतकी घसरण झाल्याचे समोर आले आहे. वर नमूद केल्याप्रमाणेच अधिवासाचे झालेले नुकसान, वातावरणातील बदल, अतिप्रमाणातील मानवी हस्तक्षेप यांमुळे थेट ऋतुचक्रावर झालेले परिणाम हे सगळे या प्रजातींचे नुकसान होण्यास कारणीभूत. एकूण २९ प्रजातींपैकी असलेल्या साधारणतः ६९ टक्के प्रजातींमधील तीन पिढ्यांमध्ये घट दिसून आली आहे. ’इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (IUCN ) द्वारे जागतिक नामशेष होण्याच्या धोक्यात असलेल्या प्रजाती ओळखण्यासाठी विविध निकष वापरले जातात.
 
‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’चे नामशेष होण्याच्या धोक्याच्या पातळ्यांची मर्यादा या प्रजातींनी ओलांडली आहे. शास्त्रज्ञांनी तपासलेल्या ४२ प्रजातींपैकी ३७ प्रजातींची संख्या घटल्याचे ही सांगितले आहे. आफ्रिकेतील अनेक प्रदेशांमध्ये असलेल्या २७ प्रजातींचा अभ्यास करणार्‍या संशोधकांना आढळून आले की, त्यापैकी २४ प्रजातींची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली. म्हणजेच तब्बल ८९ टक्के प्रजाती संख्येने कमी होत आहेत. त्यांच्या स्थितीचे पुनर्मूल्यांकन करण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तब्बल १३ प्रजाती किमान चिंतेच्या (least concerned) श्रेणीमध्ये सूचिबद्ध आहेत. यामध्ये असणार्‍या ‘सेक्रेटरी बर्ड’ (Sagittarius serpentarius), लॅपेट-फेस्ड् गिधाड (Torgos tracheliotos), बॅटेलर, टॉनी गरूड (Aquila rapa), स्टेप ईगल (Anipalensis) आणि मार्शल गरूड (Polemaetus bellicosus) या सहा प्रजाती आफ्रिकेतील किंवा आफ्रिकेच्या जवळपास असणार्‍या प्रदेशनिष्ठ प्रजाती आहेत. ऑगुर बझार्ड (Buteo augur), डिकिन्सन्स केस्ट्रेल (Falco dickinsoni) आणि ब्यूडॉईनचा सर्पगरूड (Circaetus beaudouini)) या शिकारी पक्ष्यांच्या तीन प्रजातींमध्ये अतिरिक्त घट दिसून आली. अधिवास नष्ट होणे, ’प्रे-बेस’ म्हणजेच तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी होणे आणि मानववंशजन्य कारणांमुळे अधिवास विस्कळीत होणे, ही ‘रॅप्टर्स’ अर्थात शिकारी पक्ष्यांची संख्या कमी होण्यामागची प्रमुख कारणे असल्याचे ’नेचर इकोलॉजी अ‍ॅण्ड इव्होल्युशन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांमध्ये म्हटले आहे. या अभ्यासात असेही म्हटले गेले आहे की, गेल्या ६० वर्षांमध्ये आफ्रिका खंडातील मानवी लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाल्यामुळे जमिनीचे रुपांतरण आणि अधिवासाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
 
उप-सहारा आफ्रिकेमध्ये दरवर्षी सुमारे पाच दशलक्ष हेक्टर जंगल आणि जंगलेतर नैसर्गिक वनस्पती नष्ट होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पश्चिम आफ्रिकेमध्ये ही घट अधिक ठळकपणे दिसून आली. तसेच ‘रॅप्टर्स’ म्हणजेच शिकारी पक्षी हे मंद गतीने प्रजनन करतात. सातत्याने आणि वेगाने कमी होणारी संख्या, अधिवासाचे नुकसान याबरोबरच मंद गतीने प्रजनन असल्यामुळे त्यांच्या संख्येतील घट वाढत आहे.
 
अशा प्रकारची अनेक कारणे असली, तरी त्यामुळे शिकारी पक्ष्यांचे परिसंस्थेत असलेले महत्त्व कमी होऊ शकत नाही. मानवाला त्रासदायक असलेल्या काही प्राणी-पक्ष्यांपासून शिकारी पक्षी रक्षण करत असतात. त्यांची संख्या कमी झाल्यामुळे आपसूकच उपद्रवी जीवांच्या संख्येमध्ये वाढ होऊन पिकांचे व इतर नुकसान होण्यास ही सुरुवात होते. त्यामुळेच शिकारी पक्ष्यांचे परिसंस्थेतील महत्त्व जाणून घेत, त्यांचा अधिवास पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करायला हवेत, हे निश्चित.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.