उद्धव ठाकरे काळारामाचे नव्हे, तळीरामाचे भक्त; महायुतीच्या नेत्यांकडून ठाकरेंचा समाचार
आदित्य ठाकरेंना दिले लोकसभेत उतरण्याचे आव्हान
13-Jan-2024
Total Views | 56
मुंबई : राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांनी शनिवार, दि. १३ जानेवारी रोजी समाचार घेतला. 'कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नव्हे, तर तळीरामाचे भक्त आहेत', अशी खरमरीत टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. उबाठा गटात हिंमत असेल, तर त्यांनी आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतींना काळाराम मंदिरातील उपस्थितीबद्दल लिहलेल्या पत्राविषयी बोलताना आशिष शेलार म्हणाले, आज सकाळी लवकर उठल्यामुळे त्यांची डोळ्यावरची झोप गेली नसावी. कालच देशाच्या राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिले आहे आणि हे २४ तासानंतर जागे झाले आहेत. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना मुद्दामहून अशी चुकीची आणि अडचणीत आणणारी स्क्रिप्ट लिहून दिली असावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पातळी नाही. ते स्वतःला घरंदाज, कुटुंबप्रमुख म्हणणार असतील, तर त्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत. तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधात न्यायालयात जातो, तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीला घरातून बाहेर काढता, तुमचा चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही, वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी तुम्हाला न्यायालयात जावे लागते, तर मग तुम्ही कुटुंबप्रमुख आणि घरंदाज कसे? त्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका. मोदींचे कुटुंब आणि मोदींचे घर १४० कोटी जनता आहे. स्वतःच्या परिवारापेक्षा देशाला परिवार मानणे ही त्यांची भूमिका आणि माझे कुटुंब माझा परिवार ही तुमची भूमिका कोठे? यासाठी तुम्ही क्लासेस लावावी लागतील. मी चाटे क्लासेसला याबाबत जरूर विनंती करेन, असेही शेलार म्हणाले.
शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. कल्याण डोंबिवली शहरात उद्धव ठाकरे (उबाठा) यांच्या पक्षाची एक जागा निवडून आणून दाखवावी. उबाठा हा मर्दांचा पक्ष असेल, तर त्यांनी स्वतः किंवा स्वतःच्या सुपुत्राला लोकसभेला निवडून आणून दाखवावे, असे आव्हानही शेलार यांनी दिले.
उद्धव ठाकरे सहकाऱ्यांना घरगडी समजतात - एकनाथ शिंदे
जे स्वतःचे कुटुंब एकत्र ठेवू शकले नाहीत, ज्यांनी केवळ 'माझे कुटुंब, माझी जवाबदारी' पाहिली, ते घराणेशाहीवर बोलत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, तर उद्धव ठाकरे घरगडी समजतात, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांचे राममंदिर उभारण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. उद्धव ठाकरे यांचे राममंदिराचे प्रेम बेगडी आहे. राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. तो राजकीय विषय होऊ शकत नाही. मोदीजींनी काळाराम मंदिर स्वच्छ केल्यानंतर मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन केले, त्यानुसार राज्यातील मंदिरे स्वच्छ करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पालिकेतील लुटीतून बंगले बांधले - नितेश राणे
मुंबईकरांनी करापोटी दिलेले कोट्यवधी रुपये ज्यांनी २५ वर्षे लुटले आणि बंगले बांधले, मुंबईकरांचे भूखंड गिळले, मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले, नाल्यातील गाळात... रस्त्यावरच्या डांबरात... शाळेतील गरिब मुलांच्या साहित्यातसुध्दा कटकमिशन खाल्ले, कोविडमध्ये मुंबईकर उपचाराविना तडफडत असताना ज्यांनी आपली घरे भरली, मेट्रो, कोस्टलरोड, बुलेट ट्रेन असे मुंबईकरांचे विकास प्रकल्प स्वार्थासाठी अहंकाराने अडवून ठेवले, ते आता पालिकेच्या कारभाराविषयी बोलत आहेत. मुंबईतील मराठी माणसाला, प्रामाणिक करदात्यांना, गरीबांना, कष्टकऱ्यांना, श्रमिक, झोपडपट्टीधारकांना फसवून, लूटून कंत्राटदारांना, बिल्डरांना मालामाल केले, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी देव, देश आणि धर्माला सोडचिठ्ठी दिली, हिंदूच्या सणांवर बंदी आणली, देवांना बंदिवान केले, राम मंदिर वर्गणीची खिल्ली उडवली, शेवटी सगळ्याचा "निकाल" लागलाच. देवाच्या काठीचा आवाज नसतो, पण दणका जोरात असतो, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
ठाकरेंनी अटलजींच्या पुतळ्याला परवानगी नाकारली - राम कदम
अटल सेतूवर अटलजींचा फोटो का नाही, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भाजप आमदार राम कदम म्हणाले, मुख्यमंत्री असताना मुंबईत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्याला परवानगी नाकारणारे आज अटलजीं बद्दल बोलत आहेत. मातोश्री बाहेरील उड्डाणपुलाला बिंदूमाधव ठाकरे यांचे नाव आहे. आधी त्यावर फोटो लावा आणि मग विचारा अटल सेतूवर अटलजी यांचा फोटो का नाही म्हणून...? डबल ढोलकी... खोटारडे, अशी टीका राम कदम यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणजे अपयशाचे नामुष्कीजनक उदाहरण - चित्रा वाघ
पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचे गुरू देवेंद्रजींच्या पाठीशी आहेत. ज्यांनी ३७० कलम हटवले, राम मंदिर उभारले, सर्जिकल स्ट्राईक केला, जी२० यशस्वी आयोजिली, महिला आरक्षण दिले. या गुरूंनी संपूर्ण जगात भारताचा दबदबा निर्माण केला आणि त्यांच्या शिष्याने राज्यात असंख्य संकटांवर मात करून पाच वर्षे यशस्वीपणे सरकार चालवून दाखवले. देवेंद्रजींचे गुरू कोण आहेत हे सर्व देशाला माहिती आहे. पण उद्धवजी तुम्हाला पक्ष सांभाळता आला नाही, राज्य सांभाळता आले नाही, मुख्यमंत्रीपद पेलता आले नाही. तुम्ही म्हणजे राजकारणातल्या अपयशी शिष्याचे नामुष्कीजनक उदाहरण आहात. तुमचे वडील तर हिंदुत्वाचे चालते-बोलते विद्यापीठ होते. त्या वंदनीय विद्यापीठाचेही शिष्यत्व तुम्हाला सांभाळता आले नाही, अशी टीका भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.