शुभंकर पुराणातून वसुंधरेचा महिमा... (भाग १)

    14-Jan-2024
Total Views | 109
Article on pro-sports-mascot-power-sports-world

आपल्या कला, आपला निसर्ग वगैरे आठवलं की, त्याला जोडूनच असलेल्या क्रीडेला आपण वेगळे करू शकत नाही. आपण क्रीडा क्षेत्र हे ‘वसुंधरा’अंतर्गत असलेल्या घटकांचा कसा चपखल वापर करून, आपले दायित्व प्रदान करते, ते बघण्याचा या लेखाच्या दोन भागांत क्रमशः प्रयत्न करू. ‘शुभंकर’ अर्थात ‘मॅस्कॉट’ हे सगळ्याच क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. तेव्हा क्रीडा क्षेत्रातील अशाच काही शुभंकरांविषयी...

गणेशाय नमः। नारद उवाच।’ म्हणत गणेशस्तोत्रातील गजराज, पुराणांनुसार दशावतारांतील मत्स्य, कूर्म अथवा कच्छप, वराह हे अवतार ज्याने घेतले आहेत, त्या श्री विष्णूला ‘॥ॐ नमो भगवतेकूर्मरुपीनारायणाय॥’ म्हणत असतो. श्री दत्तात्रेयचरणी चार वेदांच्या रुपात आणि दत्ताची अस्त्रे मानली जातात, असे चार श्वान आपण बघत आलो आहोत. प्रभू रामचंद्रांच्या कार्यात खारीने आपल्या परीने हातभार लावत खारीचा वाटा उचलला आहे. ब्रह्मांडातील पृथ्वी, वायू, आप, तेज आणि आकाश या पंचमहाभूतांचे अशा तर्‍हेने अनन्यसाधारण महत्त्व आपण मानत आलो आहोत. त्यातील वसुंधरेत वन्यजीव प्राणी, पक्षी आदींवर आपण विलक्षण प्रेम करत असतो. या सगळ्यांचे आपल्या जीवनात श्रद्धापूर्वक स्थान असते.

वसुंधरा-शुभंकर आणि क्रीडाजगत...

२०२४चा प्रारंभ होताच क्रीडा विश्वातल्या एका महामेळ्याची चर्चा जगभर सर्वांच्या तोंडी दिसून येत आहे. जुलै-ऑगस्ट २०२४च्या दरम्यान पॅरिसमध्ये ’ऑलिम्पिक’च्या स्पर्धांचे आयोजन तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत आहे. त्या स्पर्धांची आपापली एक ओळख चिरंतन स्मरणात असावी आणि त्या स्पर्धा यशस्वी व्हाव्यात, अशी त्या संबंधितांची भावना असते आणि त्यासाठी ते विविध प्रकारे पंचमहाभूतांना साकडेही घालत, त्यांचा सन्मान करत असतात. या स्पर्धांच्या अधिकृत घोषणेसमवेत त्याच्या प्रचाराचा श्रीगणेशा करताना, त्यांच्या नियोजनात पहिले काम केले जाते, ते म्हणजे शुभंकरचे (मॅस्कॉटचे) सादरीकरण.

वसुंधरामधले कासव विशेषत्वाने आपले ध्यान आकर्षित करत आले आहे. या कासवावरून आणि वसुंधरेवरून युवक आणि क्रीडाविश्वातील सगळ्यांना शुभंकरचे विशेष संदर्भ आठवतील.

शुभंकर (मॅस्कॉट)

’मॅस्कॉट’ या आंग्ल भाषेतल्या शब्दास आपण ’शुभंकर’ असे मराठीत म्हणतो. या ’शुभंकर’चा अर्थ म्हणजे शुभ गोष्ट किंवा भाग्य आणणारी म्हणून समजली जाणारी व्यक्ती, गोष्ट किंवा असा प्राणी, शकुनाची गोष्ट, लाभदायी गोष्ट, एक चरित्र, पायगुणाची अशी व्यक्ती की जी मुख्यत्वेकरून कोणा एका संघटनेशी संबंधित असते, त्याचे प्रतिनिधित्व करत असते. ’शुभंकर’च्या जाहिरात, कला, युवक, क्रीडा तसेच ’वसुंधरे’शी असलेल्या नातेसंबंधावर आधारित काही माहिती आपण या लेखातील दोन भागांत क्रमशः समजून घेणार आहोत.

व्यावसायिक शुभंकर...

लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांत काही चरित्र प्रसिद्ध आहेत. चालू घडामोडींवर भाष्य करणारी व्हर्गिस कुरियन यांच्या ’अमुल’ बटरची मुलगी, ’पारले जी’ बिस्किटाची मुलगी, त्या काळात सगळ्यांच्या कानी होते, ते एक नाव ’मर्फी’ व ती रेडिओ छोकरी मर्फी बेबी. सगळ्या भिंतीवर झळकलेल्या दिनदर्शिकेवर ती सगळ्यांना आवडायची. मग ते कॅलेंडर रसवंतीगृहात टांगलेले असो किंवा आपल्या शयनगृहात लावलेले असो. ’एशियन पेंट्स’ या रंगाच्या कंपनीचा रंगारी ’गट्टू.’ आर. के. लक्ष्मण यांचा ’कॉमन मॅन’, शेजार्‍याचा मत्सर, तर आपला अभिमान जपणारा ओनिडाचा बागुलबुवा, ‘एअर इंडिया’चा पूर्वीचा आणि आजच्या नवीन अवतारातला महाराजा. हेमा, रेखा, जया आणि सुषमा, सबकी पसंद होत्या, त्या पावडर ‘निरमा’ची फ्रॉक घातलेली मुलगी. अशा या जाहिराती आपण साधारणतः १९६०च्या दशकापासून बघत आलो आहोत. यामध्ये असलेली व्यक्ती त्या व्यवसायाच्या जाहिरातीद्वारे आपल्यावर भुरळ पाडत असते. यातील जी पात्र आहेत, ती एका अर्थाने ओळखले जाणारे ‘मॅस्कॉट’ अर्थात ’शुभंकर’ म्हणून ओळखले जातात. या व्यावसायिक ‘शुभंकर’सारखे अनेक ‘शुभंकर’ आपल्या परिचयाचे आहेत.

सामाजिक शुभंकर...

जाहिरात क्षेत्रातच नव्हे, तर अगदी २०२३ मध्ये जेव्हा भारताने ‘जी २०’चे आयोजन केले होते, त्याच्याही ‘शुभंकर’ किंवा लोगो तयार करण्यात आला आहे. त्यात कमळाची प्रतिकृती वापरण्यात आली आहे. १९९९ साली स्थापन झालेल्या ‘जी २०’ समूहात भारताबरोबरच चीन, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, तुर्की, मेक्सिको, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन आणि अर्जेंटिना या देशांचा या गटात समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याबाबत ’जी-२० लोगो में कमल का प्रतीक आशा का प्रतिनिधित्व करता हैं।’ असे म्हटले होते. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी ’प्रकृती’ हा ‘शुभंकर’ बनवला आणि प्रभावी प्लास्टिकचा वापर आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन यावर आधारित माहिती समाजासमोर मांडली होतो. हिंदीतील ’चाचा चौधरी’ला सरकारी ‘नमामि गंगे’ योजनेचा शुभंकर घोषित केले आहे. एवढेच नव्हे तर व्यावसायिक आस्थापनांबरोबरच शैक्षणिक संस्था, अंतराळ संशोधनातील अमेरिकन संस्थेचाही ‘शुभंकर’ असतात, तसाच ‘शुभंकर’ लष्कराचाही असतो.

हे वर बघितलेले जाहिरात व सामाजिक श्रेत्रांतील ‘शुभंकर’ पाहिल्यावर आता आपण युवक व क्रीडा विश्वातील ‘शुभंकर’ पाहू. प्राणी, पक्षी यांच्या संवर्धनार्थ ‘शुभंकर’ केले जातात. त्या शुभंकरांना आपण दोन भागांत बघू. पहिला एक भाग ’ऑलिम्पिक’ व्यतिरिक्त प्रकारातले ‘शुभंकर’ आणि दुसरे ’ऑलिम्पिक’मधील ‘शुभंकर’

युवकांसाठी प्रेरणादायी ‘शुभंकर’...

‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्नि बोधत’ म्हणजेच ‘उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका, जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही’ हा संदेश देणारे स्वामी विवेकानंद जगातील असंख्य युवकांचे प्रेरणास्रोत. दि. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती होती. त्यानिमित्त हा दिवस भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ’राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून संपूर्ण देशभरात यंदाही साजरा करण्यात आला. भारतातील तरुणांनी कठोर परिश्रम कसे करावे आणि देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान कसे द्यावे, याविषयी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. त्या युवा दिनाच्या कार्यक्रमांचे काही मोजके ‘शुभंकर’ आपण आता पाहू.

शुभंकर गोरी...

ओडिशातील भुवनेश्वरला २०१० साली झालेल्या, त्या राष्ट्रीय युवा महोत्सवात ३४ वर्षांच्या दुर्लभ अशा एका मगरीचा सन्मान करण्यात आला होता. हस्तिदंती रंगाच्या गोरी या नावाने प्रसिद्ध झालेल्या, त्या मगरीला ‘शुभंकर’ म्हणून निवडण्यात आलं होतं.

टीनगुर शुभंकर...

२०११चा राष्ट्रीय युवा महोत्सव राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. टीनगुर नावाचा पगडी घातलेला युवकांमधील मौज-मस्ती, उत्साह प्रतीत करणारा, असा एक वाघ त्यावेळीचा शुभंकर होता.

यक्षगान करणारा शुभंकर...

राष्ट्रीय युवा महोत्सव कर्नाटकातील मंगळुरूला २०१२च्या दि. १२ जानेवारीसाठी आयोजित करण्यात आला होता. यक्षी म्हणून ओळखला जाणारा हत्ती त्यावेळचा ‘शुभंकर’ होता. पारंपरिक रंगभूमी-नाट्यभूमीत सादर होणार्‍या, डोक्यावर टोपी घालून यक्षगान सादर करणारा तो हत्ती ’यक्षी’ या नावाने सादर करण्यात आला होता.

चंपी चिक्का...

कर्नाटकातील धारवाडला २०२३चा युवा महोत्सव झाला होता. चंपी चिक्का हा २६व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा शुभंकर होता. तो शुभंकर ‘यंग चॅम्पियन’ म्हणून परिचित आहे. हवामान बदल, जागतिक शांतता यांसारख्या विविध जागतिक कारणांसाठी चॅम्पियन असलेल्या तरूण आणि आधुनिक भारताच्या प्रतिमेचे प्रतिनिधित्व तो ‘शुभंकर’ करतो. तो ‘शुभंकर’ भारताच्या युवा चॅम्पियन्सचे प्रदर्शनदेखील करतो. स्टार्टअप्स, क्रीडा, नवोन्मेष आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी वगैरेत तो ‘शुभंकर’ नावाजलेला दाखवण्यात आला आहे.

भीमखार बनली शुभंकर...

नाशिकमधल्या यावेळीच्या युवा महोत्सवासाठी दि. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राचा राज्यप्राणी असणार्‍या शेकरूची ‘शुभंकर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. अतिशय लाजाळू असलेला हा प्राणी देशातील युवकांना स्नेह, सामाजिक एकता, गतिशिलता, विविधता आणि पर्यावरणाप्रति आदरभाव हा संदेश देऊन प्रेरणा देत आहे. शेकरू हा ’खार’ प्राणी गटात समाविष्ट होतो. शेकरूच्या संवर्धनासाठी भीमाशंकर हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले आहे. पश्चिम घाटात सिंधुदुर्ग ते नाशिक या परिसरातील निमसदाहरित वनांमध्ये तसेच विदर्भात गडचिरोलीच्या आलापल्ली आणि सिरोंचा भागातही शेकरू आढळतात.
 
हत्ती शुभंकर...

हत्ती विविध क्रीडा स्पर्धांचा ‘शुभंकर’ बनला आहे. त्यातील मोजकीच नावं आपल्या सगळ्यांना आठवत असतील. दिल्लीमध्ये १९८२ साली आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या. त्या एशियाडचा ‘शुभंकर’ होता, एक अप्पू नावाचा शिशु हत्ती.

कोकीळा राष्ट्रीय पक्षी असलेल्या झारखंड राज्यात ऑक्टोबर २०२३ मध्ये महिलांची आशियाई हॉकी विजेतेपदाची स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेचा ‘शुभंकर’ होती-बेतला राष्ट्रीय उद्यानाची जुही नावाची एक हत्तीण. त्या जुहीने देखील कपाळाला टिकली लावली होती.

तामिळनाडूच्या मुदुमलाई राष्ट्रीय उद्यानातला बोम्मन नावाचा ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटातील प्रसिद्ध हत्ती चेन्नईच्या मेयर राधाकृष्णन हॉकी मैदानात झालेल्या पुरुषांच्या आशियाई विजेतेपदाच्या स्पर्धेचा शुभंकर होता.

हे पंचमहाभूतांवर आधारित देशांतर्गत ‘शुभंकर’ आपण बघत आहोत, त्यांच्या जोडीनेच अजून दोनेक शुभंकर बघण्यासाठी आता आपण विदेशवारी करत, पंचमहाभूतांवर आधारित ‘ऑलिम्पिक शुभंकरां’च्या भेटी पुढील भागात घेऊ.(क्रमशः)
 
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४
अग्रलेख
जरुर वाचा
बंगाल मधील हिंसाचार सुनियोजित कट! रामनवमीचा होता मुहुर्त; तपासात धक्कादायक खुलासे उघडकीस

बंगाल मधील हिंसाचार सुनियोजित कट! रामनवमीचा होता मुहुर्त; तपासात धक्कादायक खुलासे उघडकीस

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात नव्या वक्फ कायद्याच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन हिंसक वळणावर येऊन पोहोचले. झालेल्या हिंसाचारात तीन जण ठार आणि शेकडो जण जखमी झाल्याची माहिती आहे. इस्लामिक कट्टरपंथींच्या उन्मादामुळे परिसरात दहशत पसरली असून अनेक हिंदू कुटुंबांना त्यांची घरे सोडून सुरक्षित ठिकाण गाठावे लागत आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हा हिंसाचार तीन महिन्यांपूर्वी रचलेला सुनियोजित कट होता. परदेशातून निधी मिळाल्याचा धक्कादायक खुलासाही यावेळी करण्यात आला आहे. West Bengal violence Preplanned ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121